सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Tuesday, 18 June 2019

भाग दहावा



भाग दहावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


Image Source: Guelgram



तीन कप कॉफी आणि दीड तास समोर तो. तिला दोघांचीही सवय नव्हती. बहुतेक, तिला नशा चढली होती. त्याची. कॉफीची. त्याची? हो, त्याचीच!

God, how influencing he was! How charming!

हलक्या सरींचा पाऊस सुरू झाला. कधी नव्हे त्या पावसात तिला भिजावसं वाटत होतं. त्याक्षणी, तिचा आनंद साजरा करायला पावसापेक्षा चांगला साथीदार भेटणार नव्हता.

'मी फार कमी बोलले.' तिला कुणीतरी हवं होतं तिच्या मनाला ऐकायला. पाऊसही अगदी वेळेत आला. 'मला का नाही सुचलं काही? का घाबरत होते मी तिथं बसलेल्या सगळ्यांना? जर मी गेले त्याने बोलावल्यावर तर मग भीती कसली होती? त्याच्या प्रेमात पडण्याची? पण मग आज त्याने कॉफीसाठी विचारलं, तेव्हा मी नाही का म्हटली नाही? मी येणार याची त्याला खात्री होती. किती सहज ओळखतो तो इतरांच्या मनातला कल्लोळ. प्रेमाची भुरळ होती फक्त जी इतर मुलींना त्याच्याविषयी होती की खरंच प्रेमात पडलीय मी त्याच्या?'

अर्थात, तो तिला आवडायला लागला होता आणि तिला खात्री होती की त्यालासुद्धा ती आवडायला लागली होती.

पाऊस तिला काही वेगळं सांगायला आला नव्हता याची तिला खात्री होती. पावसाला घट्ट मिठी मारावी म्हणून ती भिजायला तयारही होते.

जन्काचा टॉप घातला असल्याचं जाणवताच भिजण्याचा विचार मात्र ती टाळते.

त्या पावसाच्या थेंबांना आपल्या हातावर घेत ती स्वतःशीच हसते.

एकसंध पडणारा पाऊस
ठोक्यांच्या लयबद्ध चालीवर
हृदयाला नाचवत...

नव्याने जगायला शिकवणारा
तू आणि
पावसाचा प्रत्येक थेंब...

मनालाही भिजवणारा हा ओलावा,
नाविन्याची चाहूल...
कारणीभूत तू की पाऊस???

.


पावसात भिजून प्रियांश रूमवर परतला होता. आवरून कम्प्यूटरसमोर बसतो.

समीर NFS Most wanted च्या काळातसुद्धा NFS2 SE खेळत बसला होता.

'2 players लाव.' 2 players, त्यात दोघांनीही McLaren निवडली. प्रियांश पहीली रेस अगदी वाईट पद्धतीने हारताच समीरला जाणवलं की एकतर कॉफी कॉर्नरमधील वेळ खूपच चांगला गेलाय किंवा खूपच वाईट.

'कॉफीची चव कशी होती?' विभोरच्या प्रश्नाचा संदर्भ प्रियांशला कळला होता.

'दोन तासांत चव समजून येत नाही.' पुन्हा एकदा प्रियांशला हरवत समीर विजयी मुद्रेने हसत म्हणतो.

'हां म्हणजे तसं प्रियांश कॉफीची चव फार सहजतेने ओळखतो.' समीरची बडबड ऐकत प्रियांश निराश होऊन पुढच्या race साठी McLaren ऐवजी Ferrari निवडतो.

'मन जिंकण्यासाठी तरी वाम मार्ग वापरणार नाहीस तू म्हणजे मिळवलं.' समीर हसतच race सुरू करतो.

'चव चांगली लागली असणार तर मग कॉफीचा सुगंध रूममध्ये दरवळायला सुरूवात होणार.'  विभोर असं म्हणताच ते दोघंही जोरजोरात हसतात.

'तुम्हा दोघांचं बोलून झालं असणार तर मी आत्ता बोलू?' Ferrari सुद्धा McLaren कडून हारली होती. प्रियांश निराश होऊन दोघांना विचारतो.

'तू काही बोलावं याची गरज तरी कुठे उरलीये!' समीर पुन्हा एकदा विजयी मुद्रेने प्रियांशकडे बघत त्याला आठवण करून देतो की NFS 2 चा पहिला ट्रॅक 37 सेकंदात पार करणारा जेव्हा एका मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतो तेव्हा मन चलबिचल असतं.

