सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Monday, 28 January 2019

भाग पाचवा

Link: भाग चौथा




भाग पाचवा: कॉलेजचं शेवटचं वर्ष



पाच मिनिटे उशिराने स्म्रीति वर्गाच्या दरवाजाशी येऊन थांबते. लेक्चररची परवानगी घेत ती आत येते. लेक्चरर पुन्हा ब्लॅकबोर्ड कडे (जो की रंगाने हिरवा असतो) वळत कुठल्यातरी प्रोग्रामचं अल्गोरिदम लिहायला सुरुवात करतात.

पहिली संपूर्ण रांग, शेवटची संपूर्ण रांग आणि चौथ्या रांगेतील एक बाक सोडला तर बसायला कुठेच जागा नसते.

DAA (अर्थात, Design and Analysis of Algorithms) तसा मार्क्स मिळवण्यासाठी म्हणायचं झालं तर खूप सोपा विषय. समजून घ्यायला मात्र तितकाच किचकट. कुठल्याही कम्प्युटर प्रोग्रामचं आधी अल्गोरिदम समजलं की कोडींग अगदी सहज सोप्या पद्धतीने लगेचच जमून जाते.

त्या विषयाला शिकवणारे लेक्चरर मात्र पूर्ण अल्गोरिदम त्या ब्लॅक बोर्ड वर लिहायचे आणि मग त्या अल्गोरिदम ला समजावून देण्यात धन्यता मानायचे. थोडक्यात, रट्टा कसा मारावा याची शिकवणच.

त्यांच्याकडे तसंही कुणी लक्ष देत नसायचं. आपल्यातच गुंतलेले असायचे सारे‌. कुणी प्रॅक्टिकलचं असाइनमेंट लिहिण्यात गुंतलेलं. कुणी कुठलीतरी कादंबरी वाचण्यात गुंतलेलं. कुणी मोबाईल फोन मध्ये गुंतलेलं. कुणी ब्लॅकबोर्ड कडे बघत कुठल्यातरी विचारात गुंतलेलं. कुणी बाकावर डोकं टेकून झोप काढण्यात गुंतलेलं. सगळेच वर्गात हजर असायचे ते फक्त आणि फक्त अटेंडन्ससाठी.

थोडक्यात, शेवटचे वर्ष असल्याने पुढे प्रोजेक्टचा लोड वाढेल आणि त्यासाठी लेक्चर्स सुद्धा बंक करावे लागतीलच. म्हणून सुरुवातीलाच अटेंडन्स अगदी व्यवस्थित राहावी, त्यामुळे सगळेच हजर.

DAA चे लेक्चरर मात्र हे सगळं माहित असूनही उगाच इतर लेक्चरर्स प्रमाणे कुठल्या मर्यादा टाकत नसत. तेही हसत खेळत एक तास संपवायचे आणि त्यामुळेसुद्धा सगळ्यांना त्यांचं लेक्चर बुडवायची इच्छा होत नसे.

स्म्रीति चौथ्या रांगेतल्या बाकावर बसून तिच्या स्वलिखित नोट्सना उघडते न उघडते तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो,
'May I come in sir?'

प्रियांश वर्गात येतो. स्म्रीति जवळ असलेली जागा आणि मागच्या पुढच्या दोघं बाकांवरच्या जागा सोडल्या तर त्याला बसायला कुठेच जागा नसते. चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणत, हृदयाचा ठोका बदलण्याआधी तो ठरवतो.

हलके पाऊलं टाकत तो स्म्रीति जवळ जाऊन बसतो.

आज तो आणि ती म्हणजे,
नवा सुगंध, नवा स्वाद
वा नवा रंग, नवा वाद
यापलीकडे काही घडेल
तर ते काहीसं असेल खास.

स्म्रीति त्याच्याकडे अगदी रागात बघते. खरंतर मनातून ती खूप चिडलेली असते.

त्यात अर्धा तास सुद्धा झालेला नसेल त्यांच्या रूम मधल्या वादाला. आत्ता वादाचे कारणच शेजारी येऊन बसल्याने तिची आतल्याआत होणारी घुसमट साहजिक होती.

त्यात तिच्या डावीकडील रांगेतल्या तिसऱ्या बाकावरून दोन व्यक्तींच्या चिडक्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या.

'एवढंच लेक्चर फक्त.' इतकंच काय ती त्या दोघींना ऐकू जाईल या भाषेत सांगते. साहजिकच दोघींचा रिप्लाय नकोच ऐकायला म्हणून ती बाकावर डोकं टेकते.

'खरं सांगायचं तर त्या दोघींनाच नाही, साऱ्या वर्गाला सांगू शकतेस की एवढंच लेक्चर तू इथे माझ्या शेजारी बसणार आहेस म्हणून.' प्रियांश अगदी सहजच एवढं बोलून गेला.

'का म्हणून?' तिने राग दाखवत त्याला विचारलं.

'कारण जितक्या भुवया त्या दोघींनी उंचावल्या आहेत तितक्याच इतरांनीही.' प्रियांश.

