सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Tuesday, 22 September 2020

भाग अठरावा

 भाग अठरावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष




'थियटरला जाऊन मुव्ही बघायला जायची काय गरज असते याला? नाही म्हणजे बघू देत ना मी नाही थोडे म्हणतेय. पण मग रात्री 9 ते 12 ही काय वेळ झाली का? मुलांना सुट मिळते म्हणून काय इतक्या रात्री परत यायचं आणि तेसुद्धा पायी! 2.5 किलोमीटरचं अंतर गावातून कॉलेजचं पण तरी पायी यायचं असतं.' मनाची प्रश्नार्थक बाजू.


'तो पहिल्यांदा जात नाहीये ना पण. त्याला सवय आहे आणि त्यात शनिवारचा दिवस.' मनाची समजुतदार बाजू.


'पण आत्ता मला अडलंय त्याचं काय? आत्ता मी 12 वाजेपर्यंत जागावं का?


'त्याने सांगितलंय ना तसं अडलं की फोन कर. फोन कर, उचलेल तो नक्कीच.'


'पण मग असं नाही ना होणार की मला बोलायचंय मुद्दाम डाउट्सचं नाव करून?


'तुला फोन करायचा नसेल तर नको करू, वाटलं तर एक मेसेज टाक. यापेक्षा जास्त मी नाही समजावू शकत. कुढत बस एकट्यात मी जाते.'


'बरं, आत्ता मेसेज काय करावा हे तरी जाण्याआधी सांगून जा. रीप्लाय नाही आला तर कुढत बसते.'


'टाईप कर, 'कसा आहे मुव्ही? अर्थात, तू बघायला गेला आहेस म्हणजे चांगलाच असणार.' आणि नंतर ':)' स्माईली वापर. बस्स, इतकं पुरे.


'मला तर पटत नाहीये पण मी पाठवते तू सांगितलं म्हणून‌.'


'फोन आला की माझे आभार मान म्हणजे मिळवलं. मी जाते आत्ता‌. तुही फार कुढत बसू नकोस, प्रश्नांची दुकान.'




'हेलो!'


'डिस्टर्ब केलं का मी?'


'कसलं काय! कंटाळलो होतो मुव्हीला, असं समज तुझ्या फोनची वाटंच बघत होतो आणि कधी एकदा बाहेर पडतो. मेसेज बघितला अन् लगेच बाहेर येऊन फोन केला.'


'इतका कंटाळवाणा मुव्ही बघायला गेलाच का?'


'आमच्या दोघं रूममेट्सना सुपरहीरोज मध्ये खुप उत्सुकता असते, नाईलाजास्तव यावंच लागतं.'


'वेळ वाया घालवतो थोडक्यात!'


'आपल्या लोकांसोबत वेळ वाया जात नाही.'


'मला नाही पटत!'


'मग दुसऱ्या थियटरला एक चांगला मुव्ही आलाय, आपण उद्या सोबत बघू मग तू मला सांग वेळ वाया गेला की छान गेला.'


'पण मला..'


'ठरलंय, उद्या दुपारी 3 ते 6 मुव्ही. अभ्यास होतोय व्यवस्थित. मान्य, सबमिशन्स पंधरा दिवसांवर आलेत पण आपलं काहीच मागे नाहीये.'


'उद्याचं उद्या, आधी आजचं OS चं जे अडतंय त्यावर बोलावं का आपण?'


'अर्थात, विचारायला सुरूवात कर तू.'


पुढचा एक तास तो तिला तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित समजावून सांगत होता. तिला खरंच त्याचं अप्रूप वाटत होतं की पुस्तक जवळ नाही आणि तरीही सगळं काही तो किती अचूक सांगत होता. वाटू लागलं होतं की हा मागच्या वर्षापर्यंत का नाही भेटला तिला! 


उगाच जन्काचं ऐकून ऐकून मनात वाईट करून घेतलं होतं आणि आत्ता प्रत्येक श्वासात जणू तोच होता. ती त्याला जरी हो म्हणायला घाबरत होती तरी ती त्याची आणि तो तिचा हे समीकरण सगळ्यांना कळून गेलं होतं.


'प्रियांश, उद्या जाऊयात आपण मुव्हीला सोबत.'


'क्या बात!'


'सांग मी कुठला ड्रेस घालून आलेलं तुला आवडेल?'


'तू कुठल्याही पंजाबीत सुंदर दिसतेस, म्हणून तुला आवडेल तो. फक्त तेवढं तुझं हास्य घेऊन ये. त्या खळ्यांमध्ये रमू इच्छितो.'


'पुरे!' त्याला अडवत ती पुढे, 'आणि पोहोचलास हॉस्टेलला परत की मेसेज पाठव. मी उद्या उठल्यावरंच वाचेल पण तरीही पाठव.' असं म्हणते.


'नक्की, आत्ता वाजलेत अकरा! झोप लवकर.'


तो पून्हा अर्ध्यातासासाठी थियटरच्या आत गेला आणि तिघंही रूममेट्स मग मुव्ही संपवून हॉस्टेल परतले. तिला मेसेज टाकायला तो विसरला नाही.

.



दुपारचे अडीच वाजलेले. अक्षराला जणू शंभराव्यांदा तिने विचारलं, 'अक्षरे, कशी दिसतेय मी?'


'खुले बाल, ओठों पे नाजूकसी लिपस्टिक, पंजाबी में दिखती आपकी परफेक्ट फिगर! थोडक्यात माझं आणि प्रज्ञाचं कॉम्बिनेशन.' हेच उत्तर अक्षराने पुन्हा एकदा दिलं.


'मी जाऊ ना नक्की?'


'स्म्रीत्या, आत्ता परत तू विचारलंस तर मी पण येईल सोबत!'


'जाते मी, bye!' ती हसतच रूमच्या बाहेर पडली. इतर मुलींच्या जळक्या नजरा होत्याच पडत, शेवटी तिची प्रियांशला भेटायला जाण्याची वेळ ही त्यांच्यासाठी जळून खाक होण्याचीच झाली होती.


प्रियांश स्म्रीतिचा होता आणि स्म्रीति प्रियांशची, हे आत्ता ती जगासमोर दाखवायला घाबरत नव्हती. फक्त त्यावर बोलणं मात्र टाळत होती.


ऑटोस्टॅंड समोर उभा असलेला प्रियांश तिचीच वाट बघत होता. तिचं ते त्या पंजाबी मधील सौंदर्य त्याच्या ह्रदयाची गती वाढवत होतं. 


'वेड लागलंय तुझं!'


'कशी दिसतेय?'


'अगदी माझी स्वप्नपरी!'


'हा हा हा! हो म्हटली नाहीये मी तेवढं बरंच आहे, एवढं कौतुक हो म्हटल्यानंतर होणार नाहीच‌.'


