सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Thursday, 31 October 2019

भाग चौदावा

भाग चौदावा: आजचा दिवस



नातं कधीच नाही संपलं..

झालं गेलं सरलं सारं,
संपला तो सहवास, राहिले फक्त अवशेष..
आता काय करणार?
फक्त नातंच उरलंय शेष..

कधी केव्हा कुठे कसा
समजलाच नाही, संपला आपला प्रवास,
राहीलाय तो फक्त,
एक शेवटचा निःश्वास..

कळलंच नाही कधी,
पण खुप जीव लागला होता
तू तर निघून गेलीस,
नात्याचाच तेवढा धागा उरला होता..

वाळवंटातल्या मृगजळागत
होता का सारा आभास?
निसटून गेली हातून प्रेमाची रेती,
उरला आहे तो या नात्यावर विश्वास..

क्षणभराचं प्रेम आपलं
नातं कधीच नाही संपलं..



मोबाईल फोन वाजू लागताच मी भानावर आलो. लॅपटॉपच्या screen वर उघड्या असलेल्या, लिहून पूर्ण झालेल्या कवितेच्या word document ला सेव्ह करून लॅपटॉपला बाजूला ठेवलं.

समीरचाच फोन असणार हे ठाऊक होतं. गेल्या 5 वर्षांत कॉलेजला लागलेल्या सवयीप्रमाणे आम्ही दोघं मावळलेल्या दिवसाबद्दल न चुकता बोलायचो.

अर्थात, शहरं बदलली होती. भेटी इतक्या नाही व्हायच्या. पण टिकते ती मैत्री, निभावता आली की!

समीर नसता तर कदाचित अजूनही सावरलो नसतो. शेवटी, प्रेमाच्या नात्यातल्या तुटक्या धाग्या दोऱ्यांना मैत्रीचाच आधार असतो.

'कसा झाला इंटरव्यू?' फोन उचलताच त्याचा पहिला प्रश्न.

'आपला इंटरव्यू कधी खराब जातो का?' फार इंटरव्यूज नाही द्यावे लागलेत खरंतर चांगल्या नोकरीसाठी. त्यात, पहिल्यावहिल्या इंटरव्यूमध्येच पहिलीवहिली नोकरी भेटलेली. माझ्या त्या न सावरलेल्या हृदयावर तेव्हा मी जिंकलेलं एकमेव युद्ध‌.

'ते आहे मात्र.' माझ्या परदेशात जाऊन स्थिरावण्याच्या कल्पनेला त्याने आधीच नाही म्हटलं होतं त्यामुळे जॉईन होत नाही तोपर्यंत सांगायचंच नाही, असं वाटत होतं. तसं एकमेकांची मनं वाचणाऱ्या आमच्यात हे किती दिवसं लपून राहणं शक्य होतं, देवंच जाणे.

'जन्का भेटली होती.'

शेवटच्या वर्षाच्या सुरुवातीपासून तर शेवटच्या वर्षाचा शेवटचा दिवस संपेपर्यंत जन्काचं नाव निघालं नसेल असा एकही दिवस गेला नव्हता. त्यामुळे तो तिला विसरला असेल हे अशक्यंच.

'जन्का, द झुनका भाकर?' काळामागे नेणारं नाव ऐकून त्याने विचारलं.

'हो. ती तिथे काम करते.'

'आत्ता म्हणू नकोस तू जॉईन होतोय तिथे!'

'भेटलेली ऑफर नाकारण्यासारखी नाहीये.'

'पैशाला महत्त्व न देणारे आपण अशा ऑफरला नाकारू शकतो, ज्या ऑफरला हो म्हणून रोज आपण अशा चेहऱ्याला बघू जो आपल्याला भूतकाळाकडे नेईल. ज्या भूतकाळाने आपल्या वर्तमानाला अजूनही सावरू दिलेलं नाहीये.'

'कधीकधी भूतकाळातील व्यक्ती वर्तमानात वेगळ्या रूपात येऊ शकते.' तिचं आत्ता चांगलं वागल्याने तसा राहून राहून फारसा फरक पडणार नव्हता.

'आणि कॉलेजला असणारा बालिशपणा तिच्या डोळ्यांत इतकाही दिसत नव्हता, तिच्या चुकीच्या वागण्याची जाणीव मात्र त्यांत जाणवत होती.' मी मात्र तिचा बचाव करण्यात इतकाही मागं राहत नव्हतो.

'तुझ्या डोळ्यांच्या भाषेवर विश्वास नसता तर आधीच्या दोन ऑफर्स असलेल्या कुठल्यातरी ठिकाणी जॉईन व्हायला सांगितलं असतं.' समीर.

'काहीच होणार नाही रे, तू नको काळजी करू.'

'हां! महीनाभर suspend होता project lab मधून तू आणि तुझा project group त्या मुलीमुळे. हे आठवल्यावर वाटणारच ना काळजी.'

डोळ्यांसमोर एखाद्या movie सारखा शेवटच्या वर्षातला तो दिवस दिसू लागला.

'प्रियांश! प्रियांश! हॅलो.' समीरने माझ्या भूतकाळात हरवून गेलेल्या मनाला भानावर आणलं.

'मी join होतोय. बघुयात काय काय होतं पुढे.' मी असं म्हणताच तो हसला.

'ठीक आहे. हो join, फक्त फालतूचं suspension टाळ यावेळी.' आम्ही दोघंही हसलो.

थोडं आणखी एकमेकांच्या दिवसभरातलं जाणून घेतलं.

'आणि लिहीलेली कविता पाठव.' समीरने फोन ठेवण्याआधी मी आज काहीतरी लिहीलंच असणार हे गृहीत धरत कविता वाचायला मागितली.
.

संध्याकाळचे सात वाजलेले. शनिवारचा दिवस मावळतीकडे झुकू लागला. आकाशात भरून आलेल्या ढगांनी लवकरच पाऊस सुरू होण्याची जाहीर गर्जना केली.

पावसाचं वातावरण असल्याने मी बाईकने जाण्याचं टाळत कॅब बूक केली.

जन्काचा वाढदिवस साजरा करायच्या हेतूने निघालो होतो कुठलंही gift न घेऊन जाता. त्यामुळे, रस्त्यात लागणाऱ्या pastry corner वरून केक घ्यायचं मी ठरवलेलं.

जन्काचा वाढदिवस हे कारण मात्र खूप साऱ्या आठवणींना जागं करून सतावतंय. प्रत्येक आठवणीनंतर डोळ्यांसमोर उभा राहतोय एक 'का?' आणि तो प्रत्येक 'का' मात्र माझ्या निरूत्तर चेहऱ्याकडे बघून हसतोय, मला डिचवण्यासाठी.

आठवणींसारखी दुर्मिळ गोष्ट नाही. जितकी नकोशी, तितकीच हवीहवीशी. जितकी दिलासादायक, तितकीच हळवी.
त्यात, ती तुझी असेल तर विचारायलाच नको. मग वाटतं, आठवणींचा सहवासही वाईट नाही. सावरता आलं नसलं तरी जगणं अशक्य नाही.

कारच्या खिडकीतून दिसणारा बाहेर सुरू असलेला पाऊसही त्या आठवणींना डोळ्यांसमोर आणून त्याची भुमिका निभावण्यात कुठलीच कसर सोडणार नाही, हे जाणवताच मी डोळे मिटून घेतले.

पाऊस असला की
भिजत राहतात त्या आठवणी..
तो, मी आणि
दूर कुठेतरी तू..
जागत राहतात मग रात्रीही...
.

'प्रियांश!' कॅबमधून उतरल्या उतरल्या समोर बघतो तर पावसापासून स्वतःला वाचवत आडोशाला उभं राहून वाट बघत उभी असलेली, 5 फूट 1 इंच इतक्या उंचीची काळा टॉप आणि निळी जीन्स परिधान केलेली गोरीपान बाहुली, रस्त्यावर दिसणाऱ्या कुणाचीही तमा न बाळगता आनंदाने किंचाळली जणू.

मला बघून झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर भरभरून दिसला. तिच्यासमोर येऊन उभं राहताच तिने तिच्या मानेपर्यंत येणाऱ्या केसांना उडवत मला मिठी मारली. अजूनही ती तीच नेहमीची अक्षरा. ना दिसण्यात बदल ना वागण्यात!

'अक्षरा, तुला इथं इतक्या दिवसांनंतर बघून खूप बरं वाटलं!'

'इतक्या वर्षांनंतर असं म्हणायचंय का तुला?' तिचं असं म्हणणं चेहऱ्यावर मिश्किलसं हसू घेऊन आलं.

स्म्रीतिची रूममेट म्हणून तिने गरज असताना खूपदा मदत केली, कधीकधी न मागता सुद्धा.

'तू बंगलोर वरून फक्त जन्काच्या वाढदिवसासाठी आलीये?'
अक्षरा बंगलोरला असते हे जन्काकडूनच कळलं होतं.

'हां, असंच समज.' ती चेहऱ्यावर प्रफुल्लित हास्य आणत म्हटली, फक्त वाढदिवस हे कारण नव्हतंच तर.

'जन्का अजून आली नाहीये. आपण दोघं तिच्याआधी पोहोचलोय, अशी कशी होस्ट!' अक्षरा.

'पावसामुळे अडकली असणार ट्रॅफिकमध्ये.'

'तिच्या लक्षात राहील हा वाढदिवस असं काहीतरी करावंसं वाटतंय. नुसतं जेवन वगैरे काय ते पुन्हा कधी होईलंच सोबत.' अक्षराचं म्हणणं पटण्यासारखं होतं पण कॉलेज संपल्यानंतर लक्षात राहील असा कुणाचा वाढदिवस साजरा केलाच नव्हता. वेगळं काय करावं याचा विचार करता करता तिला हो म्हटलो.

'तू काय देतेय गिफ्ट म्हणून?' मी.

तिने जन्कासाठी आणलेलं गिफ्ट बघताच तिचं कौतुक करावंसं वाटलं. कॉलेजला असताना मी, समीर आणि विभोर जसे होतो तसलं वेडेपण अक्षरात अजूनही टिकून होतं.

'चला तर, आठवणींना उजाळा देऊयात.' लक्षात राहील असं वेगळं काय करावं हे ते गिफ्ट बघताच मला सुचलं.

तितक्यात, जन्का कॅबमधून उतरत आमच्या दोघांसमोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर खूप सारी प्रसन्नता, जी तिला खऱ्या अर्थाने सुंदर बनवत असते. तिने घातलेल्या त्या तिला देखणं बनवणाऱ्या मोरपंखी रंगाच्या ड्रेसकडे माझं लक्षसुद्धा गेलं नाही, इतका तिचा चेहरा प्रसन्न वाटला.

'Sorry, ट्रॅफिक असल्यामुळे थोडा उशिर झाला.'

'आज तुला सगळे गुन्हे माफ!' मी तिच्याकडे बघत हसतच म्हटलो.

कॉलेजमधील जन्का, ऑफिसच्या पॅन्ट्रीमधील जन्का आणि समोर उभी असलेली जन्का या तिघी एकच, हा विचारही माझ्या मनाला पटेना.

'तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्का.'

माझ्या हातातील केक बघून तिला खरंच बरं वाटल्याचं तिच्या चेहऱ्यावर दिसलं. आयुष्यातील या खास दिवसात असल्या छोट्या-मोठ्या गोष्टी आभाळभर आनंद देऊन जातात, हे फार चांगलं जाणून होतो मी.

'Thank you so much!'

मी तिच्या डोळयातून ठिपकाभर काजळ काढत तिच्या मानेखाली लावणार पण तिने तितक्याच काळजीने तिच्या नाजुकशा हाताने माझी मनगट धरली.

'मला... या जन्केला कुणाची बरं नजर लागणार?' माझ्या डोळ्यांत बघत तिची उदासीनता तिने दाखवली.

'तुला लागो ना लागो पण ते चौघं तिळं आहेत की नजर लागण्यासारखे.' मी हसतच तिच्या मानेला बोटावर असलेलं काजळ लावलं. ती काहीच न उत्तरता स्तब्ध राहिली.

'Happy birthday, जन्के.' अक्षरा जन्काला घट्ट मिठी मारत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यांचं मी कशी दिसतेय, ड्रेस कुठून घेतला वगैरे g-talk सुरू झालं.

जन्काला आवडेल अशा ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा हा हेतू मनात ठेवत मी तिच्या नकळत वेळ न घालवता कॅब बूक केली.

'गिफ्ट कुठंय माझं?' जन्का.

'आणलंय, रडू नको नेहमीसारखं.'

'हां, रडावंच लागेल कारण पुढच्या वर्षी आमच्या गिफ्ट्सचा खर्च सुद्धा जीजूंवरच होणार.'

'बोर करू नकोस.' अक्षरा हे वाक्य हसतंच म्हणाली.

'तू लग्न करतीये?' प्रश्न चुकला की काय असं जाणवताच पुन्हा नव्याने मी विचारलं, 'लग्न ठरलंय?'

'हो. इसका बड्डे तो बहाणा हैं!' अक्षरा मात्र जन्काकडे बघून डोळे मिचकावत बॅग मधून तिच्या लग्नाची पत्रिका माझ्या हातात ठेवते.

'पत्रिका वाटायच्या होत्या काही आणि तू भेटतोय म्हटल्यावर मला रहावलं नाही.'

'Destination wedding?' 4 दिवसांचं लग्न ते सुद्धा केरळच्या निसर्गरम्य सान्निध्यात.

'माझ्या होणाऱ्या नवऱ्याची इच्छा. म्हटलं त्याला, त्याची इच्छा मग खर्चही त्यानेच करावा.'

'Love plus arrange?'

'नाही! फक्त arrange. प्रेम काय फुलणारच हळूहळू, सगळं सांभाळत. Arrange असलं तरी इतका खर्च होणं शक्य नाही माझ्या बाजूने, म्हणून जो होईल तो अर्धा अर्धा.'

'तुला सांभाळता येईलच गं. जबाबदाऱ्या सांभाळणं शिकतेय मी अजूनही तुझ्याकडून.' जन्का असं म्हणताच मला आठवलं की स्म्रीति नेहमीच म्हणायची, 'अक्षराचे बाबा ती लहान असतानाच वारलेले पण तरीही ती सगळ्यांसमोर आनंदी, हसतमुख राहते. तिला जमतं जे कुणालाच नाही जमत. रोज नवीन काहीतरी शिकवत असते तिच्या वागण्यातून, आम्ही किती शिकतो हा भाग वेगळा.'

'नशिबवान आहे तुझा होणारा नवरा.' 2 महिन्यांनी असणाऱ्या तिच्या लग्नाला येण्याचं आश्र्वासन वदवून घेतलं तिने, नवीन जॉईनिंग वगैरे कुठलंही कारण चालणार नव्हतं.

'तुझा काय प्लॅन लग्नाचा? की आयुष्यभर वाट बघणार स्म्रीतिची?' अक्षराच्या या प्रश्नाला उत्तर द्यावं तरी काय!

'खरं सांगू, पळतोय या प्रश्नांपासून. कॉलेज संपलं आणि आयुष्य थांबलंच‌. मोनोटोनिक जगणं सुरू आहे थोडक्यात. नोकरी बदलण्याचा विचार तरी आला, तोही परदेशात स्थायिक व्हावं या विचाराने. त्यात तिथे ही भेटली, आज तू, आणि आत्ता इथे रिमझिम पावसात उभं राहून वाटतंय की बदल होणं किती गरजेचं असतं.'

'अर्थात, पण मग या पळवाटा तुझ्या मनाला थोडी पळवणार. एक वेळ येईल की एकटं आयुष्य नकोसं वाटेल मग काय करशील?'

'एकचदा प्रेम होतं जीवनात, याच विचारांत वाढवलंय स्वतःला. प्रेम, लग्न यांचा विचार आत्ता तरी नकोच.'

'स्म्रीति परत आली आयुष्यात तर?'

'हा प्रश्न हसण्यावारी घेऊ की मनाला पटवू ती खरंच येईल?'