'जेवनाचे डब्बे घेऊनच परत येतो.' असं म्हणत प्रियांश रूममधून बाहेर जातो.
.


स्म्रीति रूममध्ये परतली तेव्हा जन्का आणि प्रज्ञा DAA विषयी बोलत होत्या. अक्षरा assignment लिहिण्यात मग्न होती.

स्म्रीति कपडे बदलून येताच अक्षरा तिला डोळ्यांनीच विचारते, 'काय काय झालं?'

स्म्रीति चेहऱ्यावर स्मितहास्य आणत ओठांना फक्त हलवत तिला सांगते, 'नंतर.'

'मला हे algorithm कसं solve करावं कळतच नाहीये.' प्रज्ञा जन्कासमोर वही ठेवत म्हणते.

'n+1 घेऊन बघूयात.' जन्का बराच विचार करत म्हणते.

स्म्रीतिसुद्धा त्या दोघींजवळ जाऊन उभी राहते.

'चुकलं! आत्ता n+2 घेऊयात.' जन्का पुन्हा विचार करू लागते.

'n-2 घेऊन बघ, जमेल.' स्म्रीति असं म्हणताच जन्का नाक उडवत, डोळे बंद करत हसते.

'काहीतरीच! जर n-2 घेतला तर...' जन्का एवढं बोलून थांबते. तेव्हा फक्त स्म्रीतिच्या हस्ताक्षरात पेन बोलू लागतो कागदाशी.

'ही मेथड कॉरमनची नाहीये.' जन्का स्म्रीतिकडे बघत समजायचं ते समजते.

स्म्रीति काहीही न बोलता स्वतःच्या बेडवर येऊन बसते.

रूममधील वातावरण शांत असतं. जन्का मनातल्या मनात स्म्रीतिच्या अभ्यासाच्या बदलत्या पद्धतीने थोडीशी धास्तावली होती. त्यात प्रियांशमुळे हे बदल होत होते म्हणून आणखीच त्रास.

'स्म्रीति दी, you are the luckiest girl.' तिसऱ्या वर्षात शिकणारी त्यांची junior रूममध्ये येताच स्म्रीतिच्या बेडवर बसत म्हणते.

'का? आज लॉटरी वगैरे जिंकून आली काय ती?' जन्का तिला कुतूहलाने विचारते.

'माझ्यासाठी तर बंपर लॉटरीच समज, जन्का दी. स्म्रीति दी आज handsomest of all प्रियांशसोबत कॉफी शॉपमध्ये बसलेली.' हे ऐकून जन्काचा राग चढला होता‌.

'अय, junior आहेस तर आमच्यासमोर थोडंसं सांभाळून बोल.' ती junior मात्र जन्काला भाव न देता पुन्हा स्म्रीतिकडे वळते.

'दी, पुढच्या वेळी मलाही तुझ्यासोबत घेऊन बस. वाटलं तर पूर्ण बिल मी भरेल.'

'तू जन्काचं बोलणं ऐकलं नाही वाटतं? निघायचं लगेच!' प्रज्ञा जरा सिनियर आव वाढवत तिला रूममधून हाकलून लावते. अक्षरा मात्र हसत सगळी गंमत बघत असते.

'नाही म्हणजे खरंच हां स्म्रीते, नशीब फळफळलंय तुझं.' अक्षरा.

'तू माझा टॉप घालून त्या फालतू मुलाला भेटायला गेली होतीस? How dare you?'  जन्का मात्र स्म्रीतिला रागात विचारते.

स्रीतिला काय बोलावं काहीच सुचेना.

'सॉरी! पुन्हा असं नाही होणार.'

'पुन्हा तशी वेळच येणार नाही.' जन्का असं म्हणत लॉकर मधून कात्री काढून त्या टॉपला फाडू लागते.

'जन्के, वेड लागलंय का तुला! आण ती कात्री इकडे.' अक्षरा तिला अडवण्याचा प्रयत्न करते पण क्षणभराने का होईना उशिर झालेला असतो.