'कौतुक तर तुझं कधीच थांबणार नाही, तू तुला वाटेल ते काहीही मत बनव.'


'निघायचं? नाहीतर मुव्हीसाठी उशीर होईल. तुला कौतुक करायचं असेल तर अर्थात मला आवडेलंच पण ऑटोमध्ये बसून केलं तरी चालेल.'


ते दोघं स्पेशल ऑटोने निघाले. स्पेशल म्हणजे त्यात फक्त ते दोघंच प्रवासी.


ऑटोचा तो 10 मिनिटांचा प्रवास खूप असा वेगळा होता.रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारे ते नाजूक स्पर्श! त्यात पहिला स्पर्श शरीरात एक वीज चमकवून गेला. खांद्यांच्या होणाऱ्या स्पर्शांनी काही क्षणांसाठी ते एकमेकांच्या खूपच जवळ येत होते. मात्र, दोघांनीही सावरून बसण्याचा प्रयत्न केला. परंतू, व्यर्थ होते ते सावरण्याचे प्रयत्न. दोघांसाठीही ते क्षणं रोमांचकारी होते. एक नवीन अनुभव न बोलता येणारा, डोळ्यांचीही भेट होऊ द्यायचं दोघांनी टाळलं.



असतो रोजच सोबत पण 

आज मन पाणवते आहे..


खरंच एक स्पर्शात बेधुंद होते मन,

आज सोबत बसून हे जाणवते आहे..



तो 10 मिनिटांचा प्रवास एकमेकांच्या जवळ आणत होता,10 तासांसारखा भासत असला तरी तो संपूच नये असंच वाटतं होतं दोघांनाही.


कितीही नाही म्हटलं तरी तो प्रवास संपला आणि चालत जाऊन दोघांनीही थियटर गाठलं. त्याने दोघांसाठी बालकनीतील सर्वांत वरचे कोपऱ्यातील दोन तिकीटे काढलीत आणि पॉपकॉर्न विकत घेत दोघंही थियटरच्या आत शिरले.


मुव्ही खरोखरंच सुंदर होता. त्यातील दृष्य, डायलॉग्ज सगळंच आकर्शित करत होतं.


त्याने तिच्या हातावर त्याचा हात ठेवला. तिनेही तिच्या हाताची बोटं मोकळी करत त्याच्या हातात हात अडकवला.


पूर्ण मुव्ही संपेपर्यंत ते तसेच बसले होते. तो तिला बारकावे सांगत होता आणि तिलाही बोलतं करत होता.


मुव्ही संपला. तो तिला त्याच्या आणि त्याच्या रूममेट्सच्याआवडत्या दाबेलीवाल्याकडे घेऊन गेला.


'या चवीची दाबेली जगाच्या पाठीवर मी अजून तरी खाल्ली नाहीये.'


'जगाच्या पाठीवर?'


'बोलायचं असतं गं तसं!'


दाबेली खाल्यानंतर ती आणखी एक दाबेली घेण्यास पुढे सरसावली.


'बोललो ना स्पेशल आहे म्हणून.'


'खूप आवडली. तिघींसाठी पण घेऊन जाते पार्सल.'


'Good idea!'


'तू नाही घेत त्या दोघांसाठी?'


'कालंच तर खाल्ली आम्ही तिघांनी.'



पुन्हा एकदा स्पेशल ऑटोचा प्रवास. यावेळेस मात्र त्याने बोलतं रहायचं ठरवलं, त्या हव्याहव्याशा स्पर्शांऐवजी.


'मग मुव्ही बघून काय सारांश काढला?'


'आयुष्यात वेदनाच उरतात.'


'आं?'


'हो तर! बघ, ती मेली आणि तो वेडा झाला, जेलमध्ये सुद्धा गेला. मग उरलं काय?'


'उरलं त्या दोघांचं प्रेम.'


'त्या दोघांविना?'


'तो त्याच्या स्वार्थासाठी तिला सोबत घेऊन भटकू लागला. ती सुद्धा दुसऱ्या कुणासोबत लग्न ठरल्यानंतरही लग्नाआधीचे काही दिवस काहीतरी उनाडक्या करू इच्छित होती. तिचं लग्न झाल्यानंतर मात्र त्याला ते त्यांच्यासोबतचे दिवसं पुन्हा हवे होते. तो खऱ्याअर्थाने प्रेमात पडला होता. तिचे काही वेगळे हाल नव्हते. पण शेवटी.. ते जवळ येतात, तिच्या मरणाआधी. कारण असतं त्यांच्यातलं प्रेम!'


'मुव्ही होता तो.'


'हो, अर्थात! पण सारांश मात्र खऱ्या जगाला निगडीतच होता.'


ती विचारात पडली.


'विचार करत बसू नकोस. रूमवर गेली की आवरायचं, दाबेली खायची तिघींसोबत आणि अभ्यासाला बसायचं.'


'हो, नक्की!'


कॉलेज गेट ते हॉस्टेल दोघं काहीच बोलले नाहीत. मात्र, गर्ल्स हॉस्टेलच्या गेटजवळ आल्यावर ती त्याच्याकडे वळून बघत म्हणाली,

'खूप छान वेळ गेला, प्रियांश. आपण पुन्हा कधीतरी परत जाऊ सोबत. Bye!'


चेहऱ्यावर तिच्या खळ्या पडतील इतका सारा आनंद होता.


'पुन्हा एकदा घायाळ केलंस बघ त्या खळ्यांनी.'


तिला हसायला आलं आणि ती हॉस्टेलकडे जाऊ लागली.

.


Image Source: Tumblr


Saturday, 19 September 2020

भाग सतरावा

 भाग सतरावा : कॉलेजचं शेवटचं वर्ष




पहाटेच्या संततधार पावसात जाणवलं

स्वतःच्या भीतीमागचं कारण..

वाटलं पाऊस थांबू द्यावा

थोडं ऊनही पडू द्यावं

पण..

उशीर झाला तर?

डोक्यात कल्लोळ सुरू झाला

स्वतःला सावरण्याचा प्रयत्नही केला..

खिडकीत उभं राहून शोधू लागले

पावसाच्या प्रत्येक थेंबात आपलं अस्तित्व..

खरं सांगू?

दिसणारं दृश्य इतकं मोहक होतं की

मी विसरलेच त्या कल्लोळाला

प्रत्येक कठीण प्रश्नाचं उत्तरही

तितकंच सोप्पंसं वाटू लागलं..

तुझ्या, माझ्या.. अंहं..

आपल्या अस्तित्वाला दिसू लागली

एक नवीन ओळख..

पडतो एकसंध, भिजवतो मनसोक्त

मनास रिझवत राहतो स्वच्छंद

पाऊस तसा खरंच शहाणा आहे..



तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसू लागली. त्याच प्रसन्नतेत ती भिंतीवरच्या घड्याळात वेळ बघते. तो उठलाच नसेल असं तिला वाटत होतं. मोबाईल फोन हातात घेत ती त्याचा नंबर डायल करते.


'रात्री 10 वाजता घरी पोहोचलीस तोही 8 तासांचा प्रवास करून आणि तरी इतक्या लवकर उठलीस आज तू! कसं जमतं गं तुला?' प्रियांशने दुसऱ्याच रिंग मध्ये फोन उचलून तिला विचारलं.


'सवयीचा भाग आहे रे तो आणि चांगल्या सवयींमध्ये खंड नसतो पडू द्यायचा.'


'मानलं! मानलं!'


'पण तू माझा फोन येण्याआधी कसा उठला आज?'


'तुला मी बोललो नाही का कधी की सगळ्या बॉईज हॉस्टेल्सचा गणपती गेल्या बऱ्याच वर्षांपासून A5 हॉस्टेलच्या 215 या रूममध्ये बसविला जातो, जो की आमचा रूम आहे. यावर्षीही ती परंपरा कायम राहणार आहे.'


'खरंच?'


'हो आणि त्याचीच तयारी सुरू आहे. आत्ता रूममधील अस्ताव्यस्त पसारा आवरायचं काम सुरु आहे. मग आरास, इतर सजावट आणि भरपूर काही.'


'क्या बात!'


'दहा दिवसं मी मानसच्या रूममध्ये झोपायला जाणार आहे कारण रूम अगदी मोकळा ठेवायचं ठरवलंय. हीच एक खंत असेन पण तेवढं प्रोजेक्टच्या कामाचा वेग वाढेल.'


'आणि बाप्पाजवळ कुणी नाही थांबणार का?'


'समीर म्हणतोय थांबायचं. त्याला बाप्पाशिवाय करमणार नाही आणि म्हणून तो बाप्पाला एकटं सोडणार नाही.'


'काय बोलतोस? बाप्पाचा परमभक्त वाटतोय तो‌.'


'बाप्पाचे परमभक्त आम्ही तिघंही आहोत पण मग बाप्पाची सगळ्यात जास्त नाव ज्याला माहिती तो बाप्पाजवळ रात्रीसुद्धा थांबणार असं आमचं ठरतं आणि नेहमीसारखं या स्पर्धेत सुद्धा तो एका नावाने जिंकला.'


'क्या बात, खरंच जगावेगळे आहात तुम्ही, धन्य झाले मी ऐकून.'


'आहोतच जगावेगळे म्हणून सोबत असतो.'


'अरे पण मग तुझ्या अभ्यासाचं काय?'


'5 वाजता उठायचं, आवरायचं आणि बाप्पासमोर जाऊन पुस्तक उघडायचं.'


'म्हणजे खंड पडणार नाही तर. मी आल्यावर सुद्धा सगळं आधीसारखंच असायला हवं.'


'4 दिवसांसाठी घरी गेलीयेस तू. मनसोक्त आनंद घेण्याऐवजी वर्षभर घरी गेल्यासारखं बोलतीयेस!'


'गप रे!'


'गणपती आणला का तुम्ही?'


'आज सायंकाळी जाईन बाबांसोबत.'


'छान सजावट कर बाप्पासाठी आणि स्वतःही सज माझ्यासाठी.'


'सजणं, सवरणं आणि मी? अशक्य!'


'म्हणजे माझ्यासाठी इतकं देखील नाही करणार तू?'


'प्रपोज केलाय तू आणि मी अजून हो म्हटलेली नाहीये.'


'मी मात्र माझे आणि बाप्पाचे फोटोज् मेल करणार बघ. ते बघून तरी तू सजशील आणि फोटोज् पाठवशील ही माझी खात्री. आणि हॅल्लो, हो म्हटली नसलीस तरी नाही सुद्धा म्हटलेली नाहीयेस तू हेही ध्यानी असू दे.'


'प्रियांश!' तिला अचानक आलेलं हसू थांबायचं नाव घेईना.


'पुरे आत्ता. AI चा अभ्यास करणार आहेस तू घरी. थोडं लक्ष दे आणि अडलं तर विचार.'


'हो. Bye!'


'आणि उकडीचे मोदक बनवतील ना तुमच्या मातोश्री तर माझ्यासाठी पण बनवायला सांग.'


'सांगते हां, प्रियांश! सांगते!'


'काय सांगायचं ते तू बघ‌. आत्ता Bye!'


'Bye!'


'Bye!'


'Bye!'


'Bye!'


'तू फोन ठेव ना.'


'तू ठेव.'


'अं हं! तू ठेव.'


'ठेवला की नाही अजून?'


'प्रियांश! बरं मीच ठेवते. Bye!'



स्म्रीति फोन ठेवून जशी वळते, तशी तिला तिची आई तिच्या पलंगावर शांतपणे भिंतीला टेकून, पाय पसरून खिडकीत उभ्या असलेल्या तिच्याकडे बघत बसलेली दिसते.


'आई! तू केव्हा आलीस इकडे?' ती धास्तावली होती खरंतर.


'फोनवर बोलण्याचा तुझा आवाज ऐकला आणि पाय आपोआप इकडे वळलेत.'


'आई, तो फक्त वर्गमित्रच आहे.'


'आणि त्याने तुला त्याचं तुझ्यावर प्रेम असल्याचंही सांगितलंय?'


स्म्रीतिला काही बोलवेना.


'तू त्याला हो म्हटली नाहीये हे ऐकू आलं पण तू त्याला नाहीसुद्धा म्हटली नाहीयेस. बरोबर ना?'


'आई, तो खूप पुढचा विचार करतोय आणि...'


'थोडक्यात त्याने तुला लग्नासाठीच विचारलंय तर? तेही स्वतःच्या पायावर उभं राहण्याआधी?'


पुन्हा एकदा स्म्रीतिला काही बोलवेना.


'माझ्या लाडक्या बाळा, मला खात्री आहे की तू कुणा चुकीच्या मुलाचा हात धरला नसशीलच पण तू तुझ्या आई-बाबांचं एकुलतं एक मुल आहेस हे लक्षात असू दे. फक्त तुमच्या पिढीच्या स्वतंत्र विचार करण्याच्या विचारपद्धतीत तुम्ही घेत असलेल्या निर्णयात तुमचे आई-बाबा म्हणून का होईना आम्हालाही सामावून घ्या इतकंच म्हणणं आहे. अर्थात, आमच्या संस्कारात वाढणारे मुल चुकीचं पाऊल उचलणार नाही एवढीच आमची विचारपद्धती असते.'


'तुला असं खरंच वाटतं का आई मी काही चुकीचं पाऊल उचलेल कधीही?'


'तुझी सांगण्याची वेळ तू चुकवू नये इतकंच. म्हणूनच, तुला आवडलेला मुलगा आम्हालाही आवडेलंच कारण तू कुणा टवाळखोर मुलाच्या प्रेमात पडणार नाहीस एवढा विश्वास आहे आम्हा दोघांचा तुझ्यावर, अजूनही.'