'तू अजूनही वाट बघत बसलाय तिची म्हणून पटवून घे. नाहीतर हसण्यावारी घे आणि खूप काही शिकवून गेलं तिचं आयुष्यात नसणं असं समजून विसरून जा तिला.'

अक्षरा इतक्या सहज बोलत होती सगळं काही. ती जाणीव करून देत होती की थांबावं तरी का आणि कशासाठी, स्म्रीति कुठे आहे हे माहिती नसताना रडत बसावं तरी कशाला.

'सगळ्यांचंच कॉलेजमधील प्रेम टिकतं असं नसतं. वेळेनुसार गणितं बदलतात, कधी खऱ्या-खोट्याचा फरक कळतो तर कधी घरच्यांचा विरोध नडतो. थांबून राहण्यात अर्थ नसतो, हे कळायला वेळ लागतोच.' मला 5 वर्षं झालीत आणि मला अजून कळलं नाहीये. अक्षराचं बोलणं कितपत समजवणार होतं, माहिती नाही‌.

'प्रज्ञा मात्र अपवाद ठरली.' जन्का.

'कुठे असते ती सध्या?' मी उत्सुकता दाखवली. खरंतर प्रज्ञा आणि माझ्यात फार काही बोलणं नव्हतंच कॉलेजवेळी. त्यात ती नेहमीच जन्काच्या बाजूने असायची, म्हणून तर विषयच नसायचा.

'युरोप फिरत असते नवऱ्यासोबत.' जन्का.

'कसला नशिबवान म्हणावा प्रज्ञाचा boyfriend. कॉलेजच्या वेळी तिला नुसतं बघूनच मुलांच्या जीभेतून लाळ टपकायची. त्यांत, इतक्या साऱ्यांमध्ये त्या चोमूने तिला पटवणं म्हणजे आठवं आश्र्चर्यच.' अक्षरा हसतच म्हटली.

'कुणाला तरी प्रेम टिकवता आलं म्हणायला गेलं तर. तो चोमू असून त्यांचं प्रेम त्यांनी टिकवलं आणि लग्नही केलं आलेल्या  अडथळ्यांना पार करत. नाहीतर स्म्रीति मात्र प्रियांशला सोडून गेली, तेही इतक्याशा कारणाने.' जन्का.

'तिच्यासाठी ते कारण इतकंसं नव्हतंच.' मला मात्र आजही त्या दिवसाला आठवून गहिवरून येतं.

पुढचे काही क्षणं अबोल होऊन बसले तिघांसाठी. सुदैवाने, कॅब नेमकी तेव्हाच आमच्या लोकेशनवर येऊन पोहोचली.

'कॅब का बोलवली? आपण या ठिकाणीच जेवणार होतो ना!' जन्का निरागस चेहरा करत विचारते.

'तू बस आत.' मी‌.

'पण...' गोंधळलेली जन्का.

'ए जन्के, बस की. किती चौकशी करणार आत्ता!' अक्षराने तिला आत ओढलं‌. त्या दोघी मागे बसल्या आणि मी ड्रायवरशेजारी, पुढे.

'प्रियांश, प्लॅन बनला ना?' अक्षराने असं विचारताच मी हसतंच हो म्हटलो.

'मग ठिके. आपण birthday girl च्या मनातलं जाणूया थोडंसं, destination येईपर्यंत.'

'तुला कॉलेजला असताना सगळ्यात जास्त काय करायला आवडायचं?' अक्षरा.

'अभ्यास करायला.' जन्का हसतच उत्तरली.

'अर्थात, आणि त्यानंतर?' मी विचारलं खरं, पण जाणवलं की जुन्या आठवणी जाग्या होणार!

'तुझ्यावर चिडणं.' ती पुन्हा हसतच म्हटली.

'आणि तू त्याच्यावर कधीपासून चिडायला लागली होती?' अक्षराने असं विचारता मी मात्र कोड्यात पडलो.

'म्हणजे?' मी विचारलं.

पुन्हा काहीतरी नवीन ऐकायला भेटणार होतं, अक्षराचं आजचं भेटणं म्हणजे धुळ बसू लागलेल्या जुन्या आठवणींना साफ करणंच जणू.

'एक खरं सांगू प्रियांश तुला? कॉलेजमध्ये तू सगळ्यात आधी कुठल्या मुलीला आवडायला लागला होता तर तो या जन्केला.'

'काहीही!' जन्का.

'मला पाण्यात बघणाऱ्या मुलीला मी आवडणं अशक्यच!'

'ही तुला पाण्यात बघायला लागली ते दुसऱ्या वर्षाच्या गॅदरींगनंतर.'

'असं त्या गॅदरींगवेळी मी काय वाईट केलेलं हिचं?' मला मात्र खूप मोठ्ठं कोडं पडलं. त्यावर्षी घडलेलं सगळंच आठवायला लागलो.

'तुला ती hottie आठवतेय का माझ्या branch ची?'

'सर्वशरीरसंपन्न! तिचा काय संबंध आत्ता?' गुंता सुटता सुटेना त्यात आणखीन नवीन भर.

'तिने तुला विचारलेलं ना boyfriend होण्याबद्दल!' जन्का असं म्हणताच मला आठवली ती रात्र, departmental day!

'पण तुला कसं माहिती?' अक्षराने भुवया उंचावून विचारताच जन्काच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले.

'मी होते त्यावेळी तिथेच. तिने माझा उल्लेख केला आणि हा जोरजोरात हसायला लागला. याचं हसणं ऐकून मग मी रडत चिडत निघून गेले हॉस्टेलला परत.'

'नंतर हा काय बोलला असेल बरं हे ऐकावंसं कधीच नाही वाटलं का तुला?'

जन्का अक्षराच्या असं विचारण्यावर काहीच नाही बोलली. मी तिला दुखावलं होतं माझ्याही नकळत. तिचं वागणं चुकीचं नव्हतंच तर आणि ना माझं.

'प्रियांश, तू सांगतोस की मी सांगू?'

'तुच सांग.' मला कुठून सुरुवात करावी हेच कळेनासं झालं.

'नको, तुच सांग. तुझे तेव्हाचे जसेच्या तसे शब्द ऐकायला मलाही मिळावेत.'

'खरंतर, मी तिच्यावर हसलो होतो आणि तुझ्यावर तर मुळीच नाही. मी बोलता-बोलता थांबलो होतो त्या मुलीसमोर पण तिला सांगावं तर लागणारच होतं. 'तुझ्या प्रेमात पडावं? इथं, इतक्या अंधारात तू ज्यापद्धतीने माझा हात पकडून मला सांगतीये की तुझं माझ्यावर प्रेम आहे त्यातून तुला नेमकं कसं प्रेम हवंय हे समजतं. मी प्रेमापासून दूर राहण्याचं कारणच तू समोर मांडून ठेवलंय. मला याक्षणी कुठलंही ओझं नकोय, मागण्या पूर्ण करवून घेणारी नकोय, सोबत मिरवणं जमणार नाही. मला हवीय एक मैत्रिण, जिला मी मनातलं सांगू शकेल, जिच्या माझ्याकडून कुठल्या भावनिक अन् शारीरिक अपेक्षा नसतील, जिच्यामुळे इतर मुली मात्र माझ्यापासून दूर राहतील, जिच्या स्वभावात एक कणखरपणा असेल‌. त्यात, मैत्रीपेक्षा न्यारं आणि प्रेमाच्याही पलीकडं नेणारं नातं असेल तर जगण्यालाही अर्थ येतो. जन्का तुझ्याजागी इथे असती तर आमची मैत्रीतरी झालीच असती.' जन्का, मला वाटलं होतं की आपली मैत्री होईल, पण तुझ्यासारखी मैत्रिण भेटणं मात्र नशिबी नव्हतंच.' जन्का ऐकत असताना तिच्या भावना किती दुखावल्या असणार, किती समाधानी झाल्या असणार हे जाणवून घेण्यात आत्ता अर्थ आहे का?

'आणि मी मात्र, त्या दिवसानंतर तुझ्याविषयी तू वाईट असल्याची भावना मनात अगदी खोलवर कोरून घेतली. या तिघींनासुद्धा तसंच भरवत राहिली. मी खूप चुकलेय.'

'कॉलेजचे ते दिवसं, तिथं केलेल्या चुका बोचत राहिल्यात आयुष्यात पुढे तर कसं व्हायचं?' मी जन्काला दोष दिला नाही कधी, तिच्या वागण्याचं तेवढं कोडं होतं.
.

आम्ही destination वर पोहोचलो.

'Oh my god.' Restaurant बघून याव्यतिरिक्त जन्काची कुठलीही reaction अपेक्षित नव्हती.

'Could you be some more dramatic?' माझ्यातला Chandler Bing जागा झालाच.

'OH. MY. GOD.' ती अगदी Janice च्या टोन मध्ये म्हटली आणि आम्हा तिघांनाही हसू आवरलं नाही‌.

CENTRAL PERK लिहीलेल्या दरवाजाला आत ढकलत F.R.I.E.N.D.S. Cafe च्या आत आलो.

तिथलं वातावरण, तिथली सजावट सगळं अगदी कसं प्रत्येक सीझनला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक सेकंदाला जिवंत करून देत होतं.

समोर होता त्या Central perk मधील तसाच couch आणि त्यामागे त्या सहा पात्रांचे potraits.

उजव्या बाजूला गेलं की Monica चं apartment सजवलेलं, अगदी जसंच्या तसं!

डाव्या बाजूला शब्दकोडं भरावेत तसं सहाही पात्रांची नावं असलेलं potrait.

जिन्याच्या भिंतीवर Pivot. Pivot. Pivot. असं ओरडत ओरडत सोफा ओढणाऱ्या Ross चं मोठ्ठं potrait.

हे सगळं बघण्यात हरवून गेलेली, F.R.I.E.N.D.S चं भयंकर वेडं असणारी जन्का मला बिलगलीच.

'Thank you so much, इथं आणल्याबद्दल!' ती इतकं भावूक होईल असं वाटलं नव्हतं.

'Hey, it's Joey. Couldn't I be more caring?' मी असं म्हणताच आम्ही तिघंही हसलो.

वरच्या मजल्यावर एका टेबलमागे Joey doesn't share his food असं डोळे मोठे करत म्हणणाऱ्या Joey चं potrait लावलेलं आणि ते बघून जन्काने तिथेच बसायचं ठरवलं.

'कुणा Gunther ला आवाज देऊन आपली ऑर्डर द्यावी का आत्ता आपण?' अक्षरा.

मेनू कार्ड बघायला सुरुवात केली आणि प्रत्येक पदार्थामागे Joey आणि Monica यांची नावं होती.

'Joey's favourite Pizza with cheese burst!' हे वाचताच मात्र मला हसायला आलं.

'Monica's eventually...' अक्षराला तिचं पूर्ण वाचून होण्याआधीच जन्का थांबवते.

'जिथं आलोय, तिथं असंच असणार ना! We better stick to the routine; we don't want to look stupid.' जन्का.

'And here comes our Monica with the Pep talk.' अक्षरा हसतच म्हटली.

पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच मागवले तिघांसाठी, पोट भरेल इतके. केक कट केला आणि आमचा happy birthday म्हणण्याचा आवाज पूर्ण कॅफेत घुमला.

'Why God why? We had a deal. Let the others grow, not me.' अक्षरा मात्र Joey ची reactions देत म्हटली.

'Jeez! 27 चीच तर झालीस तू, अजून grandma नाही झालीस. You are not over the hill yet!' अक्षरा.

'Everyone around me is getting married or getting pregnant and here I am just cutting the cake.' जन्का .

'ओलेले, होशील तू पण लवकरच आई.' हे मात्र अक्षरा  हसतच म्हटली आणि जन्काने तिच्याकडे रागाने बघत नाक उडवलं.

'हे घे तुझं गिफ्ट, रागूबाई.'  Pivot असं लिहीलं असलेला तो जुना टॉप अक्षराने जन्काच्या हातात ठेवला.

'ठिगळ लावलेल्या कापडामागे एकतर गरिबी दिसते किंवा जपलेल्या खूप साऱ्या आठवणी.' जन्काने अक्षराला घट्ट मिठी मारली आणि स्वतःच्या हाताने फाडलेल्या त्या टॉपकडे बघत असं म्हटली. डोळ्यांतून वाहणारे अश्रू लपता लपवत नव्हते.

'आठवणी जपून ठेवायच्या असतात मात्र त्यांची श्रीमंती ही मिरवायची असते.' असं म्हणत तसाच pivot लिहीलेला नवा टॉप अक्षराने जन्काच्या हातात ठेवला.

'चला, या टॉपमुळे तरी आत्ता तुझ्या आयुष्यात client सोडून कुणीतरी येईल.' मी असं म्हणत भावूक झालेल्या त्या वातावरणाला हसवत मोकळं केलं.

'प्रियांश, याठिकाणी आणून खरंच माझा वाढदिवस खूप खास बनवलास तू.' जन्का.

'Could I get more credit for this?' यावेळी अक्षराने Chandler बनण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पुन्हा हसलो.

'वाढदिवस खास बनवणं याला जमतंच, आणि हे मी शेवटच्या वर्षात असताना जवळून अनुभवलंय. कसला वेडेपणा होता याच्यात!' अक्षरा हसतच आठवण करून देत होती मी स्म्रीतिला तिच्या वाढदिवशीच केलेल्या प्रपोजलची.

तुझ्या जाण्याने उरलेला
हा मैत्रीचा धागा, तुझ्यामुळेच
तुलाही बांधून ठेवतोय
तुझ्याही नकळत, तुझ्यासाठीच

'आजचा दिवस मात्र त्यादिवसापेक्षा खूप वेगळाच कारण आत्ता असं काही करण्याचं सुचत नाही. जन्काला आनंद देऊ शकलो आज हेच पुरेसं.'

कॉफी प्यावीशी वाटली आणि मेनूतली नावं वाचून ती तशीच असतील का हा प्रश्न मनात आला. तरीही आम्ही तिघांनी Chandler's Caramel Coconut Latte, Rachel's Matcha Latte, Monica's Midnight Mocha Cold Brew tea मागवलं. चव कशी लागली याला महत्त्व न देता फक्त पिण्याचा आनंद घेतला.

खूप सारे फोटोज् काढून आठवणीही साठवल्यात आणि शेवटी तेथून बाहेर निघालो.

अक्षरा रात्रभर जन्काकडे थांबणार होती आणि सकाळ होताच पुढच्या प्रवासाला लागणार होती‌. तिने पुन्हा लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं आणि मला आणण्याची जबाबदारी जन्कावर सोपवली.

Image Source: Guelgram



Tuesday, 3 September 2019

भाग तेरावा

भाग तेरावा: कॉलेजचं दुसरं वर्ष


Image Source: Guelgram


कॉलेजच्या गॅदरींगचे दिवसं सुरू होते. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा. जसे त्या आठवड्यात चॉकलेट डे ते व्हॅलेंटाईन डे असे डेज साजरे व्हायचे. तसेच कॉलेजला सुद्धा वेगवेगळे डेज असायचे. ट्रॅडिशनल डे, मिसमॅच डे, 'आवाज कुणाचा' असा कल्लोळ माजवणारा डिपार्टमेंटल डे आणि आणखीही काही डेज होतेच.

तो दिवस होता साडी डे आणि टाय डे. नववारी, सहावारी  पासून तर पैठणी, गुजराती, बंगाली पर्यंत वेगवेगळ्या साड्यांमध्ये वावरणाऱ्या सुंदर दिसत असलेल्या मुली. शर्टवर टाय चढवून मिरवत असलेले मुलं. सुंदरता दर्शवणारा तो दिवस.

दुसऱ्या वर्षात असणाऱ्यांसाठी सर्वाधिक उत्साहाचं वातावरण होतं. आधीच्या वर्षात fresher चा टॅग असल्याने फार मनमोकळा वावर त्यांचा नव्हता. म्हणूनच एक वेगळाच जल्लोश, वेगळीच उर्जा त्यांच्यात सामावलेली दिसत होती. तिच्यात संचारलेला उत्साह मात्र फक्त एकासाठीच ह़ोता. त्याच्यासाठीच तर तिने साडी नेसली होती. एरवी, इतर मुलींप्रमाणे स्वतःला झगमग मिरवण्याची तिला सवय नव्हती, गॅदरींग असो वा नसो.