'तू का बसलास इथे?' ती इतकं बोलून थांबली पण तो काही बोलणार त्याआधीच ती म्हटली,
'कालचा दिवस काय कमी होता का? आता लेक्चर संपेपर्यंत एक शब्दही बोलू नकोस तू.' प्रियांश फक्त हसला.

'कालचा दिवस तुझ्या project lead चा होता. तिला आठवणीने विचार की तिच्या शरीरातल्या नसांतून रक्त वाहतं की फक्त माझ्यासाठी विनाकारण असलेला राग.'

'श्श! एक शब्दही नाही ऐकायचाय मला आत्ता.' ती इतकं बोलून त्याला शांत करते.

नेहमी बडबड करत असणाऱ्या प्रियांशला विरुद्ध टोकाचा स्वभाव असणाऱ्या स्म्रीतिसमोर नमतं घ्यावंच लागणार होतं.  एकतर त्याला उणाड समजणाऱ्या group चा ती हिस्सा असली तरी त्यांच्यात आदल्यादिवशी सुरू झालेल्या project चा वाद पुढे वाढला तर तेव्हा त्या चौघींपैकी कुणीतरी शहाणं वागणारं म्हणून तो तिच्याकडे बघत होता.

स्म्रीति सकाळी अभ्यासलेलं DAA चं अल्गोरिदम समजून घेण्यात गुंतलेली.

प्रियांश मात्र तिच्याकडे बघत होता. तीन वर्षांत जणू तो तिला पहिल्यांदाच बघत होता. वहीवर काहीतरी लिहीतानासुद्धा त्याचं लक्ष मात्र तिच्यावरून काही हटेना.

ते तिचे काळे, दाट आणि चमकदार केस त्या ponytail hairstyle मुळे तिच्या उभ्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला सोपं करत होते. तो तिच्या शरीराचा गोरा रंग. ती काळेभोर डोळे तितकेच आकर्षक‌. तिचं ते तिच्या उभ्या चेहऱ्याला शोभून दिसेल असं धारदार नाक. आणि कुठेतरी हरवलेलं मन.

त्याला पहिल्यांदा आयुष्यात कविता लिहीण्यासाठी शब्दच सुचत नव्हते आणि जे सुचले ते काही केल्या कविता म्हणून शोभत नव्हते.

वहीच्या एका पानावर बरीच खोडाखाड केल्यानंतर पुन्हा एका नवीन पानावर तो शब्द जुळवू लागला. कागदं वाया गेल्याशिवाय नव्या कोऱ्या कागदावर लिखाणाचं महत्त्व फुललेलं दिसून येत नाही.

वेळ जात होता. शब्द जुळत होते, सुचत होते. लेक्चरर काहीतरी बडबड करत होते. सगळेच आत्ता हळूहळू कंटाळले होते.

'एवढं काय बघतोय?' स्म्रीतिनेही शेवटी न राहून प्रियांशला विचारलंच.

तिचंही लक्ष त्या वेळात त्याच्याकडे जात होतं. कविता आणि छोट्या-मोठ्या कथा लिहीण्याची आवड असणारा प्रियांश समोरच्याच्या मनातलंही लिहायचा, हे ती जाणून होती.

अर्थात, त्याच्यासाठी वेड्या असणाऱ्या कॉलेजच्या मुलींचा तिला आणि जन्काला वाटणारा मुर्खपणा खरंतर तिलाही जाणवला. तरीही, तो मुर्खपणा नव्हताच हे मात्र ती स्वतःला पटवू शकणार नव्हती. तो इतरांपेक्षा वेगळा होता हे मात्र तिला नक्की जाणवलं होतं.

'बघतोय की थॉमस कॉरमनची एवढी किचकट भाषा कशी समजत असेल तुला.' प्रियांश.

'तुला कसं कळलं की कॉरमनच्या रेफरन्स बुक मधून काढलेल्या या नोट्स आहेत म्हणून?' स्म्रीति त्याला techmax सोडून इतर कुठल्या पुस्तकातून अभ्यास न करणाराच समजत होती.

'अगं ती इंग्लिश बघ, किती कठीण वाटतेय. नाही म्हणजे तुला कळत असेल तर चांगलंच आहे पण खरच समजतं का गं त्यातून?' प्रियांश.

'तुझ्या माहितीसाठी मी आपल्या क्लासची फिफ्थ टॉपर आहे.' स्म्रीति.

'तर? त्याचा अर्थ असा होत नाही की तुला कॉरमनची भाषा सहज समजत असेल.' प्रियांश.

'काहीही.' स्म्रीति.

'बघ तू लिहीलेलं. असं वाटतंय सरसकट कॉपी-पेस्ट केलंय.'

'मी जेवढं लिहिलंय तेवढं मला समजलंय.'

'मग सांग, इथे (n-1) का घेतलाय?'

त्याला तिने अगदी व्यवस्थित, कॉरमनच्याच इंग्रजीत सांगितलं.

'फक्त n घेतला असता तर नसतं का चाललं?' प्रियांशने तिने लिहीलेल्या त्या अल्गोरिदमकडे बघत विचारलं.

'अं... मला वाटतं की नाही चालणार.' ती गोंधळलेल्या स्वरात म्हटली.