'प्रियांश मला अभ्यासात मदत करतोय आणि खरंच इतकं सोप्पं करून ठेवलंय माझ्यासाठी सगळं काही. माझं स्वप्न पुर्ण करायला तो मला मदत करतोय आणि नेहमी अगदी स्वतःच्या विचारांमध्ये मग्न असणारी मी त्याच्यासोबत माझं तिथल्या वातावरणातलं मन मोकळं करू लागलीये, जसं मी तुम्हा दोघांसमोर करते.'


यावेळी तिची आई काही बोलली नाही.


'कुणाच्या प्रेमात वगैरे पडणं माझ्यासाठी खूप नवीन आहे, मी इतक्यात निर्णय नाही घेणार. तू काळजी करू नकोस, आई. फक्त तुझ्या कोमेजलेल्या पाखराला कुणीतरी नव्याने उडायला शिकवतंय इतकंच आजच्या दिवसांपर्यंतचं गणित हे वर्ष सुरू झाल्यापासून.' स्वतःच्या मुलीचं कौतुक करावंसं वाटलं ते बोलणं ऐकून.


'दिसायला कसा आहे?' विषय अजून वाढवायचा नाही असा विचार करत आईने विचारलं. त्यात मुलगा बघायचा मोह तिला आवरला नाही.


'फोटो दाखवते मग तुच सांग‌.‌' मोबाईल काढत स्म्रीतिने प्रियांशचा कॉलेज युनिफॉर्म मधला एक फोटो दाखवला, त्या जुनाट झालेल्या शर्टमध्ये सुद्धा तो चमकत होता.


'तू याला नाही म्हणणारेस?' त्याच्या डोळ्यांत दिसत होतं त्याचं खरं मन, त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं ते दुसऱ्यांनाही प्रसन्न करणारं त्याचं स्मितहास्य. तो फोटो काही गॅदरींग वगैरेच्या दिवसांतला नव्हता, वर्गात कधीतरी कंटाळलेल्या लेक्चरनंतर काढलेला वाटत होता.


'तो खूप पुढचा विचार करतोय असं नाही का वाटत तुला?'


'अर्थात, पण प्रेमभंग वगैरे झाल्यावर दुसरा कुणीही आवडणार नाही आणि फोटो बघूनच सांगते की याच्यासारखा मुलगा तर शोधून सापडणार नाही. म्हणून कुठलाही निर्णय घेण्याआधी मला सांग. मी बाबांना सध्या काहीच सांगणार नाही. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. तुला जर खरंच पुढे जायचं असेल भविष्यात- म्हणजे ती वेळ 5 वर्षांनंतरच यायला हवी असं आम्हा दोघांनाही वाटतं- तर माझी परवानगी आहे.'


'You the best, mumma!'


'माझी गोड मुलगी!' आई स्म्रीतिचा मुका घेते.


'आणि आई, उकडीचे मोदक जरा जास्त बनवशील!' ती चेहऱ्यावर लाजरं हास्य आणत म्हटली.


'नक्की!' आईने मात्र चेहऱ्यावर कुठलेही भाव न दाखवता उत्तर दिलं.


तिने तिच्या वाढदिवसाच्या सगळ्या गिफ्ट्सचे, केकचे, त्याने दिलेल्या गुलाबाचे असे सगळे फोटोज् दाखवत बारिक-सारिक असं सगळं काही वर्णन केलं. तिच्या आईला तिचं जितकं कौतुक वाटत होतं त्यापेक्षा अधिक प्रियांशचं वाटत होतं त्यावेळी. वाढदिवस साजरा करायला न आवडणाऱ्या आपल्या मुलीला स्वतःच्या वाढदिवसाचा किती आनंद झालाय हे तिच्या बोलण्यातून कळत होतं.


हा दिवस कधी न कधी आलाच असता आणि तिच्या पसंतीचा मुलगाच तिचा नवरा व्हायला हवा हेसुध्दा गृहीत धरलेलं होतं. परंतू, आई म्हणून जी भीती होती ती तशीच राहणार होती, म्हणून प्रियांशला एकदा फोन करून त्याला जाणून घ्यावं असा मनात निर्धार करून ती स्म्रीतिला आवरून अभ्यासाला बसायला सांगते आणि रूममधून बाहेर पडते.


Image Source: Guelgram


Wednesday, 16 September 2020

भाग सोळावा

 भाग सोळावा: आजचा दिवस




'काय काय गमावलं या यादीत

तुझं नाव पहिलं आहे

आयुष्याची गोष्ट पुढे सरकत गेली... पण

तुझं नाव तिथेच राहिलं आहे...


सगळ्यात वावरायचं

पण तुझ्या आठवणींत रहायचं नाही

म्हणजे श्वास घेत रहायचा

पण जगायचं नाही...'


माझ्या डोळ्यांसमोरून एका मागं एक आठवण slide show पद्धतीने सरकत होती. सगळं काही 10 सेकंदांत बघितलं आणि खूप रडावंसं वाटलं. पण नाही, हिंमत धरली आणि चेहऱ्यावर खोट्या प्रश्नार्थक नजरेने आकाशकडे बघत विचारलं,


'माझ्या कधीही फिकीर नसलेल्या पक्ष्याला कुणी बरं चोच मारली, तीही इतकी घायाळ करणारी?'


आकाश माझ्या डोळ्यांत बघत म्हणाला, 'कसं जमतं गं स्म्री तुला?'


मी त्याच्या नजरेतून सावरत समुद्रकिनाऱ्याकडे बघू लागली, काहीही न उत्तरता.


'जेव्हा मला जाणवायला लागलं की मी तुझ्या प्रेमात पडतोय त्याच दिवसांत नेमकं uni च्या library तल्या एका पुस्तकात सापडलेल्या कुठल्यातरी कोऱ्या कागदावर या आठ ओळी उतरवलेल्या दिसल्या. अक्षर ओळखीचं वाटलं आणि मन सून्न झालं.'


माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला कळण्याआधीच मी त्या अश्रूंना गालावरून पुसत, त्यांना थांबवलं.


'गेली दीड तास मी तुझ्यासोबत या समुद्रकिनारी बसून आहे, एक शब्दही न बोलता. का? कारण तुला शांतता हवी होती नेहमीसारखी.'


पुन्हा एकदा शांतता. पण माहीत होतं आकाशला शांतता सहन होणार नाही. मुळातच तो माझ्यासारखा नव्हता आणि तरीही जगावेगळं राहू पाहणाऱ्या माझ्यावर त्याचं प्रेम जडल्याची कबुली त्याने आज पहिल्यांदाच दिली. नेहमी प्रवाहासोबत वाहणारा आज जणू रूप बदलून प्रवाह कोलमडू बघत होता.