त्या खास दिवसासाठी तिच्या अंगाच्या गव्हाळ रंगाला शोभून दिसणारी अशी आईची एक खास साडी ती घरून घेऊन आली होती.

तिच्या नेहमीच्या पहाटेच्या वेळात उठून ती साडी नेसून तयार होत होती. रूममेट्सला शंभरदा विचारलं की ती कशी दिसतेय आणि तितक्याच वेळा त्यांना पदर नीट करून दे, पिन नीट लावून दे, केस मोकळे राहू देऊ का की आपण बाहेरून गजरा मागवायचा अगदी भंडावून सोडलेलं. पुन्हापुन्हा आरशात बघत होती. तिच्यात साडीविषयी वेगळीच उत्सुकता होती, त्यादिवशी.

तिच्या रूममेट्सदेखील तयार होतंच होत्या पण स्वतःला मिरवण्यासाठी, शंभर जणांकडून तरी स्वतःचं कौतुक करवून घेण्यासाठी. ती मात्र स्वतःला सजवत होती फक्त त्याच्यासाठी!

11 च्या रेसेसच्या वेळात Ladies Common Room (LCR) च्या बाहेर समोरील स्टेजवर आणि त्या स्टेजसमोर नव्याने बनत असणाऱ्या मोकळ्या ऑडिटोरीयमवर सगळंच कॉलेज जमलेलं जणू.

'क्या बात!' तिला पाहताच तो असं म्हटला आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी smile आली.

'Thank you.' तो तिने नेसलेल्या साडीमुळे तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होता हे तिला वाटलं.

तो मात्र नेहमीप्रमाणे कॉलेजचा शर्ट घालून आलेला. त्यावर चढवलेला टाय मात्र कॉलेजचा नेहमीचा टाय नव्हता. महागडा आणि तितकाच branded. त्यात शर्टच्या वाळलेल्या बाह्या त्याच्या handsomeness ला macho look देत होत्या.

तिला मात्र काही सुचेना त्याचं कौतुक करायला. फक्त बघत राहिली एकटक.

सगळेच एकमेकांसोबत उभं राहून फोटो काढत होते. तिनेही त्याच्याजवळ जात त्याला विचारलं सोबत एक फोटो काढण्यासाठी.

तिच्या डोळ्यात भरलेलं ठिपकाभर काजळ त्याने त्याच्या बोटाने काढलं आणि तिच्या मानेखाली लावलं. ती आश्चर्याने त्याच्याकडे एकटक बघू लागली. त्याला तिची प्रश्नार्थक नजर कळली.

'तुझ्या चेहऱ्यावर असणाऱ्या चौघं तिळांना कुणाची नजर नको लागायला.' असं म्हणत तो हसला. ती खरंतर लाजली. त्याच्याकडून असं कौतुक ऐकून मात्र तिने स्वतःलाच सांगितलं की त्यालाही ती आवडते. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

फोटोसाठी पोज द्यायला ते एकमेकांजवळ उभे राहिले, एकमेकांच्या हातात हात अडकवून. जवळपास चार-पाच वेगवेगळ्या प्रकारच्या डिजीटल कॅमेऱ्यांचा फ्लॅश पडला आणि ती खुश झाली.

तो तिला आवडायचा कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून. तेव्हापासून एकाच वर्गात असल्याने रोज त्याला चोरून बघत असे ती. त्याच्या जवळ असल्याचा तिला भास होत असे. दुसऱ्या वर्षात येऊन त्या गॅदरींगच्या दिवसापर्यंत ती त्याच्यासोबत बोलण्याचा बहाणा बनवत असे. Graphics चं practical ते FIM(Financial and Industrial Management) चं lecture असे बरेच क्षणं वेचलेत तिने पण तो मात्र त्याच्या दुनियेत रमलेला असायचा. त्याला जाणीव झालीही असेल तरी तो नेहमीच त्याच्या अंदाजात बोलायचा अगदी एखाद्या जवळच्या मित्रासोबत बोलावं तसं.

तिला क्षणांमध्ये, स्वप्नांमध्ये रमवून मात्र जायचा तो. त्याच्याही नकळत.

क्षणंच ते,
निःशब्द असे काही
निरागस काहीसे
वेचलेले असे काही
वेडे काहीसे
जपलेले असे काही
जगावेत काहीसे

त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं दिसणं सगळं कसं परफेक्ट होतं. त्याच्या स्वभावात ते सगळे गुण होते जे एक मुलगी आपल्या जोडीदारात शोधत असते.

कॉलेजमधील त्यांच्या सोबतच्याच काय तर ज्युनियर आणि सिनियर मुलीसुद्धा त्याच्यासाठी झुरत असत.

'तू माझ्यापेक्षा लहान नसता तर...' असं तिसऱ्या वर्षातल्या एका मुलीने म्हटलंही होतं, अर्धवटच. नंतर, रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच मुलीकडून राखी बांधून घेतलेली त्याने.

'यापुढे संपूर्ण कॉलेजमध्ये माझ्यावर तुझा हक्क जास्त असणार, दी.' असं त्या सिनियरला म्हटलेला तो.

आत्ता, अशा स्वभावाचा मुलगा आपल्या आयुष्यात कुणाला नको असणार. अर्थात, कॉलेजमधील भाऊ म्हणून नव्हे पण जोडीदार म्हणून!

तिलाही तो हवा होता. हे साडी वगैरे त्याचंच निमित्त. नाहीतर, साडी नेसायला जितका वेळ तिने घालवला होता तेवढ्या वेळात तर तिने Computer Graphics या विषयाचं Technical publications चं पुस्तक दोन वेळा वाचून काढलं असतं. त्याक्षणी मात्र, तो वेळ सार्थकी लागल्याची जाणीव तिला झाली.

साडी डे - टाय डे संपला होता जेवनाचा ब्रेक होईपर्यंत. खरंतर, संपवला होता. गोंधळ वाढला की मग गर्दी पांगवण्यासाठी वॉचमन लोकं सज्ज असायचे. त्यामुळे, तो 'डे' संपवून झाला.

त्याच रात्री होती musical night. गाणं म्हणणाऱ्यांची ती हक्काची रात्र. वर्षभर practice करून गायला भेटणारी ती त्यांची रात्र. पण बघणाऱ्यांची मात्र गर्दी कमी. अरसिकता म्हटलं तरी काही वावगं ठरणार नव्हतं.

तीसुद्धा रूममध्येच होती. सकाळी काढलेले फोटोज सगळ्यांकडून गोळा करून आणलेलेत, पेनड्राईव्ह मध्ये. तिच्या रूममेट्ससोबत ती लॅपटॉपमध्ये ते फोटोज बघत बसली होती.

'अह्हा! प्रियांशसोबत तुझे फोटोज फारच सुंदर आलेत. अगदी couple clicks वाटत आहेत.' असं ऐकताच ती मनातल्या मनात एखाद्या परीप्रमाणे उडत होती मनसोक्त.

'गप गं! काहीतरीच बरळू नको‌.' चेहऱ्यावर मात्र कुठलेही भाव न दाखवता ती उत्तरली.

त्या रात्री तिला झोप लागलीच नाही. सगळीकडे फक्त त्याचेच विचार.

चार कौतुकाचे शब्द ऐकणं
गालातल्या गालात हसणं
त्या शब्दांत गुंतून जाणं
अबोल राहूनही व्यक्त होणं
ते नुसतं लाजत राहणं..
प्रेम, आणखी काय दुसरं!

.

दुसरा दिवस उजाडला. खरंतर, डिपार्टमेंटल डे उजाडला होता. कॉलेजचं वातावरण रंगू लागलं होतं. प्रत्येक डिपार्टमेंट त्यांनी प्रिंट करून आणलेल्या T-shirt वा sweat shirt ला घालून वावरू लागला होता.

गॅदरींगचा तो दिवस स्पर्धेचा, स्वतःचं कौतुक मांडण्याचा.

सगळेच रात्रीच्या departmental competition साठी कॉलेजभर दंगा करू लागले होते. स्वतःचं डिपार्टमेंट कसं सगळ्यात भारी याची चर्चा रंगू लागली, हाईप वाढत होती. तसंही, कॉलेजचा इतिहास ओरडून सांगत होता की जिंकणार मेकॅनिकलच होतं, इतरांनी फक्त सहभागी होण्याचं प्रमाणपत्र घेऊन जावं. उत्सुकता सगळीकडे होतीच. इतिहासाला बदलण्याची क्षमता सुद्धा होतीच, नाही म्हटलं तरी.

तिला मात्र ना आवाज कम्प्युटरवाल्यांचा ऐकायचा होता आणि नाही गर्दी करणाऱ्या मेकॅनिकलवाल्यांचा. तिला ओढ होती फक्त त्याला बघत राहण्याची, तिच्या मनातील सगळं काही सांगून टाकण्याची.

त्याआधी तिने खूपदा प्रयत्न केलेलेत त्याच्याविषयी असणाऱ्या भावना त्याच्यासमोर बोलून दाखवण्याचा. प्रत्येकवेळी मात्र ती अडकत राहिली.

बोलता बोलता अचानक थांबायची
अगदी तोंडाशी असायचं मनातलं सगळं
म्हणायची सांगून टाकेन सगळं काही
पण असंच सारं काही राहून जायचं
भीती, निराशा वगैरे सगळे विचार
आणि मग मन तिला थांबवायचं
ह्रुदयाला आवरतं घ्यायला सांगायचं

सरळ, सोप्या, नीट अशा आयुष्यात मजा नव्हती पण आयुष्याची ही प्रेमळ बाजू मात्र मनाला ठेच लावत होती.
कारण मनही त्याच्यातच रमत होतं. जणू तापलेल्या जमिनीवर थंडगार पावसाचे टपोरे थेंब पडावेत इतकं आल्हाददायी वाटत होतं.

म्हणून त्या रात्री ती मनाने तयार होती. त्याला सांगायचंच काहीही करून, असं म्हणत रूममधून बाहेर पडली.

जिथे सगळ्याच स्पर्धा त्या वर्षापर्यंत रंगत आल्या होत्या, ते College Square पुन्हा एकदा एका नव्या बॅचसोबत सज्ज होतं, एका नव्या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी. कदाचित, मेकॅनिकल सोडून कुठली दुसरी ब्रांच जिंकताना बघण्यासाठी.

ती तिथे पोहोचताच एके ठिकाणी तिघी रूममेट्ससोबत बसली आणि तिची नजर त्याला शोधू लागली.

अर्धा तास गेला. तिला काही तो दिसला नव्हता. तितक्यात स्टेजमागे त्याला बोलावणं आलं आणि तिला तो दिसला. त्याला बघताच तिचा चेहरा उजळला. त्या 'WE EAT. WE SLEEP. WE CODE.' असं लिहीलेल्या निळ्या रंगाच्या full sleeve t-shirt मध्ये कसला handsome दिसत होता तो.

'प्रियांऽश!' असं मुलींच्या बाजूने खूप सारे आवाज आले. सगळींना वेड लावणारा तो, प्रियांश. जो तिलाही वेडं करून गेला होता.

दहा मिनिटांनी पुन्हा स्टेजमागून बाहेर येत तो मुलींसमोरून जाऊ लागला. पुन्हा घोळक्यांतून 'प्रियांऽश' असा त्याच्या नावाचा नाद घुमला.

तो स्टेजसमोर असणाऱ्या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत जाऊन उभा राहिला, त्याच्या best friends सोबत.

पुढचा तासभर ती जणू त्याच्याकडेच बघत होती. समोर स्टेजवर त्यांचं कम्प्युटर डिपार्टमेंट हारण्याची चिन्हं दिसू लागल्याची तिला तसूभरही जाणीव नव्हती. तिला फक्त प्रियांश दिसत होता.

नंतर, काहीवेळाने तो फोनवर बोलून square च्या बाहेर पडला. तीसुद्धा तिघींना 'आलीच' म्हणत बाहेर पडली.

नजरेआड होण्याआधी त्याला गाठायचं आणि मनातील भावना त्याच्यासमोर मांडून द्यायच्या. गुडघ्यावर बसून 'Will you be my Valentine?' असं विचारायचं, ती ठरवते मनी.

बाहेर कुणीच नव्हतं, त्या किर्र अशा आवाजाशिवाय.

ती इकडं तिकडं बघू लागते आणि student section समोर प्रियांश EnTC च्या सर्वशरीरसंपन्न मुलीसोबत उभा असतो. ती त्या दोघांनाही बघू शकेल पण त्या दोघांपासून लपून अशी उभी राहते. प्रियांश आणि त्या मुलीत चार-पाच इंचाचं अंतर होतं. त्या दोघांना असं जवळ उभं बघून तिच्या ह्रुदयात धडधडलं. प्रियांशचे दोघं हात तिच्या हातांत घेत ती
मुलगी त्याच्यासोबत बोलत असते.

'I love you, प्रियांश.'

'वेडीयेस का? तुला माझ्यापेक्षा खूप चांगला मुलगा भेटेल.'

'तुझ्याइतकं चांगलं आहे तरी कोण या कॉलेजमध्ये?' प्रियांश त्या मुलीच्या असं बोलण्यावर काहीच उत्तरला नाही.

'तुला कुणी दुसरी मुलगी आवडते का?'

'नाही, असं नाही काही.'

'असंच आहे, मी बघितलं आज.'

'काय?'

'जन्का आणि तू आज सकाळी फोटोसेशनवेळी LCR समोर कसं एकमेकांत गुंतले होते हे बघितलं मी.'

'कोण?'

'जन्का! तिच्या डोळयातून काजळ काढून तिच्या मानेला लावलेली ना तू. तसंही, तिला कुठे कुणाची नजर लागणार आहे.'

हे ऐकून मात्र तो जोरजोरात हसू लागला. त्याचं हसणं थांबत नव्हतं. ती EnTC ची मुलगी त्याला 'हसतो काय?' असं विचारत होती पण त्याला काही हसू थांबवेना.

त्याचं तिच्यावर असं हसणं ऐकून जन्काच्या डोळ्यांतून मात्र ढळाढळा अश्रू गळू लागतात. तशीच ती मागे वळून त्यांना न दिसता मालरोडच्या गेटने हॉस्टेल परतते. सामसूम असलं तरी रूममध्ये येईपर्यंत ती स्वतःला सावरते.

रूममध्ये येताच ती रडू लागते. स्वतःच स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करू लागते. सगळं व्यर्थच!

आयुष्याचे निवडक क्षणंही आपणांस सोडून जातात. मोरपंखी वाटत असतानाच हवेचा मार्ग बदलवतात.
का सतत 'मी कशी 'आधी' स्वच्छंदी जगत होते' या जाणीवेनं मनातील विचार अस्तित्वाला पोखरून टाकतात?

असल्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ काय जिथं आपल्याला सुद्धा आपली किंमत राहत नाही.
इतका खोलवर विचार करूनही मनाची तगमग मात्र अगदी तशीच राहते. जणू पुन्हा 'त्या' व्यक्तीचं वागणं विसरता येत नाही.

ती रात्र खऱ्या अर्थाने मोठी होती. एकेक क्षण एकेक प्रहरासारखा जात होता.

जन्काचं पहिलं प्रेम अपूर्ण राहिलं होतं!

Thursday, 29 August 2019

भाग बारावा

भाग बारावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


कॉलेजचं त्या दिवसाचं शेवटचं लेक्चर संपलं. 4.30 वाजलेले आणि प्रियांशची पाऊलं वर्गातून project lab कडे वळण्याआधीच HOD सर दोन लेक्चरर्ससोबत वर्गात आलेत.

अर्थात, project lab मधील suspension संपल्यानंतर तो आणि त्याचा project group पहिल्यांदाच lab मध्ये जाण्यासाठी उत्सुक होते. पण HOD सरांचे विचार काहीसे वेगळे होते त्यादिवशी.