'मला न विचारता माझ्या कपड्यांना घालून जाशील तू त्या नालायक, नी...' शिव्यांचा पाढा सुरू करण्याआधीच ती थांबते. कात्री आणि फाडलेल्या त्या टॉपला तसंच जमिनीवर फेकत तडफड करत ती रूममधून बाहेर जाते.

अक्षरा इशारा करत प्रज्ञाला तिच्यामागे जायला सांगते.

स्म्रीति मात्र तिच्या अशा वागण्याने घाबरून जाते. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात‌.

'स्म्रीते, तू का रडतेस?' अक्षरा स्म्रीतिजवळ बसत तिला जवळ ओढत म्हणते, 'तुला माहीतीये ना की प्रियांश तसा नाहीये जसा जन्का सांगत होती, मग तू का असं रडतीये?'

स्म्रीति तिच्या खांद्यावर डोकं ठेवते.

'तुम्हा तिघींपैकी एकही आयुष्यात नसली तर मी अपुर्णच. मी ती उरणारच नाही जीला तुम्ही ओळखतात.'

'तुला ती का उरायचंय? तुझ्यात होणारे बदल, तुझी नवी ओळख, तुझं स्वप्न पूर्ण करत असणार असतील तर तुला ती का उरायचंय?' अक्षरा तिला शांत करण्याचा प्रयत्न करते.

अक्षरा त्या टॉपकडे बघत आठवते. कशी ती IIT मध्ये जाऊन roborace जिंकून येणारी त्यांच्या कॉलेजच्या इतिहासातील पहिली मुलगी ठरली होती. म्हणूनच कदाचित तिने इतर तिघींनाही lucky charm च्या नावाखाली त्यावर अंधश्रद्धाळू बनण्यास भाग पाडलेलं. त्या फाटलेल्या टॉपच्या आठवणी मात्र ठिगळ लावून का असेनात पण मनात जपून राहणार होत्या.

'आम्ही इथंच आहोत. जन्कासुद्धा! तिला थोडा वेळ लागेल accept करायला पण ती तुझा हात सोडणार नाही.' अक्षरा तिला आश्वस्त करते.
.


रात्रीचे 10 वाजलेले. प्रियांश आणि समीर Basketball court वर ढगाळ आकाशाकडे बघत पाठ टेकलेले. विभोर कॉलेजच्या ग्राउंडवर त्या दोघांपासून बऱ्याच अंतरावर त्याच्या girlfriend सोबत फोनवर बोलत होता.

'आत्तातरी वाटतंय का तू तिच्या प्रेमात पडलाय?' समीर कॉफी कॉर्नरवरून परत आल्यापासून प्रियांशच्या मनात सुरू असलेल्या चलबिचल अवस्थेबद्दल जाणून त्याला विचारतो.

'तुला खरं सांगू, मला प्रेमाची व्याख्याच कळेनाशी झालीये.'

'प्रेमाची व्याख्या शोधत बसशील तर आयुष्य संपेल. इथे एक वर्ष सुद्धा उरलं नाहीये.'

'मला कळतंय. पण... म्हणजे मला स्म्रीति आवडायला लागलीये.'

'पण काय?'

'आपल्याला एखादी आवडलेली व्यक्ती किंवा एखादी गोष्ट नेहमी जवळ असली की हातची निसटून गेल्याची भीती वाटते.'

'हो मान्य, आम्ही आधीच म्हटलोय की तुम्ही दोघं सोबत शोभून दिसणार पण आज पहिल्यांदा असं भेटलायेस तू तिला आणि‌ इतक्यात तू फार पुढचा विचार करतोय.' थोडं थांबत समीर त्याला आठवण करून देतो प्रेम वगैरे सगळं कसं क्षणभंगूर असतं म्हणून,
'सगळं जग आपल्यासारखं निःस्वार्थ जगलं असतं तर कायापालट झाला असता या जगाचा.'

'वेळ घालवण्यासाठी किंवा कुणाच्या कामी यावं म्हणून प्रेमात पडायचं असतं तर दुसऱ्यावर्षी जेव्हा सर्वशरीरसंपन्न असणाऱ्या त्या EnTC तल्या मुलीने विचारलेलं तेव्हाच हो म्हटलो असतो ना. त्यात इतक्यात नको असलेल्या गरजासुद्धा पूर्ण झाल्या असत्या.' समीरला मात्र प्रियांशच्या बोलण्यावर हसू आलं.