'किती दिवस जखमा लपवत जगशील?'


'आकाश! नको ना आपण त्या विषयावर बोलायला.'


'तेच म्हणतोय मी! तू आणि तुझे विचार त्याच विषयावर बोलत असतात एकमेकांसोबत.'


काही वेळ शांत राहून मी त्याला म्हटलं, 'जखमा खूप खोल आहेत.'


'त्यांच्याशिवाय जगू शकतेस ना? अर्थात नाहीच! त्या जखमा लपवत लपवत तर भारतातून इथे या परक्या देशात आलीयेस ना? जिथे तू, तुझे विचार आणि त्या खोल जखमा निवांत राहू शकणार.'


'असं नाहीये काही!'


'असंच आहे म्हणूनच तर हा समुद्र हवा असतो तुला आणि बॉडीगार्ड म्हणून मी.'


खरंच हा समुद्र त्या जखमांवर उपचार होता का? त्या लाटा माझ्या मनातले विचार ऐकून माझ्यापर्यंत पोहोचायचे का? समुद्र माझ्यासाठी अगदी लहानपणापासून जवळचा असल्यानं तो मला आपलासा वाटायचा.


'मी सांगतो ते ऐक! एकदा मन मोकळं करून टाक, खरंच पुढे जायला मदत होईल तुला.'


'मनातलं कुणाला तरी रडतारडता सांगून मन हलकं होण्याऐवजी त्या खोलवर असणाऱ्या जखमा नव्याने वर येतील आणि स्वतःला इथपर्यंत आणण्याचे सगळे कष्ट वाया जातील.'


'तर मग असंच जगायचं ठरवलंय आयुष्यभर?'


'तू माझ्या प्रेमात पडण्याआधीच तुला क्षणांत सावरता आलं. तुझ्या इतका नशीबवान मनुष्य आणखी कुणी भेटला नाही याआधी मला.'




'तुला सांगते, इथे येण्याआधी Grey's anatomy चा पाचव्या सिझनचा फिनाले एपिसोड बघत होते मी. एपिसोडची शेवटची पाच-सात मिनिटे त्या TV show मधल्या drama पेक्षा स्वतःच्या भुतकाळात नेत होती. आवडतं character पुन्हा कधीच बघायला भेटणार नाही म्हटल्यावर वाईट वाटणारच ना.'


'त्यातली प्रमुख पात्र असणारी मेरिडीथ जेव्हा बोलत असते तिच्या आवाजात त्या दृष्यांसोबत,  त्रासदायक होत होतं ऐकायला. Did you say it? 'I love you. I don't ever want to live without you, you changed my life.' Did you say it? Make a plan. Set a goal. Work toward it. But every now and then, look around. Drink it in. Cause, this is it. It might all be gone tomorrow.'


'खरंच, for me, it's all gone today! It's all gone, आकाश!'


आकाशला काही बोलवेना. माझ्याकडे बघताना त्याला वाटत असेल की मी आत्ता तुटेल तेव्हा तुटेल आणि मनमोकळं रडेल पण माझ्या चेहऱ्यावर असणारे भाव कितीही गंभीर असले तरी ते माझ्या मनाला तोडू शकणार नव्हते. मान वळवून तो समुद्राच्या लाटांकडे बघत होता, अगदी शुन्य होऊन. गेल्या दोन वर्षांत न भेटलेली मी त्याला आज भेटली होती आणि नव्याने भेटलेली मी जास्त काही न बोलता खूप काही सांगून गेली.


'तू आधी माझ्यासारखी होतीस का? अगदी मनमोकळी, बडबडी?'


'नाही! मी जी गेल्या दोन वर्षांत तुझ्यासोबत होती तशीच मी आधीही होती. फक्त आधीची मी आणि तू या दोघांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे ध्येय गाठण्याचं.'


'तुझं ध्येय गाठलंस तू?'


'हो आणि नाही.'


'म्हणजे?


'म्हणजे तू तुझं ध्येय तुझ्या बळावर पुर्ण कर इतकंच!'



रात्रीचे 10 वाजलेले. पहाटे 6 वाजता एअरपोर्टवर पोहोचायचंय पण त्या समुद्रकिनाऱ्यावरून उठवेना.


'निघायचं परत?' मीच शेवटी न राहवून त्याला विचारलं.


तिथून निघालो आणि सुदैवाने आकाशची बडबड पुन्हा सुरू झाली‌‌.


'भारतात गेल्यावर फोन करत जा. मी येईल तुझ्याकडे तुला भेटायला तुला हरकत नसली तर आणि मग तिथून बंगळूरू जाईल. Destination wedding आहे आत्याच्या मुलीचं केरळमध्ये. महिनाभर फक्त धिंगाणा घालायचं ठरवलंय सर्व भावंडांनी. दोन वर्षांच्या या व्यस्त कारभारातून सुटका मिळत असल्याचा आनंदच साजरा करायचं ठरवलंय मी तर.'


'व्वाह! सुट्यांचंही वेळापत्रक असतं तर तुझं!' दोघंही मनमोकळं हसलो.


'तुझा काय प्लॅन?'


'आराम एकं आराम. आराम दुनं आईच्या हातचं जेवण. आराम त्रिकं बाबांसोबत crossword. आराम चोकं Grey's anatomy. बस्स, याव्यतिरिक्त काहीच नाही होणार!'


'थांब तू! काहीतरी काम लावतोच तुला.'


'मग, आराम पंचे आकाशने लावलेलं काम!'


हसता हसता हॉस्टेल पोहोचलो.


'4 वाजता निघायचंय आपल्याला येथून. लवकर ऊठ!'


'स्म्री, मी झोपणारच नाहीये. एमिली सोबत वेळ घालवायचाय.' आकाश असं म्हणत डोळे मिचकावतो.


'धन्य आहेस तू. भेटू 4 वाजता, bye!'


Image Source: Guelgram



Friday, 11 September 2020

भाग पंधरावा


 भाग पंधरावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष



स्म्रीतिचा वाढदिवस 16 तासांवर येऊन उभा होता. काहीतरी वेगळं, आयुष्यभर लक्षात राहील असं करायचं त्याच्या मनात होतं. पण काय?


उद्याचा दिवस खूप खास व्हायला हवा. त्याची सुरूवात कशी करावी आणि त्यात शेवट व्हायचं नाव येईना असं काहीतरी करावं.


सकाळी कॉलेज साठी निघण्याआधी प्रियांशने समीर आणि विभोरला सांगताच दोघंही वेगवेगळ्या युक्त्या सुचवू लागलेत.


'आपले हक्काचे दोन रॉकेट आहेत मुलींच्या हॉस्टेलमध्ये. तू सांगशील तर लगेच लॉन्च करू स्म्रीतिच्या रूमवर.' विभोर सुचवत होता त्याच्या आणि समीरच्या girlfriends द्वारे हवं ते पोहोच करण्याचा.