'Perhaps, this is the best batch in my entire career. Your academics, curricular activities and interest in learning will help you to get a good job in campus interviews .....'

HOD सरांचं त्यावेळी वर्गात येण्याचं कारण placement संदर्भात होतं.

प्रियांशला जाणीव होती की, त्यांच्या कॉलेजला येणारी प्रत्येक IT company ही 60% पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांसाठीच येणार होती. त्याला संधी भेटणार नव्हती थोडक्यात त्या semester ला येणाऱ्या कंपनींसाठी पण त्यामुळे तो निराश नव्हताच मुळी. त्याचं ध्येय फक्त शेवटच्या वर्षात 67% काढण्यावर असणार होतं. नोकरी मिळवण्याबाबत त्याला स्वतःवर विश्वास होता.

सरांच्या बोलण्याकडे प्रियांशचं अर्धवट लक्ष होतं. पुढची 10 मिनिटे त्यांचं बोलणं काही थांबणार नव्हतं. तो सोडून सगळेच सरांना ऐकण्यात गुंतलेले.

स्म्रीति डाव्या रांगेत त्याच्या पुढच्या बेंचच्या शेजारी बसली होती. तीसुद्धा इतरांप्रमाणे सरांचं बोलणं मन लावून ऐकत होती. तिच्यासाठी मात्र एक सुवर्णसंधी होती, जी तिला गमवायची नव्हती.

प्रियांश तिच्या चेहऱ्यावर दिसणारे हावभाव टिपण्यात गुंतणार तितक्यात त्याला समीरचा SMS येतो.

'In project lab?' समीरला वेगळीच उत्सुकता होती project lab विषयी. प्रियांश आणि त्याच्या group ला नव्याने कुठं बसावं लागणार याचं प्रियांशपेक्षा जास्त tension समीरलाच होतं.

'नाही रे. वर्गातच!' प्रियांशने SMS चा reply केला.

'का?'

'Placement preparation करायचं म्हणत आहेत.'

'ते कसं?'

'आज aptitude test असणार आहे पहिलीवहिली.'

'Best luck.'

'HOD सर बोलण्याचं थांबवतील यासाठी best luck दे. :-D'

'हा हा! Enjoy.'

'Thanks! :D'

प्रियांश पुन्हा स्म्रीतिकडे बघू लागला.

स्पर्श तुझ्या चेहऱ्यास
होता त्या लटेला
तू अलगद सावरताना
मी फक्त बघत रहावं..

शोभून दिसणारी निरागसता
हसून मजकडे बघता तू
प्रेमाच्या नव्या व्याख्येला
स्वतःहून मी मांडत रहावं..

स्म्रीतिचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि ती त्याला सरांकडे लक्ष देण्यास खुणावते. तो मात्र शब्दांच्या जाळ्यात वेळ घालवू इच्छित होता.

'... so, all the best.' त्यांच्या मनगटावर असणाऱ्या घड्याळाकडे बघत ते पुढे म्हटले, 'And, today's project session is scheduled at 5.45 to 7.45. Girls who will be attending are allowed to reach their hostel before 8, instead of 7.'  त्यांचं बोलणं संपवून HOD इतर दोघं लेक्चरर्सना काही instructions देत वर्गाबाहेर पडलेत.

Question paper आणि answer sheet हातात येताच प्रियांशने question paper वर एक नजर फिरवली. एका तासात 100 प्रश्नांची उत्तरं सोडवायची होती.

प्रियांशसाठी कठीण नव्हता एकही प्रश्न. कॉलेजमध्ये होणाऱ्या virtual placement स्पर्धेत तो तिसऱ्या वर्षी finalist होता. फक्त समीरच त्याच्यापेक्षा सरस ठरलेला संपूर्ण कॉलेजमधून. Aptitude test, GD, debate, interview या साऱ्या गोष्टी त्याच्यासाठी मुळीच कठीण नव्हत्या. कमतरता होती ती 60% ची. भीती होतीच, नाही म्हटलं तरी.

उत्तरं सोडवता सोडवता त्याचं लक्ष अधून मधून स्म्रीतिकडे जात होतं. एक वेगळंच दडपण दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर. कदाचित, प्रत्येक परीक्षेला ती इतक्याच गंभीरतेने घेत असणार. पण का? शांततेत, मन हलकं ठेवूनसुद्धा परीक्षेला सामोरं जाता येतंच ना!

काय काय बदल करावे लागणार या मुलीमध्ये जेणेकरून आयुष्याला आनंदात जगू शकेल?

तो तिला काहीतरी सांगू इच्छित होता त्या संपूर्ण तासाभरात पण तिने एकदाही वळून बघितलं नाही. दोनदा पेनही खाली पाडला त्याने मुद्दाम जेणेकरून ती विचलित होईल पण व्यर्थ. शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत तो A, B, C, D चे गोल भरता भरता तिच्यावर लक्ष ठेवून असतो की अंशतः का असेना एकदा तरी ती मागे वळून त्याच्याकडे बघेल.

वेळ संपते. Lecturer सर्वांच्या answer sheet जमा करून वर्गाबाहेर पडताच प्रियांश ओरडतो.

'Oh shit!'

सगळा वर्ग त्याच्याकडे बघत असतो.

'काय झालं प्रियांश?' शेजारी बसलेल्याने विचारलं.

'मी answer sheet वर नाव नंबर लिहायला विसरलो.'

जन्का त्याच्याकडे रागाने बघत प्रज्ञाला म्हणते, 'हा इतका का नाटक करतो? सगळीकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं विनाकारण. Attention seeker!'

स्म्रीति मात्र मनातल्या मनात त्याला बुद्धू म्हणत त्याच्याकडे बघून हसत इतर तिघी project partners सोबत project lab कडे जाण्यास निघते.

'एवढं ओरडून सांगायची काय गरज होती? गेला असता तो lecturer मागे.' जिन्याच्या पायऱ्या उतरता उतरता जन्का प्रियांशविषयी बोलू लागली.

'आहेच तो तसा, आपण त्याच्याबद्दल का बोलतोय आजकाल इतकं!' प्रज्ञा विषय थांबवण्याच्या प्रयत्नात विषय वाढवत होती.

'आत्ता ते तू स्म्रीतिला विचार, ती सांगेल का म्हणून.' जन्का.

'मी स्वतःहून यानंतर त्याचा विषय कधीच काढणार नाही, शब्द माझा.' तसंही स्म्रीतिने त्याचा विषय स्वतःहून काढलाच नव्हता कधी.

'आणि असं काही वेगळं वागू नको म्हणजे आम्हालासूद्धा त्याच्याबद्दल बोलायची गरज येणार नाही.' स्म्रीति जन्काकडे बघते. तिला जन्कावर राग येत होता, चिडावंसं वाटत होतं. मात्र, काहीही न उत्तरता ती चालू लागते.

Project lab च्या दारातच प्रियांश दिसला. तिने त्यावेळी त्याच्याकडे बघणं टाळलं. डोळ्यांतले भाव त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करू लागली.

प्रियांशच्या project group ला त्यांच्या आधीच्याच जागेवर बसण्यास सांगण्यात आल्यावर चौघंही आश्र्चर्यचकित पण खुश होते.

Project lead असणाऱ्या मानसला मात्र रहावलं नाही.

'जन्का, आम्हाला इथंच बसायचं होतं तर मग आमच्या suspension चा तुला काय फायदा झाला?' मानस असं बोलताच ती पुन्हा धावून जाईल, आरडाओरडा करेल असंच सगळ्यांना वाटलं होतं.

'महिन्याभरातील 11-12 sessions तुमची तोंडं बघायला लागली नाहीत याचं समाधान.' इतकं बोलून थांबेल तर ती जन्का कसली!

'आणि बसण्याचा विषय म्हणशील तर HOD सरांचा आवडता असलेला तुझ्या project group मध्ये आहे म्हणून partiality व्हायचीच होती. Suspension तर फक्त त्यांचा दिखावा होता.' जन्का मात्र शांतपणे तिखट मारा करू इच्छित होती.

'दिखावा कुणी केला हे सगळ्यांनी बघितलंय...' मानस अजून काही बोलणार त्याआधीच प्रियांशने त्याला शांत राहण्यास भाग पाडलं.

'गप बस रे. अजून त्रास नकोय विनाकारण.' मानसला थांबवून तो तिच्याकडे बघत म्हटला, 'Sorry.'

'You should be.' हे बोलताना तिच्या डोळ्यांतला राग त्याला घाबरवून गेला.

स्म्रीति मात्र computer screen समोर बघत काही घडत नसल्यासारखं दाखवत होती. तिला वाद नको होता किंवा जन्कासमोर तो.

महिना संपला पण वर्ष कधी संपणार, हाच विचार येत होता त्याच्या मनात.
.

दुसऱ्या दिवशी दुपारी 2.30 वाजता lecturer वर्गात test च्या answer sheets वाटत असतात.

'नाव लिहायला कोण विसरून गेलंय?' Lecturer असं विचारताच सगळ्यांच्या नजरा प्रियांशकडे वळतात.

'सर, मी विसरलो होतो.' प्रियांशला वाटलं की फार काही फरक पडणार नव्हता कारण तसंही practice tests असल्याने गंभीरता फार नसणारच होती.

'प्रियांश? अजून कुठे कुठे आणि कशा कशा चुका करणार आहेस तू?' Lecturer मात्र त्यांची नाराजगी लपवू शकले नाहीत. Project lab मधील Suspension आणि आत्ता हे असं बेजबाबदार वागणं, प्रियांशचं गणित बिघडल्यासारखं वाटू लागलं होतं सगळ्यांनाच.

'Sorry Sir!'

'Sorry? तुला एकही मार्क दिला नाहीये मी.' प्रियांशच नव्हे तर सगळेच थोडं गोंधळले होते.

'डोक्यातून गैरसमज काढून टाका सगळ्यांनीच की practice tests तर आहेत काय फरक पडणार. फरक पडेल, हे लक्षात असू द्या. तुम्हाला placement interviews साठी तयार करावं म्हणून ही उठाठेव आहे. If you are not taking these tests seriously then you won't be allowed for the college placements.'

वर्गात भयानक शांतता पसरलेली.

'आणि तुमच्या या performances तेव्हाही ध्यानात ठेवल्या जातील, for the preferences.' प्रियांश काहीही न उत्तरता त्याच्या जागेवर बसतो.

'स्म्रीति, congratulations! You have scored 94 marks. Keep it up.'

स्म्रीति पहिली आली होती. तिच्यात आणि दुसऱ्या आलेल्या student मध्ये तब्बल 12 marks चा फरक होता.

पण खरंतर, ती तिला मिळालेल्या marks ने अचंबित होती.

कॉलेज सुटल्यावर रूममध्ये जन्का स्म्रीतिवर चिडचिड करत होती.

'तू तर 75 questions attempt केलेले ना? मग 94 marks कसे मिळालेत?'

स्म्रीतिलाच कळत नव्हतं तर ती जन्काला काय उत्तर देणार होती.

'थोडक्यात, तो प्रियांश तुला competition च्या नावाखाली आमच्याशी खोटं बोलायला सुद्धा शिकवतोय तर.' जन्काचा राग दिवसेंदिवस वाढत होता. स्म्रीतिला मात्र काय करावं, कसं वागावं हेच कळेनासं झालं होतं. त्यात प्रियांशची तिला फार काळजी वाटत होती, ती वेगळी.

कसंतरी दोन पोळ्या खाऊन स्म्रीति रात्री 9 वाजता हॉस्टेलमागील बाकावर येऊन बसली होती.

'असं कसं विसरू शकतो तू?' प्रियांशला तिने फोन केल्यावर लगेचंच विचारलं.

'कधी नव्हे असं घडलंय. मी काहीच सांगू शकत नाही का झालं असं.'

'तू ठीक आहेस ना?'

'अगदी! तसंही 60% आहेत कुठे माझे जे कुठल्या चांगल्या कंपनीसाठी applicable होऊ देतील.'

'या semester मध्येच cover करशील तू 60% म्हणून असा धीर नको सोडू.'

'तू कशातून तयारी करतेस?'

'R. S. Agarwal.'

'नको.'

'तेच तर पुस्तक कामी येणार आहे आपल्याला आणि तू नको म्हणतोय?'

'तुला IT कंपनीत नोकरी हवीये की बॅंकेत?'

'म्हणजे?'

'म्हणजे इतकं पुस्तक वाचायला वेळ कुठे आहे आपल्याकडे? Google वर शोध ज्या त्या कंपनीचे sample papers.'

'होईल तेवढ्याने?'

'सहज!' प्रियांश तिला विश्र्वास देत होता.

असाच काहीसा अविश्वसनीय result शेवटच्या वर्षाचा लागला तर‌! तिला ठाऊक होतं मात्र असं काही होणार नव्हतं. मेहनत करावीच लागणार होती, तीसुद्धा खूप सारी.

त्यात जन्काला सहन थोडेच ना होणार होतं इतक्या सहज.

'जन्का आज पुन्हा चिडली.'

'का? तुला 94 मिळालेत म्हणून?'

'खरंतर, काल test नंतर जेव्हा रूममध्ये आम्ही discuss करत होतो तेव्हा मी म्हटले होते की मी 75 च प्रश्न सोडवू शकली.'

'तिला वाटतंय की तू खोटं बोललीस म्हणून चिडली ती?' आणि दोष त्याला देत होती हे मात्र स्म्रीति त्याला सांगू शकणार नव्हती.

'हो. मी खरंच 75 प्रश्नं सोडवले होते रे.'

पुढचे 10 सेकंदं दोघंही काहीच नाही बोलले. ती 10 सेकंदांची शांतता 10 तासांची भासत होती.

काय बोलावं तिला कळत नव्हतं. ती जन्कापासून दूर होऊ इच्छित नव्हती. कितीही नाही म्हटलं तरी स्म्रीतिला तिची सवय झाली होती. 3 वर्षांची ती सवय, पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत असणारी. एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय सुटावीशी वाटत नाही आणि सुटली की होणारा त्रास असह्यच. व्यसनच एकप्रकारे!

तो मात्र पुरता अडकला होता. जन्काचं वागणं समजण्यापलीकडे होतं. शेवटचं वर्ष शांततेत पार पडावं असं वाटत असलं तरी त्याला जाणवायला लागलं होतं की जन्कामुळे तरी गाजणारच.

खरंतर 94 मार्क्स त्याला मिळाले होते. स्म्रीति तिचं नाव लिहायला विसरली होती, तो नव्हे. प्रियांशने ठरवलेलं की तिला नाही सांगायचं. ती शांतता मात्र त्याला सहन होईना.

त्याने तिचं नाव टाकलं नसतं तर काय झालं असतं? तिला तसं test सुरू असताना त्याने बराच प्रयत्न करून पाहिला तिचं लक्ष वेधून घेण्याचा पण ती पुर्णतः गुंतलेली प्रश्नांची उत्तरं सोडवण्यात‌.

'94 मार्क्स तुलाच मिळाले आहेत. तुझा काहीतरी गोंधळ झाला असेल. एवढा विचार नको करू.' प्रियांश.

'ठेवते मी फोन, bye.' स्म्रीति मात्र काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला पटतंच नव्हतं. त्यामुळे न उत्तरता ती फोन काटते.

काहीवेळ स्म्रीति तिच्यासमोर काहीही न दिसणाऱ्या अंधाराकडे बघत बसली. तो न दिसणारा अंधार मात्र स्वतःची जाणीव करून देत होता. मनाला न सुटणारी प्रश्नं आणि डोळ्यांना न दिसणारा अंधार, सारखेच.

रूममध्ये पोहोचल्यावर जन्का पुन्हा तेच बरळू लागली. तेच पुन्हा-पुन्हा ऐकून स्म्रीतिची चिडचिड होऊ लागली होती पण तिने काहीही न उत्तरण्याचं ठरवून टाकलेलं. प्रियांशचा विषय तिला रूममध्ये तरी नकोच होता.