'सोपं गणित सांगतो, प्रेम कर. पुढे चांगलंच होईल या विश्वासाने. निःस्वार्थपणे!'

समीरचं ऐकून प्रियांश मात्र काही बोलला नाही. त्याची शांतता समीरला स्वस्थ बसू देत नव्हती. तिघांच्याही स्वभावात नव्हतं मनात चाललेल्या कल्लोळाला एकमेकांपासून लपवून ठेवणं.

'तिला मेसेज कर की ती आली भेटायला म्हणून तुला बरं वाटलं असं काही.'

'तिचा नंबर...' प्रियांशकडे स्म्रीतिचा नंबर नव्हता पण त्याला नंबर भेटणं फार कठीण नव्हतं.

त्याने Papa's girl ला मेसेज केला. जी class topper असल्याने CR होती आणि department च्या meetings मुळे ते नेहमीच भेटत असत HOD cabin मध्ये.

'Hey chashmish, please send me Smriti's number.'

तिचा reply आला खरा पण भेटल्यानंतर तिचे बोलणे खावे लागणार हे नक्की. तिची भीती नव्हती कारण एकतर gossip करायला ती हॉस्टेलमध्ये रहायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तिला प्रियांशवर विश्र्वास होता.

'Hi... Coffee with Smriti cool Hoti. Chhan vaatl bhetun. Gdnt -Priyansh.' समीरला ऐकू जावं या हेतूने प्रियांश स्म्रीतिला पाठवत असलेला मेसेज वाचून सांगतो आणि मग send चं बटन दाबतो.

'बघ चेहरा फूलला लगेच तुझा.' समीर त्याला चिडवतो.

'तिचा reply तर येऊ दे.' प्रियांश हसतो.

'Heyy, malasuddha khup chhan vaatl bhetun.  Gn :) :) :)' प्रियांश मेसेजचा लगेचच आलेला reply वाचून शांत होतो.

'मेसेज करून reply सुद्धा आलाय. कदाचित, हवा तसा.' समीर.

'करूयात आत्ता निःस्वार्थ प्रेम, कुठलीही अपेक्षा न ठेवता.' प्रियांश आलेल्या मेसेजने तसा खुशच होता.
.


Sunday, 9 June 2019

भाग नववा



भाग नववा: कॉलेजचं शेवटचं वर्ष



त्याने त्यादिवशी तिला पुन्हा एकदा 'care for coffee?' असं विचारलं होतं. ती हो म्हटली नाही. मात्र नेहमीप्रमाणे यावेळेस नाही सुद्धा म्हटली नाही. तिची शांतता त्याच्या चेहऱ्यावर एक smile घेऊन आली. 5 वाजता भेटू असं म्हणत तो नजरेआड झाला.

जावं की नाही हा विचार करत करत ती कॉलेजवरुन हॉस्टेलच्या रुममध्ये येऊन पोहोचली होती. तिच्या प्रत्येक विचारात वेगळी भावना होती. जावं! न जावं!

न जाण्यासाठी तिच्याकडे बरीच कारणं होती. जाण्यासाठी मात्र एकच.

तो आवडायला लागला होता. त्याचे विचारसुद्धा अंगावर एक हलकीशी प्रेमळ झुळुक घेऊन यायचे. पण हे त्या एका कारणासाठी पुरेसं होतं का?

न जाण्याचं सगळ्यांत महत्त्वाचं कारण म्हणजे जन्का! गरज आल्यास तो की जन्का या दोघांपैकी कोणासोबत उभं रहायचं, हा प्रश्र्न. नवीन नात्याला बांधताना जुन्या नात्यांना का कोसळू द्यावं?

त्यात पहाटे अभ्यास करत असताना 'पहला नशा' हे गाणं अर्थशः आपलंसं झालं होतं तिच्यासाठी. तिच्या iPod च्या playlist मध्ये जणू तेच गाणं होतं. गुणगुणत असताना तिच्या चेहऱ्यावर हसू होतं.

'स्म्रीते, पुरे आता.' जन्का तीच्या कणखर आवाजात स्म्रीतिला स्वप्नातल्या जगातून जागं करते.

'सॉरी!' स्म्रीति नाजूक स्वरात, चेहऱ्यावर चुकीची जाणीव आणत, कानातले इअरफोन्स काढत म्हणते.