'तिचा रूम म्हणजे रशियासारखा सुरक्षित आहे, बाहेरचं पाखरूसुद्धा आत तडफडतं. तुमचे रॉकेटसुद्धा टिकाव धरणार नाहीत तिथे.' प्रियांशला मात्र खात्री होती की स्म्रीति त्या दोघींमुळे आणखीच रूसून बसेल त्याच्यावर.


'मग, तुला काय करावंसं वाटतंय?' समीरला काहीतरी सुचलं होतं, पण तो खात्री करत होता प्रियांशला सांगण्याआधी.


'रूममधल्याच कुणातरीची मदत घ्यावी, असं वाटतंय.' प्रियांश.


'थोडक्यात, जन्काचे पाय धरावे लागणार तर.' विभोर.


'लोटांगण घालूनसुद्धा ती हो म्हणेल याची खात्री नाही.' प्रियांशला खात्री होती जन्काच्या नकाराची, पण विचारावं लागणार होतं.


'ती नाही म्हटली तर पुढचा विचार करूयात. सगळे पर्याय संपलेत तर आपणच सुरूंग लावून जाऊ तिथपर्यंत.' समीर मात्र शेवटचा पर्याय समोर मांडून खरंतर मनाची धाकधूक वाढवत होता.


रात्री बाराच्या वेळी काहीतरी वेगळं केलं म्हणजे वाढदिवसाचे पुढचे संपूर्ण 24 तास आनंदात जातील आणि प्रियांशला तिला मनापासून आनंदात बघायचं होतं. जणू त्यावर्षी तिला आनंद देण्याचा हक्क फक्त त्यालाच हवा होता.

'कॉलेज संपलं की गावात जाऊ. पुष्पांजली गिफ्ट शॉपमध्ये काहीतरी शोधावं लागणार खास असं.' प्रियांश.

'जाऊयात, तिथे हवं ते भेटतंच, फक्त तिला अत्यानंद देणारं असं काय असेल एवढं ध्यानी असू दे तुझ्या.' समीर.

तिघांसाठी त्या गिफ्ट शॉपने चांगल्याच आठवणी दिल्या होत्या. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडींना साजेसं काहीतरी नेहमीच भेटायचं तिथे.

.

सकाळी 11.20 च्या सुमारास जन्का HOD सरांच्या कॅबिनमधून बाहेर येताना दिसली. प्रियांशने तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून जाणलं की तिचा मूड काही चांगला नाहीये. कितीही नाही म्हटलं तरीही त्याला तिची मदत हवीच होती. मनात सगळ्याच प्रश्र्नोत्तरांची गोळाबेरीज करत प्रियांशने तिला आवाज दिला.


'जन्का!'


प्रियांशने तिला हाक मारल्याने ती थांबली.


'जन्का...' जन्काचा डोळ्यांत बघताच मांडलेली सगळी गोळाबेरीज चुकली.


'माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, म्हणून काय असेल ते पटकन बोल.'


'जन्का तुझी मदत हवीय थोडी.' प्रियांश.


'कसली मदत?' डोळे मोठे करत, नेहमीचा राग दाखवत जन्काने विचारलं.


'उद्या स्म्रीतिचा वाढदिवस आहे तर...' तो त्याचं वाक्य पुर्ण करण्याआधीच जन्काने त्याचं बोलणं काटलं.


'तुमच्या प्रेमळ रूसव्या-फुगव्यांत मला नाही पडायचंय.' जन्का.


'पण फक्त...'


'स्वतःच्या आयुष्याचा पालापाचोळा होत असताना, दुसऱ्याच्या आयुष्यातील सुंदर वेलीवरून कोमेजून पडलेल्या काही फुलांना आवरण्यात काय तो अर्थ!' प्रियांशला मध्येच थांबवत ती असं काही बोलून गेली की त्याला क्षणभर तर काही कळेचना. इतक्या मार्मिक शब्दांत मांडण्यासारखं काय झालं असावं तिला.


'HOD सर रागावलेत पुन्हा?' त्या चौघींच्या project मध्ये अडथळे येत असल्याचं त्याला ठाऊक होतंच.


'तीसुद्धा तुझीच कृपा.' स्म्रीति सरांकडे गेलेली त्याच्या suspension वेळी आणि त्याचवेळी सरांनी तिला project topic सुचवलेला, याची लख्ख आठवण करून दिली तिने.


'Please, जन्का! हवं तर मी मदत करतो तुम्हाला तुमच्या project साठी.'


'नको तुझी मदत आणि माझ्याकडून सुद्धा कुठल्या मदतीची अपेक्षा ठेवू नको.' इतकं बोलून ती practical lab कडे जायला निघाली. जाता जाता मात्र जन्का एका वेगळ्या आणि तिच्याही कामी येणाऱ्या अशा gift ची, तिच्याही नकळत कल्पना देऊन गेली.


प्रियांश पुढच्या पर्यायाचा विचार करू लागला. अक्षरा!

.


रात्रीचे 12 वाजलेले. स्म्रीतिच्या वाढदिवसाबद्दल उत्सुक नसल्यानं जन्का झोपी गेली होती. अक्षरा आणि प्रज्ञा रूमच्या बाहेरून केक घेऊन आत येतात. लाईट बंद करून झोपण्याचं नाटक करतात.


स्म्रीतिचा फोन व्हायब्रेट होऊ लागताच ती उठते. प्रियांशचा फोन येतोय बघून ती उचलत नाही, झोपल्याचा बहाणा करावा या हेतूने. पुन्हा फोन वाजू लागताच ती उठते.


'हॅलो!' झोपेतला आवाज खराच होता हे त्याला पटलं असेल का?


'वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा,स्म्रीति!'


'धन्यवाद, प्रियांश!' हे म्हणताच तिला समोर टेबलावर ठेवलेल्या केकसमोर मेणबत्ती पेटवणारी अक्षरा दिसते आणि स्म्रीति ओरडते.


'प्रियांश, ठेवते मी आत्ता. उद्या बोलूयात!'


त्या मेनबत्तीच्या उजेडात तिच्या समोर तिला न आवडणारा फ्रेश क्रीमचा चॉकलेट केक दिसतो. मात्र त्या केकवर एक अभ्यासात मग्न असलेली काचेत मढवलेली छोटीशी मुलगी असते. जरी चॉकलेट फ्लेवर असला तरी तो केक बघून मात्र तिला खूप प्रसन्न वाटलं.


'फ्रेश क्रीमचा केक या छोट्या शहरात कधीच भेटत नाही!'