'जर तुला वाटतंय स्म्रीति तुझ्यासोबत खोटं बोलतेय तर दोष प्रियांशला का देतेय? त्याला तर एकही मार्क नाही मिळाला ना?' अक्षराने जन्काला विचारलं.

'काय? बोल ना, का त्रास होतो तुला त्याचा?' अ‌क्षराने असं विचारताच जन्काला काही बोलवेना. लपवून ठेवलेला तो क्षण, ती वेळ तिला कुणालाच सांगायची हिंमत नव्हती, त्या तिघींनासुद्धा नाही.

आत होणारी घुसमट आणि बाहेर होणारी चिडचिड सुचवत होत्या जणू की वाईट आठवणी इतिहासजमा होत नसतात कधी.

Image source: Guelgram


Saturday, 3 August 2019

भाग अकरावा

भाग अकरावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


Project lab मधील suspension अजूनही असल्याने प्रियांश लायब्ररीत वेगवेगळे reference books हाताळण्यात वेळ घालवत होता. त्या अगणित पुस्तकांमध्ये ज्या पुस्तकात त्याला काही महत्त्वाचं वाचायला भेटत असे तो ते वाचे.

समीर त्यावेळी कॅन्टीनमध्ये त्याच्या girlfriend सोबत बसलेला. 6.45 वाजता प्रियांश आणि समीर गावात जाणार होते बसस्थानकावर, समीरच्या घरून बसने येणारं पार्सल घेण्यासाठी. पैसे आणि खाऊ नावाचं पार्सल!

मात्र, पुस्तकांमध्ये 2 तास सहज निघून गेलेत हे त्याला कळलं जेव्हा त्याने जन्काला लायब्ररीत येताना बघितलं. वेळेची जाणीव करून द्यायला जन्काच समोर यावी याहून वेगळं ते काय!

स्म्रीति हॉस्टेलला परतली असणार हे त्याला ठाऊक होतं. पण प्रज्ञा मात्र जन्कासोबत दिसली नाही. जन्का चांगल्या  मुडमध्ये नाहीये हेच काय त्याला जाणवलं. तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही असं तो ठरवतो आणि हातात असणाऱ्या पुस्तकात पुन्हा लक्ष घालतो.

प्रियांश पुस्तक वाचत उभा असलेल्या सेक्शनमध्ये ती येताक्षणी त्यांचे डोळे मिळतात. जन्काच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यांतून जणू त्याच्याविषयी शिव्यांचा साठा दिसत होता. त्याचा गोंधळ पार ढगात होता खरंतर.

निघावं लायब्ररीतून बाहेर हा विचार येताच तो त्याच्या हातातलं पुस्तक असलेल्या जागेवर ठेवतो.

त्या सेक्शनमधून बाहेर पडताना बघतो तर जन्का सर्वात वरच्या कप्प्यात Artificial Intelligence (AI) चं कुठलंतरी पुस्तक ठेवत होती. पाय उचकवूनही तिचा हात काही नीट पुरेना.

तिला मदत म्हणून मग तो ते पुस्तक त्याच्या हाताने मागे सरकवतो.

तितक्यात, त्याचा फोन vibrate व्हायला लागतो. समीर वाट बघत असेल या विचारात तिच्याकडे न बघता तो लायब्ररीतून बाहेर निघतो.
.

घड्याळात पहाटेचे 5 वाजून 20 मिनिटं झालेले. अलार्म वाजतो. अलार्मच्या आवाजाने त्याचे डोळे उघडतात. Snooze चं बटण दाबून त्याला पुन्हा झोपावंसं वाटतं पण मग डोळे घट्ट मिटत काहीसा विचार करत आळस झटकून तो उठतो.

इतर दोघं त्याच्या बाजूला झोपलेले. तो त्याच्या पलंगावरून उतरत कम्प्यूटरसमोर असणाऱ्या खुर्चीवर जाऊन बसतो.

झोपलेल्या त्या दोघांच्या चेहऱ्यांकडे बघतो. कॉलेज डोक्यावर घेणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर निरागसता दिसते ती फक्त त्यांच्या झोपेतच. कदाचित, म्हणूनच तो जास्त झोपायचा.

सकाळी लवकर उठणं त्याच्यासाठी फार जिकीरीचं व्हायचं. त्याच्याहून अधिक जिकीरीचं व्हायचं त्याला उठवणाऱ्या समीरसाठी. दुसऱ्या वर्षापासून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रियांश त्याला सांगत असे सकाळी लवकर उठव म्हणून पण शेवटच्या वर्षात येईपर्यंत ते शक्य झालं नाही.

तिसऱ्या वर्षातल्या थंडीच्या दिवसांत आणि तेही परीक्षा तोंडावर असताना एकदा तर समीरने थंड पाण्याने भरलेला मग्गा ओतलेला प्रियांशच्या चेहऱ्यावर. खूप सारी चिडचिड करून झाल्यानंतर ओल्या झालेल्या चादरीला अंगावर ओढत तो तरीही परत झोपला होता.

प्रियांशच्या engineering च्या आयुष्यातील ती पहिलीच पहाट होती जेव्हा तो झोपून उठला होता. म्हणजे, आजपर्यंत मोजता येणार नाहीत इतक्या रात्रं तो जागला असेल. पहाटेची वेळ त्याच्यासाठी नवीन नव्हतीच.

खुर्चीवर बसल्याबसल्या त्याचे डोळे जड होत होते. झोपावंसं त्याला फार वाटत होतं. बंद होणारे त्याचे डोळे त्याला निद्रावस्थेत नेत होते.


'काय जेवलास?' रात्री 9.30 वाजता स्म्रीतिचा फोन येतो.

'आपल्या दोघांचाही डब्बेवाला सरदारजी आहे. काय वेगळं खाल्लं असणार?' त्याला कसं कळलं असेल हा विचार तिच्या डोक्यात आलाच असेल तेवढ्यात तो पुन्हा बोलू लागला, 'फक्त माझ्या डब्ब्यात 5 पोळ्या असतात आणि तुझ्या डब्ब्यात 3.'

'कळलं! यानंतर नाही विचारणार काय जेवलास ते. खुश आत्ता?'

त्याला वाटत होतं ती विचारेल की त्याला कसं कळलं असेल.  मात्र त्याला लगेच जाणवतं ती इतर मुलींपेक्षा वेगळी असल्याचं. त्या कारणानेच तर त्याला ती आवडायला लागली होती.

'प्रियांश, मला कळत नाहीये.' ती तिच्या नेहमीच्या हळू आवाजात, अगदी शांतपणे त्याला तिच्या मनात सुरू असलेल्या संभ्रमाबद्दल सांगत असते.

सकाळी वेळेत उठणं होत नसल्याचं जेव्हा ती सांगते तेव्हा त्याला वाटतं की कदाचित त्याच्यामुळे तिच्या वेळेचं गणित चुकतंय. त्याच्यामुळे तिचं schedule बिघडावं अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती.

'असं कसं चालेल?' तो तिचं बोलणं ऐकून तिला गंभीरतेने विचारतो.

'तू सुचव ना काहीतरी!' तीसुद्धा तितक्याच गंभीरतेने त्याची मदत मागते.

खरंतर, प्रियांशला फोनवर बोलायला फार आवडायचं नाही. समोरची व्यक्ती बोलत असताना डोळ्यांतले भाव अधिक काय ते बोलत. त्याला त्या डोळ्यांच्या भाषेतला संवाद खरा वाटे. मात्र, girls'hostel च्या सातच्या आत घरात या असल्या नियमांमुळे फोनवर बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याकारणाने तरी गेल्या काही दिवसांत त्यांच्या वाढलेल्या संवादामुळे तिचा फोन कॉलेजला silent mode ऐवजी vibrating mode वर राहू लागला होता.

'तू उठते त्यावेळीच उठणारी तुझी रूम मेट?'

'गेल्या काही दिवसांत तिचं बदललेलं वागणं ऐकून तुला वाटतंय का ती मला उठवेल ते? तोडकं-मोडकं, रागात का होईना, चिडत का असेना पण ती बोलतेय हेच पुरेसं माझ्यासाठी.' एवढं बोलून ती थांबली आणि पुन्हा त्याला ऐकवते, 'आणि तू त्यात काही ना काही कारणास्तव आगीत तेल ओतत असतो.'

'असं मी काय केलं?' प्रियांश.

'काल प्रोजेक्ट सेशननंतर लायब्ररीत काय बोललास तिला?

'काहीच नाही. उलट...' स्म्रीति मात्र प्रियांशला बोलू देईल तर.

'किंवा असं काय केलंस की ती रूममध्ये येताच तू कसा वाईट आहेस याचा पाढा ऐकवू लागली.'

'अगं, मी काहीच नाही बोललो. उलट तिला मदत केली मी.'

'मदत? कशी बरं?'

त्याने आदल्या दिवशी लायब्ररीत काय घडलं ते सांगितलं.

'आत्तातरी कळलं का चिडली असेल ती तुझ्यावर?' स्म्रीति प्रियांशवर विश्र्वास ठेवून होती जरी जन्का तिला त्याच्याबद्दल वाईट सांगत होती तरी.

'चिडण्यासारखं काय होतं त्यात? मदत करावी तर thank you म्हणण्याऐवजी राग, संताप. तसं तिच्याकडून thank you वगैरे ऐकण्याची अपेक्षा नव्हतीच म्हणून लगेचच निघालो तिथून.'

'प्रियांश, ती पुस्तक ठेवत नव्हती तर काढत होती.' यावर दोन क्षणं तर त्याला काय बोलावं सुचेनाच.

'माझा हेतू फक्त मदत करण्याचा होता. मात्र, हाईट कम, फाईट जादा असंच होतंय तिच्यासोबत.'

'त्यामुळे तू तिचं नाव घ्यायलासुद्धा घाबरायला लागलाय का?' चेहऱ्यावर मिश्कीलसं हास्य आणत तो तिच्या प्रश्नाला टाळतो. 

काही क्षणं दोघंही काहीच बोलत नाहीत. दोघांनाही एकमेकांच्या सभोवतालची खेळती हवा स्पष्ट ऐकू येत होती‌.

Girls' hostel च्या बाहेर मागच्या बाजूला असणाऱ्या बाकावर स्म्रीति येऊन बसली होती. हॉस्टेलच्या खिडक्यांतून सुद्धा न दिसणारी अशी जागा होती. कुठलीच मुलगी तिथं बसलेली नसायची. त्यामुळे जणू त्या बाकावर तिचीच हुकूमत झाली होती.

प्रियांश नेहमीप्रमाणे बास्केटबॉल कोर्टवर येऊन बसला होता. समीर आणि विभोर दोघंही कॉलेज गेट बाहेर जिरा सोडा प्यायला गेले होते.

स्म्रीतिचा अभ्यास होत नसल्याचं ऐकून प्रियांश त्याच्याच झोपेचं गणित व्यवस्थित करण्याचं ठरवतो.

'मग मी उठवू का तुला?' तो असं विचारताच ती हसायला लागली. त्याच्या नजरेसमोर तिचा तो हसरा चेहरा आला आणि त्याला फक्त वेड लावणाऱ्या तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्या दिसत होत्या.

'गेली तीन दिवसं मी तुला सात वाजेपासून उठवण्याचा प्रयत्न करतेय. तू एकदाही उठला नाहीस आणि त्यात माझ्या अभ्यासाचे बारा वाजलेत ते वेगळे.' तो काहीच बोलला नाही कारण तिचे प्रयत्न खरंच कौतुकास्पद होते. ती त्याचा अलार्म झाली होती आणि तरी तिच्यासोबतही तो snooze option वापरतच होता.

'प्रियांश, तुझी 8.30 ला उठण्याची बोंब असते रे.'


खुर्चीत झोपी गेलेला प्रियांश डोळे उघडत, झोप उडवत स्म्रीतिला फोन करतो.

स्म्रीति नुकतीच अंघोळ वगैरे आवरून अभ्यासाला बसली होती. जन्का रीडींग रूमला जाऊन काही वेळंच झाला असेल. 

प्रियांशचा फोन येत असल्याचं बघून तिच्या चेहऱ्यावर एक विजयी समाधान दिसत असतं. फोन उचलण्याआधी तिने थोडा वेळ रींग वाजू दिली.

'हॅलो!' अजुनही झोपेत असल्यासारख्या आवाजात ती फोन उचलते.

'5.30 वाजलेत. उठण्याचे कष्ट घ्यावेत आत्ता‌.'

'हो!' स्म्रीति एक जांभई देत आणि हसू आवरत म्हणते, 'उठते.'

'पण तू एवढ्या लवकर उठण्याचे कष्ट कसे बरं घेतलेस?' ती विचारते.

'तुला उठवण्यासाठी.' त्याचं उत्तर ऐकून तिला खरंच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करावासा वाटतो.

'अहा! आत्ता खरी जाग आली.' स्म्रीति.

'मग आता उठलाच आहेस तर आवर आणि अभ्यास कर काहीतरी. फक्त मला उठवायचं होतं म्हणून लगेच झोपू नको.' स्म्रीति मात्र त्याला झोपू देणार नव्हती. कारण, तिचं टार्गेट तर त्याला लवकर उठवण्याचं होतं.

'झोप लागली तर?' प्रियांश.

'तर मग उद्यापासून तू मला उठवायचं नाही.'

यावर काहीही उत्तर न देता bye म्हणत तो फोन ठेवतो.

स्म्रीति मनातल्या मनात खुश असते. तिला जे साध्य करायचं होतं ते तिने चारंच दिवसांत करून दाखवलं होतं.

'What a player!' अक्षरा झोपेतच slumdog millionaire मधील अनिल कपूरच्या आवाजाची नकल करत स्म्रीतिचं कौतुक करते.

'अक्षरे वटवाघुळ, झोप.' अर्थात, त्याला लवकर उठवण्याची कल्पना स्म्रीतिला अक्षरामुळेच सुचली होती. तिचं म्हणणं होतं की, मुलांना भीती दाखवली की ते कितीही हसण्यावारी घेतील पण त्यांच्या मनात जो कल्लोळ उठतो तो मात्र खरा असतो.

'स्म्रीत्या, प्रियांश माझ्या स्वप्नात आलेला आज. म्हणतो कसा ऐक, स्म्रीतिवर माझं प्रेम आहे पण विचारण्याची हिंमत होईना . तू...' अक्षरा मात्र स्म्रीतिला चिडवण्याची कुठलीही संधी सोडत नव्हती. झोपेत सुद्धा!

'झोऽप.' स्म्रीति अक्षराची बडबड थांबवत तिला झोपायला सांगून iPod ला play करते. तिच्या बदललेल्या playlist मुळे चेहऱ्यावर सतत हसू असायला लागलं होतं. त्यात अक्षराची बडबड तर तिला लाजायला मजबूर करत होती.

तिकडे, प्रियांश मात्र 5.30 ते 7 या दीड तासांत कितीतरी वेळा झोप उडवत compiler construction (CC) मधील compiler च्या phases समजून घेत असतो.

त्या वेळात काहीतरी आठवून तो स्म्रीतिला मेसेज करतो.

'Bring AI's first assignment. DAA च्या लेक्चरला लिहीतो.'

'नाही लिहीलंय. :(' तिचं आलेलं उत्तर.

'का?'

'मला कळत नाहीये कसं लिहावं ते. 4 विषयांपैकी एक निवडायचा होता elective म्हणून. त्यात आपण सगळ्यांनी AI का घेतला जो फार मार्क्ससुद्धा मिळवून देणार नाही!'

'Artificial Intelligence शिकणं गरजेचं आहे, कारण machines आपली किती कामं सोप्पी करू शकतात हे समजायला हवं ना.'

'अर्थात, म्हणून Artificial Intelligence ऐवजी आपण त्याला Artificial idiocy म्हणायला हवं.' स्म्रीतिच्या या बोलण्यावर त्याला हसू आलं. तिचा राग खरंतर त्या विषयावर यासाठी होता कारण तिला त्यात मार्क्स कमी भेटण्याची भीती होती.