'उद्यापासून मी रीडींग रूम मध्ये अभ्यासाला बसणार आहे. किती गुणगुणायचं, किती नाचायचं यासाठी तुला पूर्ण मोकळीक माझ्याकडून. पण आजच्या दिवस शांतता ठेव.' अभ्यास करताना ज्या जन्काला गोंधळ चालायचा त्या जन्काला स्म्रीतिचं गुणगुणनं सहन होत नव्हतं. अर्थात, डोक्यात प्रियांश आणि स्म्रीति बद्दल असणारे विचार तिला अस्थिर करत होते. चलबिचल करत होते.

मैत्रीतल्या एकाही विटेचं कोसळणं परवडणारं नव्हतं. आणि जर ती जन्का असेल तर!

स्म्रीति मात्र काहीही उत्तर न देता पुन्हा शांततेत अभ्यास करू लागते.

त्याचे विचार डोक्यातून काढून टाकण्याचं ती ठरवते पण सारे प्रयत्न निरर्थक. त्याचा तो तेजस्वी चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून जायचं नावंच घेईना.
.

'उसने बात की कुछ ऐसे ढंग से,
सपने दे गया वो हजारो रंग के...'

अक्षरा 'पहला नशा' हे गाणं म्हणत सकाळी घडलेल्या घटनेची आठवण करून देत जणू स्म्रीतिला चिडवत होती.

'मला जन्काची खूप भीती वाटतेय, अक्षरे.' स्म्रीति तिच्या मनात येणारे विचार अक्षराला सांगते.

'काही नाही, होईल ती शांत.' अक्षरा तिला आश्वस्त करते.

'मी त्याला भेटायला जाऊन चुक तर नाहीये ना करत.' आरशासमोर उभं राहून स्म्रीति स्वतःला न्याहाळत होती.

'तू प्रियांश सोबत डेटवर जात आहेस. त्यात चुकीचं काय?' अक्षरा डेट या शब्दावर जरा जोर देत म्हटली.

'डेट वगैरे काही नाही. तो पुन्हा-पुन्हा विचारतोय म्हणून शेवटी हो म्हटले मी. तेही फक्त कॉफी पुरता!' स्म्रीति तिने घातलेल्या काळ्या कुर्त्याला आरशात बघत अक्षराला विचारते, 'हा राहू देऊ की दुसरं काही try करू?'

'तू काहीही म्हण पण शेवटी समोर प्रियांशच असेल बसलेला, ते सुद्धा 2 तास!' अक्षरा तिच्या पलंगावरून उठत लॉकरमधून एक पांढऱ्या रंगाचा टॉप काढून स्म्रीति समोर धरत, 'हा घाल.'

'हा जन्काचा टॉप आहे.' स्म्रीति असं म्हणत नकारार्थी मान हलवते.

'आणि आपल्या चौघींसाठी lucky आहे. म्हणून घालूनच जा.' तो टॉप जन्काकडे दुसऱ्या वर्षापासून होता.

F.R.I.E.N.D.S या टिव्ही शो मधील pivot वाल्या scene चं चित्र असणाऱ्या त्या टॉपमध्ये जणू जादूच होती. जन्काकडे दुसऱ्या वर्षाच्या अखेरपासून असणारा तो टॉप त्या चौघींसाठी अंधश्रद्धेचा भाग झाला होता. महत्त्वाच्या परीक्षा, प्रज्ञाची पहिली वहिली यशस्वी डेट, अक्षराचं IIT मधील बक्षिस मिळवून देणारं robot exhibition आणि आणखी बऱ्याच चांगल्या आठवणी त्या टॉपने चौघींना दिल्या होत्या.

'मी फक्त कॉफी प्यायला जातेय. Luck ची गरज नाही काही.' स्म्रीति नाही म्हणत तो टॉप परत अक्षराच्या हातात देते.

'माझ्यासाठी, please!' अक्षरा तिला विणवन्या करते.

'कर तू blackmail.' टॉप पुन्हा आपल्या हातात घेत ती विचारते, 'पण तिने बघितलं तर?'

'तर काय? तिथेच थोडे ना काढायला सांगेल ती. काय चिडचिड करायची करेल ती रूमवर येऊन.'

'नको. मी जातच नाही.'

'तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देते की तू तुझ्या आत्तापर्यंतच्या इंजिनिअरिंगच्या आयुष्यात पहिल्यांदा आरशासमोर उभी आहेस. तीन गॅदरिंग्स गेल्यात पण आरशात स्वतःला न्याहाळताना असं तुला आज पहिल्यांदाच बघतेय मी तरी.'

'काहीही.'

'ते मोकळे सोडलेले केस बघून माझ्यातील cuteness आणि प्रज्ञातील hotness असं mixed combination समोर उभं दिसतंय.' अक्षरा डोळे मिचकावत तिचं कौतुक करते.

'अगं पण...' स्म्रीति आणखी काही बोलणार त्याआधीच अक्षरा तिला शांत रहायला सांगून दरवाजाकडे इशारा करत म्हणते,
'पण बीण काही नाही. जा आत्ता!'
.

ती वेळेत पोहोचली. तो मात्र आधीच येऊन थांबला होता. तिची वाट बघत. ती कपडे बदलून कधी नव्हे आरशासमोर उभं राहून आलेली आणि तो तसाच कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये!

खरंतर ती चिडलीच त्याच्यावर. पण तीन वर्षांहून अधिक वेळ घातलेल्या त्या पांढऱ्या शर्टमध्ये सुद्धा कसला cute दिसत होता तो. तिचं चिडणं हवेत विरलं. त्याला बघून मन हरवलंच काही क्षणांसाठी.

येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या त्या गोड हास्याने hi वा bye करत होता. कसं जमत असेल त्याला सगळ्यांसोबत इतकं हसतखेळत वागणं? आजूबाजूच्या टेबल्सवर बसलेल्या मुली जणू फक्त तो बसला होता म्हणूनच आल्याचं वाटत होतं. सगळींच्या नजरा त्याच्यावरच!

तिला हॉस्टेलवर परत जावंसं वाटत होतं पण मग...

वातावरण आल्हाददायक होतं. तासाभरापुर्वी धो धो पाऊस पडून गेलेला. ढग अजूनही गडद. पुन्हा पाऊस येण्याची दाट शक्यता.

Department च्या writing section वाल्या board वर लावण्या हेतू लिहीत बसला होता. 'वाट बघण्याची गंमत' हे दिलेलं शीर्षक!

तू यावंस...
तुझी वाट बघताना
गंमत यावी अशी,
तू यावं भेटायला
पावसाची सर होऊन
गडद झालेल्या ढगाला
तुझ्या मोकळ्या केसांत माळून...


ती समोर येऊन उभी राहताच तो उभं राहून तिला बसण्यास सांगतो. त्याची डोळे तिचं सौंदर्य टिपण्यात गुंतून जातात. नजर नको लागायला म्हणून काजळ लावून यायला हवं होतं असं सांगण्याची त्याला गरजच भासली नाही कारण तिच्या काळ्याभोर डोळ्यांना काजळाची गरजच नव्हती.

ती सुगंधित ओल्या मातीची हवा, तो आणि सोबतीला ती!

त्याला छानशी smile देत ती बसली.

'कुणासाठी इतकं वेडं होणं अशक्यच!'
त्याला असंच वाटायचं नेहमी...
आणि आत्ता तो,
तिला बघत,
ती... तिचे डोळे...
तीचं हास्य... त्या खळ्या...
पार हरवून जाणं...
वेड...

'खूप गर्दी आहे, नाही?' स्म्रीतिने असं विचारताच प्रियांश भानावर येतो.

तिची नजर घाबरलेली दिसत होती. प्रियांशसोबत बसलेलं बघून आजूबाजूचे काय विचार करत असतील, हा विचार तिला खायला करत होता.

'जिथं मी असणार तिथं गर्दी असणारंच.' तो डोळे मिचकावत तिला म्हणतो.

'अर्थात!' ती मात्र त्याच्याबद्दल इतर मुलींना असणाऱ्या भावनांबद्दल विचार करते.

'का? म्हणजे कॉलेजच्या सगळ्या मुर्ख मुलींमध्ये तुझी इतकी craze का आहे?' अक्षराने या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचदा दिलं होतं रूममध्ये पण त्याच्या मनात काय होतं हे त्याच्याकडूनच जाणून घ्यायला भेटणार होतं.