'प्रियांश तुझ्या प्रेमात पडलाय आणि त्याची जादू काय असते याचा एक प्रत्यय तुला यावा, यासाठी हा खटाटोप.' अक्षरा असं म्हणत हसली आणि लाईट चालू सुरू करण्यास सरसावली. प्रज्ञाने स्म्रीतिच्या हातात चाकू देत फोटो काढायला कॅमेरा हातात धरला. फक्त त्या तिघीच आणि झोपलेली जन्का. नेहमीप्रमाणे रूमच्या बाहेरचं कुणीच नव्हतं.


'वाढदिवसाची सुरूवातच आहे आणि सुरूवातीचे हे दोन ग्रिटींग्ज घे, एक आम्हा तिघींकडून आणि एक प्रियांशकडून.', झोपायला जाण्यापूर्वी अक्षराने दोन ग्रिटींग्ज तिच्या हातात ठेवले.


तिघींच्या ग्रिटींगवर त्यांच्या आठवणींचा एक कोलाज चिटकवलेला होता आणि प्रियांशचं ग्रिटींगवर त्याच्या कॅलिग्राफीच्या कलेतून त्याच्याच कल्पनेतून फुललेली कविता.



'पाच वाजले, फोन आला

मी उठलो, फोन कटला

पुस्तक उघडले, वाचू लागलो

चित्त लागले, जग विसरलो


तुझ्या येण्याने बदल घडले

तू ही बदलली, हसू लागली

खळी दिसताच वेड लागलं

अभ्यासाचं असलं, संभाषण वाढलं


कॉफी प्यायला रोज भेटलो

एकमेकांच्या डोळ्यांत अडकून पडलो


खास दिवस म्हणून लिहावं

चेहऱ्यावरील हास्य द्विगुणित रहावं..'


.


फक्त ते दोघेच तिथे. तो आणि ती.


गेला तासभर इतरांसोबत चाललेल्या गप्पागोष्टींमध्ये दोघांनाही बोलायला जमलंच नव्हतं.


पुढचा काही वेळ एकमेकांच्या डोळ्यांत गेला.


ती शांत होती नेहमीसारखी आणि तो मात्र अस्वस्थ होता कधी नव्हे. ती जर त्याच्याआधी बोलली असती त्या क्षणी तर त्याला आणखी एकदा सॉरी म्हणावं लागणार होतं, नाहीतर वाढदिवशी आणखी एक कविता. त्याच्या त्या चारोळ्या वा कवितांचा त्रास नव्हताच मुळी, तीचं तर त्याच्या शब्दांवर प्रेम जडलं होतं. तिला तर खात्री होती की उत्तराखातर तीही काहीतरी लिहू लागण्याची. पण, समोर मिळालेला तोडका मोडका वेळ पुन्हा त्याच्या कवीपणात जावा हे नको होतं तिला. त्याने बोलावं आणि तिने ऐकावं, हे नेहमीचं सुत्र तिला हवं होतं.


त्याने स्वतःला तिच्या डोळ्यांत इतकं गुंतवून घेतलं की खऱ्या जगाचा त्याला विसरच पडला. त्याच्यातली अस्वस्थता हळूहळू कमी होत होती. त्याला फक्त तिचा तो वाढदिवस अविस्मरणीय करायचा नव्हता‌ तर येणारे सगळेच. आपल्या असणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस आपल्यासोबतच साजरा व्हावा. पण ती आपली असल्याची खात्री कुठे होती? तो त्या विचाराने तरी भानावर आला आणि तिच्याकडे बघत मनमोकळं हसला.


'असं वेड्यागत हसायला काय झालं?' तिनं डोळे मोठे करत, त्यांवरील भुवया उंचावून त्याला विचारलं.


कॉलेज बॅगमधून त्याने तिच्यापासून लपवत काहीतरी काढलं.


तो त्याच्या जागी उभा राहिला आणि आपला उजवा हात पुढे करत तिला उभं राहण्याचं डोळ्यांनीच आमंत्रण दिलं.


तिनेही त्याच्या हातात आपला हात देत उभं राहून त्याला दुजोरा दिला.


त्याने चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून तिच्यासमोर एका गुडघ्यावर बसत तिच्यासमोर लाल गुलाबाचं फुल धरलं.


तो पुढे काय बोलणार हे ठाऊक असूनही ती विचारते, 'हे काय?'


'गुलाबाचं फुल!' तो.


'आणि काय करू मी ते घेऊन?' ती. 


गंमत करायचं ठरवलंच होतं तर तिने.


'आत्ता आणलंच आहे तर घे ना.' तो.


'आणि मग?'


'अगं त्याच्यातला टवटवीतपणा बघ. माझ्यासाठी नको पण त्या गुलाबासाठी तरी.'


'त्याने काय होणार?'


'त्याचा टवटवीतपणा राहील तोपर्यंत डोळ्यांसमोर असेल. मग कुठल्यातरी आवडत्या वहीमध्ये जपून ठेव. मग त्या वहीला जवळ असणाऱ्या कपाटाच्या कुठल्याशा कप्प्यात ठेवून दे.'


ती मात्र त्याचं ऐकून गोंधळली. मध्येच त्याला थांबवत, 'तुला हे सगळं चालेल?'


'आजच्या दिवसाची आठवण करून द्यायला ती वही पुढे आपल्याच घरातल्या कपाटात राहणार म्हटल्यावर चालेलंच काय पळेलसुद्धा.'


ती हे ऐकून लाजली. थंड हवेची झुळूक जणू तिला सुखावून गेली. ह्या दिवसाची ती आतुरतेने वाट बघत होती. त्याने तिला प्रपोज करावं आणि तेसुद्धा तिच्या कायमस्वरूपी आठवणींत राहील असं.


मनातल्या सगळ्या भावना लपवत, समोर एका गुडघ्यावर बसलेल्या प्रियांशकडे बघत ती पुढच्याच क्षणी जोरजोरात हसू लागली.


'प्रियांश, रोज ५ वाजता भेटायला येशील तेव्हा न चुकता मोगऱ्याची फुलं आणत जा.'


'का?'


'गुलाबाचा गजरा माळूनही त्यात

मोगऱ्याचा सुगंध दरवळणार नाही!'


प्रियांश फक्त बघत राहिला. तिच्या चेहऱ्यावर असलेलं ते हो म्हणणारं हास्य होतं पण डोळ्यांत नाही म्हणण्याचा ठामपणा सुद्धा दिसत होता. सगळं कसं क्षणभंगूर होतं तिच्यासाठी, आठवणी सांभाळून ठेवण्यापेक्षा त्या जगायच्या होत्या तिला. प्रेमातही पडायचं पण उद्याचं काय या भ्रमात नाही जगायचं, इतकंच गणित होतं तिचं, समजूनही न समजणारं.


'तू म्हणशील तर पहाटे ५ वाजता सुद्वा आणून देईन.' प्रियांश असं म्हणताच दोघंही हसू लागलेत. आणि पुन्हा त्या खुर्चींवर जाऊन बसलेत. पुन्हा एकदा बोलू लागल्यात त्यांच्या डोळ्यांच्या भाषा.