'4.30 ला लेक्चर संपताच लायब्ररी जाऊयात.' एवढं म्हणत तो फोन बाजूला ठेवतो. पुन्हा Compiler Construction मध्ये गुंततो.

समीर आणि विभोर दोघंही उठताच बराच वेळ तर आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याने प्रियांशकडे एकटक बघत असतात.

'झालं असेल डोळे फाडून तर...' त्याला त्याचं वाक्य पूर्ण करू देतील तर ते त्याचे जिवाभावाचे जिवघेणे मित्र कसले.

'मानलं पाहिजे स्म्रीतिला. जे आम्हाला तीन वर्षांत नाही जमलं ते तिने चौथ्या दिवशीच करून दाखवलं.' विभोर हात जोडत म्हणतो.

'आज कळलंय तू इतक्या मुलींना नकार का दिला! She is the one, dude. जशी तुला हवी होती अगदी तशीच.' समीर.
.

Image source: Guelgram


Tuesday, 18 June 2019

भाग दहावा



भाग दहावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


Image Source: Guelgram



तीन कप कॉफी आणि दीड तास समोर तो. तिला दोघांचीही सवय नव्हती. बहुतेक, तिला नशा चढली होती. त्याची. कॉफीची. त्याची? हो, त्याचीच!

God, how influencing he was! How charming!

हलक्या सरींचा पाऊस सुरू झाला. कधी नव्हे त्या पावसात तिला भिजावसं वाटत होतं. त्याक्षणी, तिचा आनंद साजरा करायला पावसापेक्षा चांगला साथीदार भेटणार नव्हता.

'मी फार कमी बोलले.' तिला कुणीतरी हवं होतं तिच्या मनाला ऐकायला. पाऊसही अगदी वेळेत आला. 'मला का नाही सुचलं काही? का घाबरत होते मी तिथं बसलेल्या सगळ्यांना? जर मी गेले त्याने बोलावल्यावर तर मग भीती कसली होती? त्याच्या प्रेमात पडण्याची? पण मग आज त्याने कॉफीसाठी विचारलं, तेव्हा मी नाही का म्हटली नाही? मी येणार याची त्याला खात्री होती. किती सहज ओळखतो तो इतरांच्या मनातला कल्लोळ. प्रेमाची भुरळ होती फक्त जी इतर मुलींना त्याच्याविषयी होती की खरंच प्रेमात पडलीय मी त्याच्या?'

अर्थात, तो तिला आवडायला लागला होता आणि तिला खात्री होती की त्यालासुद्धा ती आवडायला लागली होती.

पाऊस तिला काही वेगळं सांगायला आला नव्हता याची तिला खात्री होती. पावसाला घट्ट मिठी मारावी म्हणून ती भिजायला तयारही होते.

जन्काचा टॉप घातला असल्याचं जाणवताच भिजण्याचा विचार मात्र ती टाळते.

त्या पावसाच्या थेंबांना आपल्या हातावर घेत ती स्वतःशीच हसते.

एकसंध पडणारा पाऊस
ठोक्यांच्या लयबद्ध चालीवर
हृदयाला नाचवत...

नव्याने जगायला शिकवणारा
तू आणि
पावसाचा प्रत्येक थेंब...

मनालाही भिजवणारा हा ओलावा,
नाविन्याची चाहूल...
कारणीभूत तू की पाऊस???

.


पावसात भिजून प्रियांश रूमवर परतला होता. आवरून कम्प्यूटरसमोर बसतो.

समीर NFS Most wanted च्या काळातसुद्धा NFS2 SE खेळत बसला होता.

'2 players लाव.' 2 players, त्यात दोघांनीही McLaren निवडली. प्रियांश पहीली रेस अगदी वाईट पद्धतीने हारताच समीरला जाणवलं की एकतर कॉफी कॉर्नरमधील वेळ खूपच चांगला गेलाय किंवा खूपच वाईट.

'कॉफीची चव कशी होती?' विभोरच्या प्रश्नाचा संदर्भ प्रियांशला कळला होता.

'दोन तासांत चव समजून येत नाही.' पुन्हा एकदा प्रियांशला हरवत समीर विजयी मुद्रेने हसत म्हणतो.

'हां म्हणजे तसं प्रियांश कॉफीची चव फार सहजतेने ओळखतो.' समीरची बडबड ऐकत प्रियांश निराश होऊन पुढच्या race साठी McLaren ऐवजी Ferrari निवडतो.

'मन जिंकण्यासाठी तरी वाम मार्ग वापरणार नाहीस तू म्हणजे मिळवलं.' समीर हसतच race सुरू करतो.

'चव चांगली लागली असणार तर मग कॉफीचा सुगंध रूममध्ये दरवळायला सुरूवात होणार.'  विभोर असं म्हणताच ते दोघंही जोरजोरात हसतात.

'तुम्हा दोघांचं बोलून झालं असणार तर मी आत्ता बोलू?' Ferrari सुद्धा McLaren कडून हारली होती. प्रियांश निराश होऊन दोघांना विचारतो.

'तू काही बोलावं याची गरज तरी कुठे उरलीये!' समीर पुन्हा एकदा विजयी मुद्रेने प्रियांशकडे बघत त्याला आठवण करून देतो की NFS 2 चा पहिला ट्रॅक 37 सेकंदात पार करणारा जेव्हा एका मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतो तेव्हा मन चलबिचल असतं.

'जेवनाचे डब्बे घेऊनच परत येतो.' असं म्हणत प्रियांश रूममधून बाहेर जातो.
.


स्म्रीति रूममध्ये परतली तेव्हा जन्का आणि प्रज्ञा DAA विषयी बोलत होत्या. अक्षरा assignment लिहिण्यात मग्न होती.

स्म्रीति कपडे बदलून येताच अक्षरा तिला डोळ्यांनीच विचारते, 'काय काय झालं?'

स्म्रीति चेहऱ्यावर स्मितहास्य आणत ओठांना फक्त हलवत तिला सांगते, 'नंतर.'

'मला हे algorithm कसं solve करावं कळतच नाहीये.' प्रज्ञा जन्कासमोर वही ठेवत म्हणते.

'n+1 घेऊन बघूयात.' जन्का बराच विचार करत म्हणते.

स्म्रीतिसुद्धा त्या दोघींजवळ जाऊन उभी राहते.

'चुकलं! आत्ता n+2 घेऊयात.' जन्का पुन्हा विचार करू लागते.

'n-2 घेऊन बघ, जमेल.' स्म्रीति असं म्हणताच जन्का नाक उडवत, डोळे बंद करत हसते.

'काहीतरीच! जर n-2 घेतला तर...' जन्का एवढं बोलून थांबते. तेव्हा फक्त स्म्रीतिच्या हस्ताक्षरात पेन बोलू लागतो कागदाशी.

'ही मेथड कॉरमनची नाहीये.' जन्का स्म्रीतिकडे बघत समजायचं ते समजते.

स्म्रीति काहीही न बोलता स्वतःच्या बेडवर येऊन बसते.

रूममधील वातावरण शांत असतं. जन्का मनातल्या मनात स्म्रीतिच्या अभ्यासाच्या बदलत्या पद्धतीने थोडीशी धास्तावली होती. त्यात प्रियांशमुळे हे बदल होत होते म्हणून आणखीच त्रास.

'स्म्रीति दी, you are the luckiest girl.' तिसऱ्या वर्षात शिकणारी त्यांची junior रूममध्ये येताच स्म्रीतिच्या बेडवर बसत म्हणते.

'का? आज लॉटरी वगैरे जिंकून आली काय ती?' जन्का तिला कुतूहलाने विचारते.

'माझ्यासाठी तर बंपर लॉटरीच समज, जन्का दी. स्म्रीति दी आज handsomest of all प्रियांशसोबत कॉफी शॉपमध्ये बसलेली.' हे ऐकून जन्काचा राग चढला होता‌.

'अय, junior आहेस तर आमच्यासमोर थोडंसं सांभाळून बोल.' ती junior मात्र जन्काला भाव न देता पुन्हा स्म्रीतिकडे वळते.

'दी, पुढच्या वेळी मलाही तुझ्यासोबत घेऊन बस. वाटलं तर पूर्ण बिल मी भरेल.'

'तू जन्काचं बोलणं ऐकलं नाही वाटतं? निघायचं लगेच!' प्रज्ञा जरा सिनियर आव वाढवत तिला रूममधून हाकलून लावते. अक्षरा मात्र हसत सगळी गंमत बघत असते.

'नाही म्हणजे खरंच हां स्म्रीते, नशीब फळफळलंय तुझं.' अक्षरा.

'तू माझा टॉप घालून त्या फालतू मुलाला भेटायला गेली होतीस? How dare you?'  जन्का मात्र स्म्रीतिला रागात विचारते.

स्रीतिला काय बोलावं काहीच सुचेना.

'सॉरी! पुन्हा असं नाही होणार.'

'पुन्हा तशी वेळच येणार नाही.' जन्का असं म्हणत लॉकर मधून कात्री काढून त्या टॉपला फाडू लागते.

'जन्के, वेड लागलंय का तुला! आण ती कात्री इकडे.' अक्षरा तिला अडवण्याचा प्रयत्न करते पण क्षणभराने का होईना उशिर झालेला असतो.

'मला न विचारता माझ्या कपड्यांना घालून जाशील तू त्या नालायक, नी...' शिव्यांचा पाढा सुरू करण्याआधीच ती थांबते. कात्री आणि फाडलेल्या त्या टॉपला तसंच जमिनीवर फेकत तडफड करत ती रूममधून बाहेर जाते.

अक्षरा इशारा करत प्रज्ञाला तिच्यामागे जायला सांगते.

स्म्रीति मात्र तिच्या अशा वागण्याने घाबरून जाते. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात‌.

'स्म्रीते, तू का रडतेस?' अक्षरा स्म्रीतिजवळ बसत तिला जवळ ओढत म्हणते, 'तुला माहीतीये ना की प्रियांश तसा नाहीये जसा जन्का सांगत होती, मग तू का असं रडतीये?'

स्म्रीति तिच्या खांद्यावर डोकं ठेवते.

'तुम्हा तिघींपैकी एकही आयुष्यात नसली तर मी अपुर्णच. मी ती उरणारच नाही जीला तुम्ही ओळखतात.'

'तुला ती का उरायचंय? तुझ्यात होणारे बदल, तुझी नवी ओळख, तुझं स्वप्न पूर्ण करत असणार असतील तर तुला ती का उरायचंय?' अक्षरा तिला शांत करण्याचा प्रयत्न करते.

अक्षरा त्या टॉपकडे बघत आठवते. कशी ती IIT मध्ये जाऊन roborace जिंकून येणारी त्यांच्या कॉलेजच्या इतिहासातील पहिली मुलगी ठरली होती. म्हणूनच कदाचित तिने इतर तिघींनाही lucky charm च्या नावाखाली त्यावर अंधश्रद्धाळू बनण्यास भाग पाडलेलं. त्या फाटलेल्या टॉपच्या आठवणी मात्र ठिगळ लावून का असेनात पण मनात जपून राहणार होत्या.

'आम्ही इथंच आहोत. जन्कासुद्धा! तिला थोडा वेळ लागेल accept करायला पण ती तुझा हात सोडणार नाही.' अक्षरा तिला आश्वस्त करते.
.


रात्रीचे 10 वाजलेले. प्रियांश आणि समीर Basketball court वर ढगाळ आकाशाकडे बघत पाठ टेकलेले. विभोर कॉलेजच्या ग्राउंडवर त्या दोघांपासून बऱ्याच अंतरावर त्याच्या girlfriend सोबत फोनवर बोलत होता.

'आत्तातरी वाटतंय का तू तिच्या प्रेमात पडलाय?' समीर कॉफी कॉर्नरवरून परत आल्यापासून प्रियांशच्या मनात सुरू असलेल्या चलबिचल अवस्थेबद्दल जाणून त्याला विचारतो.

'तुला खरं सांगू, मला प्रेमाची व्याख्याच कळेनाशी झालीये.'

'प्रेमाची व्याख्या शोधत बसशील तर आयुष्य संपेल. इथे एक वर्ष सुद्धा उरलं नाहीये.'

'मला कळतंय. पण... म्हणजे मला स्म्रीति आवडायला लागलीये.'

'पण काय?'

'आपल्याला एखादी आवडलेली व्यक्ती किंवा एखादी गोष्ट नेहमी जवळ असली की हातची निसटून गेल्याची भीती वाटते.'

'हो मान्य, आम्ही आधीच म्हटलोय की तुम्ही दोघं सोबत शोभून दिसणार पण आज पहिल्यांदा असं भेटलायेस तू तिला आणि‌ इतक्यात तू फार पुढचा विचार करतोय.' थोडं थांबत समीर त्याला आठवण करून देतो प्रेम वगैरे सगळं कसं क्षणभंगूर असतं म्हणून,
'सगळं जग आपल्यासारखं निःस्वार्थ जगलं असतं तर कायापालट झाला असता या जगाचा.'

'वेळ घालवण्यासाठी किंवा कुणाच्या कामी यावं म्हणून प्रेमात पडायचं असतं तर दुसऱ्यावर्षी जेव्हा सर्वशरीरसंपन्न असणाऱ्या त्या EnTC तल्या मुलीने विचारलेलं तेव्हाच हो म्हटलो असतो ना. त्यात इतक्यात नको असलेल्या गरजासुद्धा पूर्ण झाल्या असत्या.' समीरला मात्र प्रियांशच्या बोलण्यावर हसू आलं.

'सोपं गणित सांगतो, प्रेम कर. पुढे चांगलंच होईल या विश्वासाने. निःस्वार्थपणे!'

समीरचं ऐकून प्रियांश मात्र काही बोलला नाही. त्याची शांतता समीरला स्वस्थ बसू देत नव्हती. तिघांच्याही स्वभावात नव्हतं मनात चाललेल्या कल्लोळाला एकमेकांपासून लपवून ठेवणं.

'तिला मेसेज कर की ती आली भेटायला म्हणून तुला बरं वाटलं असं काही.'

'तिचा नंबर...' प्रियांशकडे स्म्रीतिचा नंबर नव्हता पण त्याला नंबर भेटणं फार कठीण नव्हतं.

त्याने Papa's girl ला मेसेज केला. जी class topper असल्याने CR होती आणि department च्या meetings मुळे ते नेहमीच भेटत असत HOD cabin मध्ये.

'Hey chashmish, please send me Smriti's number.'

तिचा reply आला खरा पण भेटल्यानंतर तिचे बोलणे खावे लागणार हे नक्की. तिची भीती नव्हती कारण एकतर gossip करायला ती हॉस्टेलमध्ये रहायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तिला प्रियांशवर विश्र्वास होता.

'Hi... Coffee with Smriti cool Hoti. Chhan vaatl bhetun. Gdnt -Priyansh.' समीरला ऐकू जावं या हेतूने प्रियांश स्म्रीतिला पाठवत असलेला मेसेज वाचून सांगतो आणि मग send चं बटन दाबतो.

'बघ चेहरा फूलला लगेच तुझा.' समीर त्याला चिडवतो.

'तिचा reply तर येऊ दे.' प्रियांश हसतो.

'Heyy, malasuddha khup chhan vaatl bhetun.  Gn :) :) :)' प्रियांश मेसेजचा लगेचच आलेला reply वाचून शांत होतो.

'मेसेज करून reply सुद्धा आलाय. कदाचित, हवा तसा.' समीर.

'करूयात आत्ता निःस्वार्थ प्रेम, कुठलीही अपेक्षा न ठेवता.' प्रियांश आलेल्या मेसेजने तसा खुशच होता.
.


Sunday, 9 June 2019

भाग नववा



भाग नववा: कॉलेजचं शेवटचं वर्ष



त्याने त्यादिवशी तिला पुन्हा एकदा 'care for coffee?' असं विचारलं होतं. ती हो म्हटली नाही. मात्र नेहमीप्रमाणे यावेळेस नाही सुद्धा म्हटली नाही. तिची शांतता त्याच्या चेहऱ्यावर एक smile घेऊन आली. 5 वाजता भेटू असं म्हणत तो नजरेआड झाला.