'NASA च्या शास्त्रज्ञांना पडलेल्या 11 कोड्यांपैकी मी 12 वा.' तो मात्र चेहऱ्यावर अनभिज्ञता आणत कोड्यात उत्तरतो.

'म्हणजे?' ती.

'त्यांना ती 11 प्रश्नांची उत्तरं शोधताना डोक्याला त्रास झाला की मग तेसुद्धा तू विचारलेल्या प्रश्नाचा विचार करत असतील.' तो असं म्हणताच ती हसायला लागते.

'तू म्हणजे अतीच आहेस.' ती बसलेल्या खुर्चीवरून मालरोड पुर्ण दिसत होता आणि तिला भीती होती की जन्का तिला बघेल आणि रूममध्ये वाद घालेल.

'तू इथं कधी आलेली नाहीये का आधी?' तीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या उदासीनतेला बघत तो विचारतो.

'आली असेल हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या वेळेस, तेदेखील अक्षरासोबतच.' इतरांनी आपल्याकडे बघून गॉसिप करायला नको म्हणजे मिळवलं, हे ती मनातल्या मनात म्हणायला विसरली नाही.

'तुला माहीती नसेल म्हणून सांगतो, PLs च्या दिवसांत हे कॉफी कॉर्नर रात्रीसुद्धा पुर्णवेळ उघडं असतं.' सायंकाळी सात वाजता girls' hostel च्या बाहेर जाणं मुलींना allow नव्हतं. त्यामुळे, रात्रीची कॉफी फक्त मुलांसाठीच असणार.

'हो?' तीला मुळीच कल्पना नव्हती. PL चे दिवसं असो किंवा नेहमीचे कॉलेजचे दिवसं, रात्रीचे 11 वाजले की तिचे डोळे आपोआप मिटत.

'झोप उडवण्यासाठी कॉफी म्हणजे औषधचं!' त्याच्या चेहऱ्यावरील भाव जणू पुढची PL कधी येणार याच विचारात गुंतलेत की काय असं तिला वाटलं.

'तू फक्त PLs वेळी अभ्यास करतो का? तेसुद्धा रात्र रात्र जागून?' ती.

'हो!' तो.

'मग कसा रे तू येणार पहिल्या दहांत!' तीचं बोलणं अगदी खरं होतं हे तो जाणून होता.

'तुझ्यासारखं 5 वाजता उठून अभ्यासाला बसणं नाही शक्य.' थोडक्यात त्याला ठाऊक होतं तिचं वेळापत्रक.

'मग कमीत कमी 7 वाजता तरी उठ.' तिला सुद्धा जाणीव होतीच त्याच्या आळशीपणाची.

'हे वर्ष सुरू झाल्यापासून तेच प्रयत्न चालू आहेत पण अपयशच.' प्रियांश चेहऱ्यावर कुठलेही हावभाव न आणत म्हणतो. अजून तरी आलेल्या अपयशाने त्याला फरक पडला नव्हता हेच कळत होतं तिला त्याच्या चेहऱ्यावरून.

'मी एक शेवटचा प्रयत्न करून पाहू का?' जिथे समीर आणि विभोरने हार मानली इतक्यात तिथे ती कशी जिंकणार, असा विचार मनात आणत तो होकारार्थी मान हलवतो.

'पण मग तू मला कुठल्याही विषयात अडचण आली तर मदत करशील ना?' तिने असं विचारताच त्याला तिचं स्वप्न वगैरे सगळं काही आठवलं. समीर म्हटलाच होता की तिची स्वप्नं ही तुझी गरजच.

तसं त्याला काही हरकत नव्हतीच. त्याचा regular अभ्यास दुसऱ्यांना पडलेल्या प्रश्नांवरच व्हायचा खरंतर.

'DAA नंतर आत्ता कुठल्या विषयाचं reference book बदलायचं?' तो तिच्या, आणि त्याच्याही फायद्याच्या असणाऱ्या proposal ला accept करतो.

पुढचा एक तास दोघंही books, professors, practicals, assignments असं बरंच काही बोलत होते. त्याच्या प्रत्येक विषयावर असणारी पकड बघून तिला विश्र्वासच बसत नव्हता की तो क्लास टॉपर्सच्या दूर दूरपर्यंत सुद्धा नव्हता.

त्याच्या प्रेमात पडण्याचं आणखी एक कारण तिला भेटलं होतं.