'कविता ऐकवू एक?' त्याने असं विचारताच तिने चेहऱ्यावर प्रसन्नता दाखवत होकारार्थी मान हलवली.


तिचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी काय नाही केलं त्याने. म्हणजे तिला आवडणारा फ्रेश क्रीमचा व्हॅनिला केक न आणता चॉकलेट केकची आवड निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो ही कुठून तरी रात्री 12 वाजता तिच्या हॉस्टेल गेटवर आणून अक्षराकडे देत. त्या केकवर अभ्यासात मग्न असलेली काचेत मढवलेली छोटीशी मुलगी ठेवून अगदी तिच्या स्वप्नालाही जागतं ठेवलं. त्या केक सोबत ग्रिटींग ज्यावर त्याच्या कॅलिग्राफीच्या कलेतून त्याच्याच कल्पनेतून लिहीलेली पहिली कविता. दिवस सुरू झाल्यानंतर त्याच्या एका रूममेटच्या गर्लफ्रेण्ड्स पासून तर गर्ल्स हॉस्टेलचा वॉचमन, त्याच्या दुसऱ्या रूममेटची गर्लफ्रेण्ड या सगळ्यांच्या हस्ते मिळालेली एक एक ग्रीटिंग कार्ड. आणि प्रत्येक कार्डमधून तिचं आणि फक्त तिचंच कौतुक.



शब्द हल्ली

निवांत असतात

मनात आले तर

कवितेत बसतात...


नाहीतर असंच

मनात रेंगाळतात...


म्हणूनच जरा मोकळ सोडलं

तर तुझ्याकडे जाऊन थांबतात...


कधी तुझ्या गालावरच्या

खळीत अडकतात,

कधी त्या जीवघेण्या लटेकडे

फक्त बघत राहतात...


माझ्याही नकळत माझे शब्द

माझ्यासारखेच वागू लागतात...



मनात हो असतानाही ती त्याला काहीच उत्तर देत नव्हती, त्याचं इतकं प्रेम होतं तिच्यावर तरीसुद्धा. ती हो म्हणत नसल्याचा तिला पश्र्चाताप होणार होता का नंतर? तिला कळत नव्हतं.


अक्षरा म्हणालीच होती रात्री, 'प्रियांश तुझ्या प्रेमात पडलाय, स्म्रीते. फ्रेश क्रीमका केक क्या चीज हैं जानेमन, वो तो चांद तारे भी तोड़ के ला दे तुझे. बस मांगने की देर हैं!'


त्याने आयुष्यभरासाठी सोबत राहण्याबद्दल विचारलं आणि तिने ते मनातली भीती लपवत हसण्यावारी नेलं. हो म्हणावं असं कितीही वाटत असलं तरीही तिच्या शब्दांना वाट मिळेना.


हॉस्टेलला परतल्यावरही प्रत्येक तासाला एक एक सरप्राइज भेटत होतं. आनंद खूप असला तरीही भीती वाटत होती तिला तिचीच. तिच्या स्वभावाची. हो म्हणण्यासाठी ती वेळ घेणार होती, पण किती हे तिलाही कळत नव्हतं.


'वाढदिवस साजरा झालेल्या दरवर्षीच्या कितीतरी वेगवेगळ्या आठवणी...

केक, जो कुणी आणणार तो त्याच्याच आवडीचा फ्लेवर आणणार...

मग चॉकलेट फ्लेवर आवडत नसला तरीही दिसूनच जातो तो अगदी जीभेची चव हृदयात साठवावी इतका ओसंडून वाहणारा चेहऱ्यावरचा आनंद...

मग समोर दिसणारे ग्रीटिंग कार्ड्स.. गिफ्टही दिसतीलंच डोळ्यांना पण स्वतःविषयी दोन कौतुकाचे आपल्याच लोकांनी लिहीलेले ते टिपिकल मेसेजेस मात्र हवेहवेसे... प्रत्येकाची शैली वेगळी.. मनात साठवून ठेवावं असं काहीतरी वाचणं... आणि मग भुतकाळाच्या पटलावर जाऊन विनाकारण त्यात कारण शोधणं... ते सगळेच सुखावणारे क्षण, तरीही भलतीकडेच भरकटणारे मन.. न आवडणाऱ्या आठवणी काही, पण त्यामुळे ते लिहीलेले प्रेमाचे भावूक करणारे आवडू लागलेले शब्द...

मग हातात येतं ते 'खास' ग्रीटिंग कार्ड! पहाटे ५ वाजता 'उठ' म्हणण्यासाठी केलेल्या फोनचं तक्रारपूर्ण कौतुक... ४.३० वाजता कॉलेज सुटल्यावर कॉफी कॉर्नरवर बसून घालवलेले एक-दोन तास!

त्या वेळात असंख्य रीते केलेले ते कॉफीचे मग... त्यात किती कुणाचे याचाही कुठला हिशोब नाही..‌

चहा आवडणाऱ्या व्यक्तीला कॉफी कॉर्नरवर कॉफीच प्यावी वाटते... म्हणून चहा न आवडणारे कॅन्टीनचा आग्रह धरत नाहीत... कॅन्टीनमध्ये चहाच्या कपांऐवजी रीते होतात ते फक्त शब्द... त्या गर्दीत डोळ्यांची भाषाच उरत नाही...

आयुष्य सोबत काढावं या हेतूने पडू लागलेले पाऊल... आवडीनिवडींच्या सबबी... पण या सर्व मनाने बांधलेल्या कल्पनाच, नाही? खूप बोलावंसं वाटतं पण वेळ आहे आपल्याकडे, असं म्हणत वर्तमानकाळात रूतून राहणारी ती पाऊलं...

दलदल वाढण्याआधी ठरवायला हवं भविष्याबद्दलही‌, नाहीतर मग येतो दरवर्षी वाढदिवस, उरतात आवडणारे कौतुकाचे शब्द आणि सोबतीला असतात न आवडणाऱ्या आठवणी...

आपल्याला काय हवंय हे योग्य वेळी आपल्यालाच शोधता यायला हवं!'  त्याचा त्या वाढदिवशी आलेला शेवटचा मेसेज.


'व्हॅनिला केकवरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नसलं तरीसुद्धा चॉकलेट केकच्या चवीत गुंतवल्याबद्दल मनस्वी आभार. वाढदिवस वगैरे साजरे करावे असं वाटलं नाही कधी पण आज खऱ्याअर्थाने आनंद मिळाला.' तुझ्याही प्रेमात पडलीय, असं लिहावंसं खूप वाटलं तिला पण स्वतःला आवरत तिने तितका टाईप केलेला मेसेज त्याला पाठवला.


(Image source: Guelgram)


.