जावं की नाही हा विचार करत करत ती कॉलेजवरुन हॉस्टेलच्या रुममध्ये येऊन पोहोचली होती. तिच्या प्रत्येक विचारात वेगळी भावना होती. जावं! न जावं!

न जाण्यासाठी तिच्याकडे बरीच कारणं होती. जाण्यासाठी मात्र एकच.

तो आवडायला लागला होता. त्याचे विचारसुद्धा अंगावर एक हलकीशी प्रेमळ झुळुक घेऊन यायचे. पण हे त्या एका कारणासाठी पुरेसं होतं का?

न जाण्याचं सगळ्यांत महत्त्वाचं कारण म्हणजे जन्का! गरज आल्यास तो की जन्का या दोघांपैकी कोणासोबत उभं रहायचं, हा प्रश्र्न. नवीन नात्याला बांधताना जुन्या नात्यांना का कोसळू द्यावं?

त्यात पहाटे अभ्यास करत असताना 'पहला नशा' हे गाणं अर्थशः आपलंसं झालं होतं तिच्यासाठी. तिच्या iPod च्या playlist मध्ये जणू तेच गाणं होतं. गुणगुणत असताना तिच्या चेहऱ्यावर हसू होतं.

'स्म्रीते, पुरे आता.' जन्का तीच्या कणखर आवाजात स्म्रीतिला स्वप्नातल्या जगातून जागं करते.

'सॉरी!' स्म्रीति नाजूक स्वरात, चेहऱ्यावर चुकीची जाणीव आणत, कानातले इअरफोन्स काढत म्हणते.

'उद्यापासून मी रीडींग रूम मध्ये अभ्यासाला बसणार आहे. किती गुणगुणायचं, किती नाचायचं यासाठी तुला पूर्ण मोकळीक माझ्याकडून. पण आजच्या दिवस शांतता ठेव.' अभ्यास करताना ज्या जन्काला गोंधळ चालायचा त्या जन्काला स्म्रीतिचं गुणगुणनं सहन होत नव्हतं. अर्थात, डोक्यात प्रियांश आणि स्म्रीति बद्दल असणारे विचार तिला अस्थिर करत होते. चलबिचल करत होते.

मैत्रीतल्या एकाही विटेचं कोसळणं परवडणारं नव्हतं. आणि जर ती जन्का असेल तर!

स्म्रीति मात्र काहीही उत्तर न देता पुन्हा शांततेत अभ्यास करू लागते.

त्याचे विचार डोक्यातून काढून टाकण्याचं ती ठरवते पण सारे प्रयत्न निरर्थक. त्याचा तो तेजस्वी चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून जायचं नावंच घेईना.
.

'उसने बात की कुछ ऐसे ढंग से,
सपने दे गया वो हजारो रंग के...'

अक्षरा 'पहला नशा' हे गाणं म्हणत सकाळी घडलेल्या घटनेची आठवण करून देत जणू स्म्रीतिला चिडवत होती.

'मला जन्काची खूप भीती वाटतेय, अक्षरे.' स्म्रीति तिच्या मनात येणारे विचार अक्षराला सांगते.

'काही नाही, होईल ती शांत.' अक्षरा तिला आश्वस्त करते.

'मी त्याला भेटायला जाऊन चुक तर नाहीये ना करत.' आरशासमोर उभं राहून स्म्रीति स्वतःला न्याहाळत होती.

'तू प्रियांश सोबत डेटवर जात आहेस. त्यात चुकीचं काय?' अक्षरा डेट या शब्दावर जरा जोर देत म्हटली.

'डेट वगैरे काही नाही. तो पुन्हा-पुन्हा विचारतोय म्हणून शेवटी हो म्हटले मी. तेही फक्त कॉफी पुरता!' स्म्रीति तिने घातलेल्या काळ्या कुर्त्याला आरशात बघत अक्षराला विचारते, 'हा राहू देऊ की दुसरं काही try करू?'

'तू काहीही म्हण पण शेवटी समोर प्रियांशच असेल बसलेला, ते सुद्धा 2 तास!' अक्षरा तिच्या पलंगावरून उठत लॉकरमधून एक पांढऱ्या रंगाचा टॉप काढून स्म्रीति समोर धरत, 'हा घाल.'

'हा जन्काचा टॉप आहे.' स्म्रीति असं म्हणत नकारार्थी मान हलवते.

'आणि आपल्या चौघींसाठी lucky आहे. म्हणून घालूनच जा.' तो टॉप जन्काकडे दुसऱ्या वर्षापासून होता.

F.R.I.E.N.D.S या टिव्ही शो मधील pivot वाल्या scene चं चित्र असणाऱ्या त्या टॉपमध्ये जणू जादूच होती. जन्काकडे दुसऱ्या वर्षाच्या अखेरपासून असणारा तो टॉप त्या चौघींसाठी अंधश्रद्धेचा भाग झाला होता. महत्त्वाच्या परीक्षा, प्रज्ञाची पहिली वहिली यशस्वी डेट, अक्षराचं IIT मधील बक्षिस मिळवून देणारं robot exhibition आणि आणखी बऱ्याच चांगल्या आठवणी त्या टॉपने चौघींना दिल्या होत्या.

'मी फक्त कॉफी प्यायला जातेय. Luck ची गरज नाही काही.' स्म्रीति नाही म्हणत तो टॉप परत अक्षराच्या हातात देते.

'माझ्यासाठी, please!' अक्षरा तिला विणवन्या करते.

'कर तू blackmail.' टॉप पुन्हा आपल्या हातात घेत ती विचारते, 'पण तिने बघितलं तर?'

'तर काय? तिथेच थोडे ना काढायला सांगेल ती. काय चिडचिड करायची करेल ती रूमवर येऊन.'

'नको. मी जातच नाही.'

'तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देते की तू तुझ्या आत्तापर्यंतच्या इंजिनिअरिंगच्या आयुष्यात पहिल्यांदा आरशासमोर उभी आहेस. तीन गॅदरिंग्स गेल्यात पण आरशात स्वतःला न्याहाळताना असं तुला आज पहिल्यांदाच बघतेय मी तरी.'

'काहीही.'

'ते मोकळे सोडलेले केस बघून माझ्यातील cuteness आणि प्रज्ञातील hotness असं mixed combination समोर उभं दिसतंय.' अक्षरा डोळे मिचकावत तिचं कौतुक करते.

'अगं पण...' स्म्रीति आणखी काही बोलणार त्याआधीच अक्षरा तिला शांत रहायला सांगून दरवाजाकडे इशारा करत म्हणते,
'पण बीण काही नाही. जा आत्ता!'
.

ती वेळेत पोहोचली. तो मात्र आधीच येऊन थांबला होता. तिची वाट बघत. ती कपडे बदलून कधी नव्हे आरशासमोर उभं राहून आलेली आणि तो तसाच कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये!

खरंतर ती चिडलीच त्याच्यावर. पण तीन वर्षांहून अधिक वेळ घातलेल्या त्या पांढऱ्या शर्टमध्ये सुद्धा कसला cute दिसत होता तो. तिचं चिडणं हवेत विरलं. त्याला बघून मन हरवलंच काही क्षणांसाठी.

येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या त्या गोड हास्याने hi वा bye करत होता. कसं जमत असेल त्याला सगळ्यांसोबत इतकं हसतखेळत वागणं? आजूबाजूच्या टेबल्सवर बसलेल्या मुली जणू फक्त तो बसला होता म्हणूनच आल्याचं वाटत होतं. सगळींच्या नजरा त्याच्यावरच!

तिला हॉस्टेलवर परत जावंसं वाटत होतं पण मग...

वातावरण आल्हाददायक होतं. तासाभरापुर्वी धो धो पाऊस पडून गेलेला. ढग अजूनही गडद. पुन्हा पाऊस येण्याची दाट शक्यता.

Department च्या writing section वाल्या board वर लावण्या हेतू लिहीत बसला होता. 'वाट बघण्याची गंमत' हे दिलेलं शीर्षक!

तू यावंस...
तुझी वाट बघताना
गंमत यावी अशी,
तू यावं भेटायला
पावसाची सर होऊन
गडद झालेल्या ढगाला
तुझ्या मोकळ्या केसांत माळून...


ती समोर येऊन उभी राहताच तो उभं राहून तिला बसण्यास सांगतो. त्याची डोळे तिचं सौंदर्य टिपण्यात गुंतून जातात. नजर नको लागायला म्हणून काजळ लावून यायला हवं होतं असं सांगण्याची त्याला गरजच भासली नाही कारण तिच्या काळ्याभोर डोळ्यांना काजळाची गरजच नव्हती.

ती सुगंधित ओल्या मातीची हवा, तो आणि सोबतीला ती!

त्याला छानशी smile देत ती बसली.

'कुणासाठी इतकं वेडं होणं अशक्यच!'
त्याला असंच वाटायचं नेहमी...
आणि आत्ता तो,
तिला बघत,
ती... तिचे डोळे...
तीचं हास्य... त्या खळ्या...
पार हरवून जाणं...
वेड...

'खूप गर्दी आहे, नाही?' स्म्रीतिने असं विचारताच प्रियांश भानावर येतो.

तिची नजर घाबरलेली दिसत होती. प्रियांशसोबत बसलेलं बघून आजूबाजूचे काय विचार करत असतील, हा विचार तिला खायला करत होता.

'जिथं मी असणार तिथं गर्दी असणारंच.' तो डोळे मिचकावत तिला म्हणतो.

'अर्थात!' ती मात्र त्याच्याबद्दल इतर मुलींना असणाऱ्या भावनांबद्दल विचार करते.

'का? म्हणजे कॉलेजच्या सगळ्या मुर्ख मुलींमध्ये तुझी इतकी craze का आहे?' अक्षराने या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचदा दिलं होतं रूममध्ये पण त्याच्या मनात काय होतं हे त्याच्याकडूनच जाणून घ्यायला भेटणार होतं.

'NASA च्या शास्त्रज्ञांना पडलेल्या 11 कोड्यांपैकी मी 12 वा.' तो मात्र चेहऱ्यावर अनभिज्ञता आणत कोड्यात उत्तरतो.

'म्हणजे?' ती.

'त्यांना ती 11 प्रश्नांची उत्तरं शोधताना डोक्याला त्रास झाला की मग तेसुद्धा तू विचारलेल्या प्रश्नाचा विचार करत असतील.' तो असं म्हणताच ती हसायला लागते.

'तू म्हणजे अतीच आहेस.' ती बसलेल्या खुर्चीवरून मालरोड पुर्ण दिसत होता आणि तिला भीती होती की जन्का तिला बघेल आणि रूममध्ये वाद घालेल.

'तू इथं कधी आलेली नाहीये का आधी?' तीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या उदासीनतेला बघत तो विचारतो.

'आली असेल हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या वेळेस, तेदेखील अक्षरासोबतच.' इतरांनी आपल्याकडे बघून गॉसिप करायला नको म्हणजे मिळवलं, हे ती मनातल्या मनात म्हणायला विसरली नाही.

'तुला माहीती नसेल म्हणून सांगतो, PLs च्या दिवसांत हे कॉफी कॉर्नर रात्रीसुद्धा पुर्णवेळ उघडं असतं.' सायंकाळी सात वाजता girls' hostel च्या बाहेर जाणं मुलींना allow नव्हतं. त्यामुळे, रात्रीची कॉफी फक्त मुलांसाठीच असणार.

'हो?' तीला मुळीच कल्पना नव्हती. PL चे दिवसं असो किंवा नेहमीचे कॉलेजचे दिवसं, रात्रीचे 11 वाजले की तिचे डोळे आपोआप मिटत.

'झोप उडवण्यासाठी कॉफी म्हणजे औषधचं!' त्याच्या चेहऱ्यावरील भाव जणू पुढची PL कधी येणार याच विचारात गुंतलेत की काय असं तिला वाटलं.

'तू फक्त PLs वेळी अभ्यास करतो का? तेसुद्धा रात्र रात्र जागून?' ती.

'हो!' तो.

'मग कसा रे तू येणार पहिल्या दहांत!' तीचं बोलणं अगदी खरं होतं हे तो जाणून होता.

'तुझ्यासारखं 5 वाजता उठून अभ्यासाला बसणं नाही शक्य.' थोडक्यात त्याला ठाऊक होतं तिचं वेळापत्रक.

'मग कमीत कमी 7 वाजता तरी उठ.' तिला सुद्धा जाणीव होतीच त्याच्या आळशीपणाची.

'हे वर्ष सुरू झाल्यापासून तेच प्रयत्न चालू आहेत पण अपयशच.' प्रियांश चेहऱ्यावर कुठलेही हावभाव न आणत म्हणतो. अजून तरी आलेल्या अपयशाने त्याला फरक पडला नव्हता हेच कळत होतं तिला त्याच्या चेहऱ्यावरून.

'मी एक शेवटचा प्रयत्न करून पाहू का?' जिथे समीर आणि विभोरने हार मानली इतक्यात तिथे ती कशी जिंकणार, असा विचार मनात आणत तो होकारार्थी मान हलवतो.

'पण मग तू मला कुठल्याही विषयात अडचण आली तर मदत करशील ना?' तिने असं विचारताच त्याला तिचं स्वप्न वगैरे सगळं काही आठवलं. समीर म्हटलाच होता की तिची स्वप्नं ही तुझी गरजच.

तसं त्याला काही हरकत नव्हतीच. त्याचा regular अभ्यास दुसऱ्यांना पडलेल्या प्रश्नांवरच व्हायचा खरंतर.

'DAA नंतर आत्ता कुठल्या विषयाचं reference book बदलायचं?' तो तिच्या, आणि त्याच्याही फायद्याच्या असणाऱ्या proposal ला accept करतो.

पुढचा एक तास दोघंही books, professors, practicals, assignments असं बरंच काही बोलत होते. त्याच्या प्रत्येक विषयावर असणारी पकड बघून तिला विश्र्वासच बसत नव्हता की तो क्लास टॉपर्सच्या दूर दूरपर्यंत सुद्धा नव्हता.

त्याच्या प्रेमात पडण्याचं आणखी एक कारण तिला भेटलं होतं.

'अजून एक कॉफी?' तो तिला विचारतो.

'नको आत्ता.' ती नाही म्हणते.

'घे गं. इतकं छान वातावरण झालंय. कॉफीला कसं नाही म्हणतेस.' थोडक्यात कॉफीचं व्यसन होतं त्याला.

ती हो म्हणताच, तो दोन कॉफी सांगतो. दीड तासातली ही त्यांची तिसरी कॉफी.

'तू F.R.I.E.N.D.S. बघितली आहेस का?' तिने घातलेल्या टॉपकडे बघत तो तिला विचारतो.

'असं पूर्ण नाही. अधूनमधून, तोडकंमोडकं. Mostly, YouTube वर असणारे videos.'

'मला वाटलं तुला आवडत असणार.' तो त्या टॉपकडे इशारा करतो.

'हा जन्काचा आहे.'

'मला तर वाटलेलं तिला फक्त WWE सोडून काही आवडत नसणार.'

'ती खूप चांगली आहे रे स्वभावाने.'

'मग असं का वागते माझ्यासोबत ती?'

'तुच काहीतरी चुकीचं वागलं असणार. असं उगाच का कुणी वाईट होतं इतर कुणाच्या नजरेत‌.'

'खरंच सांगतो, मी तिचं काय कुणाचंच कधी वाईट केलं नाहीये आयुष्यात. साधा वाईट विचारसुद्धा नाही कधी कुणाबद्दल.'

'हो जन्का आहे थोडी तिच्या मनासारखं करून घेणारी पण...' स्म्रीति आणखी काही बोलणार त्याआधीच प्रियांश बोलायला सुरुवात करतो.