'अजून एक कॉफी?' तो तिला विचारतो.

'नको आत्ता.' ती नाही म्हणते.

'घे गं. इतकं छान वातावरण झालंय. कॉफीला कसं नाही म्हणतेस.' थोडक्यात कॉफीचं व्यसन होतं त्याला.

ती हो म्हणताच, तो दोन कॉफी सांगतो. दीड तासातली ही त्यांची तिसरी कॉफी.

'तू F.R.I.E.N.D.S. बघितली आहेस का?' तिने घातलेल्या टॉपकडे बघत तो तिला विचारतो.

'असं पूर्ण नाही. अधूनमधून, तोडकंमोडकं. Mostly, YouTube वर असणारे videos.'

'मला वाटलं तुला आवडत असणार.' तो त्या टॉपकडे इशारा करतो.

'हा जन्काचा आहे.'

'मला तर वाटलेलं तिला फक्त WWE सोडून काही आवडत नसणार.'

'ती खूप चांगली आहे रे स्वभावाने.'

'मग असं का वागते माझ्यासोबत ती?'

'तुच काहीतरी चुकीचं वागलं असणार. असं उगाच का कुणी वाईट होतं इतर कुणाच्या नजरेत‌.'

'खरंच सांगतो, मी तिचं काय कुणाचंच कधी वाईट केलं नाहीये आयुष्यात. साधा वाईट विचारसुद्धा नाही कधी कुणाबद्दल.'

'हो जन्का आहे थोडी तिच्या मनासारखं करून घेणारी पण...' स्म्रीति आणखी काही बोलणार त्याआधीच प्रियांश बोलायला सुरुवात करतो.

'पहिल्या वर्षाला एकाच वर्गात होतो मी आणि ती. पूर्ण वर्ष जेव्हाही कधी आमचं बोलणं झालं ते अगदी व्यवस्थितच. पण दुसऱ्या वर्षात असं काय घडलं माहीत नाही, तेव्हापासून ती नेहमी मीच चुकलोय असं म्हणत सुरूवात करते.'

'मलाही कोडंच आहे ते एक.' जन्कामुळे क्षणभरासाठी का असेना पण त्या दोघांनाही तिच्या विचारांनी शांत केलं.

'असो. मग तू कुठली serial बघतेस?'

'फार वेळ भेटत नाही काही पण दिल मिल गये बघायला आवडतं.'

'ही कुठली serial?'

'Medical drama आहे.'

'ओह! थोडक्यात भारतीयांची Grey's anatomy.'

'काय?'

'Grey's anatomy! बघ तू. थोडी emotional आहे पण आवडेल तुला.'

'हे वर्ष संपलं की मग. सध्या कुठल्याच emotions मध्ये अडकायचं नाहीये.' तुझ्या प्रेमात सोडून, हे मनातल्या मनात म्हटलीच ती.

त्यानंतर काही क्षण शांततेत गेले. पुढ्यात असलेली कॉफी संपवण्यावर तिचं लक्ष होतं.

तू बोलावं, मी ऐकावं
घड्याळानेसुद्धा कधी उलटं फिरावं...

त्याच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असा तो वेळ. समोर बसलेल्या स्म्रीतिला मात्र बोलायला फार आवडायचं नाही. त्याची बडबड ऐकून परत भेटायची नाही ती बाहेर असं, या विचाराने तोही शांतच होता.

'उशिर होतोय. मी निघते.' हातात घातलेल्या घड्याळाकडे बघत ती म्हटली.

'मी सोडू?' त्याने असं विचारताच ती हसली. वेड लावणाऱ्या तिच्या गालावरच्या खळ्या, अह्हा!

'मुलांना girls' hostel मध्ये नाही येऊ देत‌.' ती असं म्हणताच त्यालाही हसू आलंच.

मालरोडवरुन दिसेनाशी होईपर्यंत तो तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत असतो. खरंच प्रेमात पडली होती का ती त्याच्या, की फक्त... आह! आत्ताच का नको ते विचार?

समोर टेबलवर असलेल्या कॉफीचा कप ओठांशी लावताच जाणवतं की पुन्हा एका hot कॉफीची गरज होती.


कॉलेज...
तो, ती आणि कॉफी...
आयुष्य पुरून उरेल,
इतक्या आठवणी देणारं मिश्रण...


Image source: Guelgram