'पहिल्या वर्षाला एकाच वर्गात होतो मी आणि ती. पूर्ण वर्ष जेव्हाही कधी आमचं बोलणं झालं ते अगदी व्यवस्थितच. पण दुसऱ्या वर्षात असं काय घडलं माहीत नाही, तेव्हापासून ती नेहमी मीच चुकलोय असं म्हणत सुरूवात करते.'

'मलाही कोडंच आहे ते एक.' जन्कामुळे क्षणभरासाठी का असेना पण त्या दोघांनाही तिच्या विचारांनी शांत केलं.

'असो. मग तू कुठली serial बघतेस?'

'फार वेळ भेटत नाही काही पण दिल मिल गये बघायला आवडतं.'

'ही कुठली serial?'

'Medical drama आहे.'

'ओह! थोडक्यात भारतीयांची Grey's anatomy.'

'काय?'

'Grey's anatomy! बघ तू. थोडी emotional आहे पण आवडेल तुला.'

'हे वर्ष संपलं की मग. सध्या कुठल्याच emotions मध्ये अडकायचं नाहीये.' तुझ्या प्रेमात सोडून, हे मनातल्या मनात म्हटलीच ती.

त्यानंतर काही क्षण शांततेत गेले. पुढ्यात असलेली कॉफी संपवण्यावर तिचं लक्ष होतं.

तू बोलावं, मी ऐकावं
घड्याळानेसुद्धा कधी उलटं फिरावं...

त्याच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असा तो वेळ. समोर बसलेल्या स्म्रीतिला मात्र बोलायला फार आवडायचं नाही. त्याची बडबड ऐकून परत भेटायची नाही ती बाहेर असं, या विचाराने तोही शांतच होता.

'उशिर होतोय. मी निघते.' हातात घातलेल्या घड्याळाकडे बघत ती म्हटली.

'मी सोडू?' त्याने असं विचारताच ती हसली. वेड लावणाऱ्या तिच्या गालावरच्या खळ्या, अह्हा!

'मुलांना girls' hostel मध्ये नाही येऊ देत‌.' ती असं म्हणताच त्यालाही हसू आलंच.

मालरोडवरुन दिसेनाशी होईपर्यंत तो तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत असतो. खरंच प्रेमात पडली होती का ती त्याच्या, की फक्त... आह! आत्ताच का नको ते विचार?

समोर टेबलवर असलेल्या कॉफीचा कप ओठांशी लावताच जाणवतं की पुन्हा एका hot कॉफीची गरज होती.


कॉलेज...
तो, ती आणि कॉफी...
आयुष्य पुरून उरेल,
इतक्या आठवणी देणारं मिश्रण...


Image source: Guelgram


Tuesday, 23 April 2019

भाग आठवा

Link: भाग सातवा




भाग आठवा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


15 मिनिटांपासून लायब्ररीचा हा सेक्शन ते तो सेक्शन करत करत Database and Algorithms या सेक्शनमध्ये प्रियांश आणि स्म्रीति एकमेकांसमोर येऊन थांबले. क्षण-दोन क्षण दोघंही एकमेकांच्या डोळ्यांत बघत स्तब्ध उभे राहिले.

{तो: कधीतरी तू बदलशील, मग काय करशील?

ती: आठ दिवसांत इतकं बदलवलंय, अजून किती बदलवू बघतोय?

तो: हो म्हणून अजूनही डोळ्यांचीच भाषा जिंकतेय, तोंडाने मात्र सरदारजीच्या टिफीनमधील छोले भटोरेच आत जातायेत.

ती: विषय नको हं बदलवू, मला भूक लागेल नाहीतर.

तो: मग तर चल, पाणीपुरी खायला जाऊयात.

ती: जाऊयात.

तो: पण आधी सांग तरी काय बदललंय?

ती: सांगून कळलं असतं तर ही डोळ्यांची भाषा का?

तो: ...}


'स्म्रीति!' भानावर येत प्रियांश लायब्ररीत इकडं तिकडं नजर फिरवून पुन्हा तिच्याकडे बघत विचारतो, 'कशीयेस?'

'कुणाला शोधतोय?' स्म्रीति जरा गोंधळलेल्या चेहऱ्याने लायब्ररीत असल्याचं भान ठेवत हळू आवाजात त्याला विचारते.

समीर आणि विभोर दोघंही त्याच्यासोबतच आलेले होते. प्रियांश मात्र ते दोघं जवळपास नसल्याची खात्री करत होता.

'अगं पुस्तकं काढायला आलोय. लायब्ररीत कुणाला शोधणार मी!'

लायब्ररी फक्त लायब्ररीच होती. पुस्तकं शोधायचे, काढायचे, I-card दाखवायचं, नोंद करायची आणि निघायचं. Reading hall वरच्या दोन मजल्यांवर होता, तोही फक्त मुलांसाठी. मुलींचा reading hall मात्र girls' hostel मध्येच होता.

लायब्ररीत तसा एक टेबल होता, अवतीभवती 6 खुर्च्या पण तिथे फक्त magazines वगैरे वाचयला येणारे बसलेले दिसायचेत. म्हणून हळू बोलण्यात काय अर्थ होता हे प्रियांशला कधीच उमगलं नाही.

'तू खरंच reference books मधून अभ्यास करतो?' ती‌ गंभीर होत विचारते. गंभीरतेत सुद्धा ती त्याला चिडवत होती, हे त्याला कळत होतं.

'फक्त रट्टा मारणारेच reference books वापरतात का?' तोसुद्धा तितक्याच गंभीरतेने तिला विचारतो.

'टॉपर्स म्हणायचंय का तुला!' ती त्याला आठवण करून देत होती, ती टॉपर्सपैकी एक असल्याची.

'थॉमस कॉरमनच्या पुस्तकातला शब्द न् शब्द स्वतःच्या अभ्यासात वापरणारे माझ्यासाठी रट्टा मारणारेच.' त्या दोघांसमोर उभं राहिलं आठ दिवसांपुर्वी  घडलेलं ते DAA चं लेक्चर. तो एक तास नेहमी आठवणींत रहावा असाच कारण तेव्हापासून सगळीच समीकरणं बदलत होती.

'असो.' तो तीच्यासमोर एक पुस्तक धरत म्हटला,' सरळ, सोप्या भाषेत algorithms समजण्यासाठी हे वाच.'

'The Algorithm Design Model by Steina?' स्म्रीतिने पुस्तक तिच्या हातात घेत विचारलं. पुस्तकाची पानं चाळत प्रियांशकडे बघत म्हणते, 'पण University ने refer केलेल्या पुस्तकांपैकी हे नाहीये.'

'15 दिवस वाचून बघ. नाहीच चांगलं वाटलं तर कॉरमन लायब्ररीत सहज भेटतंच.'

'थोडक्यात 15 दिवस वाया जाणार तर.' तिला खात्री नसली तरी त्याने लेक्चरवेळी जितक्या सहजतेने algorithm समजावलं होतं, तेव्हापासून तिला तिच्या अभ्यासात त्याची मेथड वापरून बघायची होती.

'लायब्ररीत मोजून 2 कॉपीज आहेत या पुस्तकाच्या. पैकी एक दुसऱ्या वर्षापासून माझ्याकडेच आहे असं समज.' तो थोडं थांबत, तिच्या डोळ्यांत त्याच्याबद्दल दिसू लागलेल्या विश्वासाला बघत म्हटला, 'एकही दिवस वाया जाणार नाही हा माझा शब्द.'

'तुझ्यावर विश्र्वास ठेवलाय म्हणूनच तुझ्यामुळे आणि तुझ्यासाठी जन्कासोबत भांडलीये.' त्या दोघांच्या नजरा अजूनही एकमेकांमध्ये गुंतलेल्या. 'तिघी रूममेट्स सोडल्या तर मी फार एकटी आहे.'

घड्याळ्याच्या सेकंड काट्याप्रमाणे दिवस संपत होता आणि जाणवतसुद्धा नव्हतं. कधीकधी तर असं वाटायचं की engineering ला जणू कालंच admission घेतलं होतं, 3 वर्षं पूर्ण होऊनसुद्धा. शेवटचं वर्ष तर त्याहूनही वेगाने संपू बघत होतं. प्रत्येक दिवस एका क्षणात मावळत होता.

गेली आठ दिवसंसुद्धा तशीच मावळली होती. खरंतर, दोघांच्याही मनाला न पटणाऱ्या घटना आठ दिवसांत घडल्या होत्या.

Project lab मध्ये महिन्याभरासाठी मज्जाव केल्यानंतर प्रियांश त्या रात्री झोपू शकला नव्हता. Project वर परिणाम होईल की नाही यापेक्षा जास्त भीति पुन्हा HOD सरांसमोर कुठल्या तोंडाने सामोरं जावं याची वाटत होती.

तिकडे girls' hostel मध्ये स्म्रीतिने त्या रात्री जन्काला समजावण्याचा प्रयत्न केला. तिला वाटत होतं की शेवटचं वर्ष चौघींच्या project group मुळे प्रियांश आणि त्याच्या project group ला नुकसानीचं ठरू शकणार होतं.

'आपण HOD सरांना सांगू ना त्यांचं suspension मागं घ्यायला.' स्म्रीति असं म्हणताच जन्का हसायला लागली.

'शेवटी इतर मुलींप्रमाणे तू सुद्धा प्रियांशवेडी झालीच तर!'

स्म्रीति जन्काचं एवढं वाक्य ऐकून पुढे एक शब्दही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. जन्कावर राग आला होता पण तरीसुद्धा ती शांत राहिली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेच्या ब्रेकमध्ये स्म्रीति एकटीच HOD सरांच्या cabin मध्ये गेली.

आत येताच उजव्या बाजूच्या भिंतीवर लावलेल्या 2 boards वर तिची नजर गेली. एका बोर्डवर department च्या इतिहासातील शेवटच्या वर्षी पहिलं येणाऱ्यांची नावे लिहिलेले होते आणि दुसऱ्या वर university मध्ये पहिल्या दहांत कुणी आलं असल्यास त्यांचं नाव लिहिलेलं होतं.

त्या toppers च्या boards वर स्वतःचं नाव बघण्याची तिची इच्छा फक्त इच्छाच नव्हती तर ते तिचं स्वप्न होतं. सगळी धडपड त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठीच सुरू होती नाही म्हटलं तरी.

'स्म्रीति! Project चा topic कधीपर्यंत ठरणार आहे तुमचा?' सरांनी तिला आत आलेलं बघत स्वतःच बोलायला सुरूवात केली.

'काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे सर म्हणून अजून तरी काही ठरत नाहीये.'

सरांनी टेबलवर पडलेल्या एका फाईलमधून एक 4-5 पानांचा report तिच्या हातात ठेवत म्हटले,
'यावर research करा आणि एका आठवड्यात यावर काय करता येईल ते येऊन सांगा.'

पुढची 5 मिनिटे सरांनी त्यांच्या group कडून नेमकं काय अपेक्षित आहे हे सांगितलं.

'Thank you so much Sir. आम्ही चौघी यावर आजच काम सुरू करतो.'

'Good.'

'सर...' ती थोडं घाबरत, अडखळत नेमकं ती कशासाठी त्यांना भेटायला आली होती हे सांगू इच्छित होती.

'काय झालंय, स्म्रीति?' तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बघत सरांनी विचारलं.

'सर, प्रियांश आणि त्याच्या group चं  project lab मधील suspension मागं घ्यावं असं मला... म्हणजे... म्हणजे माझ्या project group ला वाटतंय.' स्म्रीति.

'तुझ्या project group ला वाटतंय तर मग इतर तिघी कुठं आहेत?' सर.

'सर, आम्हीसुद्धा चुकलोय. त्यांचं नुकसान व्हावं असं मनापासून वाटत नाही.' स्म्रीति असं म्हणताना जन्काचा विचार न करता म्हटली.

'कुणाचं नुकसान होणार नाही इतकी काळजी मी घेतो. पण जर मी त्यांना punish केलं नसतं तर सगळ्यांनी हेच म्हटलं असतं की प्रियांश माझा आवडता student असल्यामुळे मी काहीच केलं नाही.' सरांनी तिला आश्वस्त केलं.

'तरी...' स्म्रीति आणखी काही बोलणार त्याआधीच सरांनी तिला थांबवलं.

'तुम्ही तुमच्या project वर लक्ष द्या.'

स्म्रीति काहीच न बोलता समोर उभी राहिली.

'अजून काही?' त्यांनी असं विचारताच तिने नकारार्थी मान हलवली.

सरांची परवानगी घेत स्म्रीति बाहेर आली. तिला सरांसोबत बोलून जितकं मोकळं वाटत होतं तितकंच tension त्यांनी दिलेल्या project topic बद्दल जन्कासोबत बोलण्यासाठी येत होतं.

HOD सरानी प्रियांशच्या project group ला presentation द्यायची परवानगी दिली पण project lab मधील suspension तसंच ठेवलं.

मात्र, स्म्रीतिमुळेच प्रियांश presentation देऊ शकणार होता हे कळल्यापासून जन्का तिला सगळ्याच गोष्टींसाठी blame करत होती‌.

'मी तर म्हणते, Global warming ला सुद्धा स्म्रीतिलाच जबाबदार ठरवायला हवं.' अक्षरा मुद्दाम रूममधील वातावरण थंड व्हावं म्हणून असले जोक्स ऐकवत रहायची.

'काळजी नको करू. तू मुळीच एकटी नाहीयेस.' त्याच्या डोळ्यांत गुंतलेल्या स्म्रीतिला प्रियांशने इतकं बोलून भानावर आणलं. त्याचं असं बोलणं ऐकून ती मनातल्या मनात खुश होती.

'मी ऐकलं की तुमचं presentation खूप छान झालं म्हणून?' ती विषय बदलावा याअर्थी त्याला विचारते.

'हो. सगळ्याच professors ना topic आवडलाय.'

'That's great!' स्म्रीति इतकं म्हणत त्याचं अभिनंदन करते.

'प्रियांश, जायचं का?' विभोर लांबूनच प्रियांशला विचारतो. समीर आणि विभोर दोघंही पुस्तकं renew करून त्याची वाट बघत थांबले होते.

'कॉफी?' प्रियांश स्म्रीतिकडे बघत विचारतो.

'तुझ्यासोबत?'

'म्हणजे?'

'म्हणजे, मुळीच नाही.' ती हसतच त्याला उत्तर देते.

'अह्हा!'

'काय?'

'हसत जा गं नेहमी. त्या गालातल्या खळ्या आणखी सुंदर बनवतात तुला.' स्म्रीति मात्र प्रियांशचं असं बोलणं ऐकून अचंबित झाली. तिला कळेना तिने त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी.

'काहीही.' स्वतःला प्रियांशमय झाल्याचं मुळीच जाणवू न देता ती म्हटली, 'Flirt करू नको माझ्यासोबत, मी कॉलेजच्या इतर मुलींसारखी नाहीये.'

'कठीण झालंय आम्हा मुलांचं बघ. खरंखुरं कौतुक करावं तर म्हणे आम्ही flirt करतो.' प्रियांश वर बघत म्हटला, 'कुठे जावं आत्ता तुच सांग रे, देवा.'

ती पुन्हा हसली.

'घायाळसुद्धा करतात बघ.' तो डोळे मिचकावत तिला म्हटला.

'गप रे! जा आत्ता तू.' स्म्रीति त्याला जायला सांगते.

'हसत रहा.' प्रियांश जाताना इतकंच म्हणतो.

तिला त्याक्षणी आतून कधी नव्हे खूप असं फुलल्यासारखं वाटत होतं. ह्रदयात धडधड वाढली होती. नाही म्हणता म्हणता प्रियांश तिला खरंच आवडायला लागला होता. एका आठवड्यात तिने कितीतरी वेळा त्याच्याकडे चोरून बघितलं होतं, लेक्चरवेळी वा प्रॅक्टिकलवेळी. खरंच जादू होती त्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या दिसण्यात.

'Byeee!'

इतर दोघांसोबत लायब्ररीतून नाहीसा होईपर्यंत त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे ती बघत होती, जगाचं भान विसरून!

Image Source: Geulgram