'तुला असं वाटतं?' त्याला हसायला आलं, 'थोडक्यात‌ कॉरमन सुद्धा आपल्या  लाडक्या सरांचा शिष्य दिसतोय, जेवढं आहे syllabus मध्ये तेवढंच समजून घ्या सांगणारा.' त्याचं हसणं काही थांबेना.

'अगं नाहीच वापरता येणार.' प्रियांशने मग स्म्रीतीला n घेतला तर काय काय चुकेल हे समजावलं.

'हे तर कॉरमनच्या मेथड पेक्षाही सोपं वाटतंय.' तिचं असं बोलणं ऐकून तो आणखी हसला.

'म्हणूनच तुझी rank पाचवी आहे. पहिली नाही.'

मर्मावर बोट ठेवला की कुणालाही त्रास होतोच. नेहमीच मोठ्या अपेक्षा ठेवणाऱ्या स्म्रीतिला त्याचं बोलणं खरं असलं तरी खटकलंच.

'तू पहिल्या दहांत तरी आहेस का रे?' ती थोडं चिडतच त्याला विचारते.

'पहिल्या विसांतही नाहीये खरंतर. पहिल्या दहांत येणं फार कठीण नसतं हे मात्र आज कळलंय.' तो तिच्या मर्मावर पुन्हा बोट ठेवत होता.

'पण जेवढे मार्क्स हवेत ना तेवढे तर काढणारच.' प्रियांश.

'तर मग लक्ष दे तुझ्या स्वतःच्या मार्क्सवर, नाहीतर केटी लागायची.' स्म्रीति.

तो हार मानेल तर ना.

'मला थोडे ना तुझ्यासारखी पहिलं येण्याची स्वप्नं पडतात.'

ती शांत होते, चेहऱ्यावर राग नसतो तर दिसत असतात खूप साऱ्या शंका.

'तसंही तुला पहिली जी Papa's girl आहे, थोडक्यात termwork च्या जोरावर पुढे असणारी आणि तिसरी असलेली तुझी project lead या दोघींचीच स्पर्धा असेल, वर्षभर.'

'का? आपल्या class चा default topper संन्यास घेतोय का आणि त्याच्यासोबत चौथा असलेला तुझा project partner कुंभमेळ्याला जातोय का?

'तू पण ना! ऐकूणच...' तो आणखी काही बोलणार त्याआधीच लेक्चररच्या अटेंडन्स घेण्याचा आवाज ऐकू येतो.

'Roll no. 12? Roll no. 12? Roll no. 12?'

'Roll no. 12, present sir!' प्रियांश ओरडतो.

'अर्थात प्रियांश, तू अभ्यासाच्या टिप्स घेण्यात busy असणार स्म्रीति मॅडमांकडून.' लेक्चरर असं म्हणताच साऱ्या वर्गात जोरदार हास्यकल्लोळ.

सगळ्यांना शांत करत ते इतरांची अटेंडन्स घेण्यात मग्न होतात. Roll no. 16 स्म्रीतिचा असल्याने ती कुठलीच reaction देत नाही त्याक्षणी.

ती टिप्स देण्यात मग्न नव्हती हे मात्र तिने लगेचच present sir म्हणत आपलं लक्ष ठिकाणावर असल्याचा अघोषित प्रयत्न केला.

'Thanks for the embarrassment! मी जाते पुढे बसायला.' रागातच ती तिच्या नोट्सना एकत्र करत असते.

'तू बस इथेच, मी जातो.' असं म्हणत लेक्चरर गेल्यागेल्या तो पुढच्या लेक्चरसाठी पहिल्या बाकावर बसतो, वहीचं एक कागद तिथेच विसरून.

तिने तो कागद बघितला. त्याला ओरडून सांगावं वाटत होतं तिला की ती इतरांसारखी मुर्ख नव्हती पण तिच्या स्वभावात ना ओरडणं होतं नाही पुढचं लेक्चर घेत असलेल्या लेक्चररसमोर ओरडण्याची हिंमत.

मनात कितीदा तरी स्वतःला नाही म्हणत तिने त्या कागदावर लिहिलेली कविता वाचलीच. अर्धवट जुळलेल्या शब्दांच्या त्या कवितेतून तिला जो सारांश कळायचा तो कळला.

असंच अचानक एकेदिवशी
तिची न त्याची मैफिल भरली
कल्लोळातील अपुर्व शांतता
क्षणभर मध्येच उभी राहिली

रागावलेले मन हे तिचे
तितकीच बावरलेली स्वप्नंही
गुंतासगळे संवाद गुंतीचेच
तरी उलगडत गेलं बरंच काही...


Image Source: Geulgram

Link: भाग सहावा

Thursday, 24 January 2019

भाग चौथा

Link: भाग तिसरा




भाग चौथा: कॉलेजचं शेवटचं वर्ष



जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥

राम दूत अतुलित बल धामा ।
अञ्जनि-पुत्र पवनसुत नामा ॥


शेवटच्या वर्षातल्या engineering च्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या A5 हॉस्टेलच्या रूम नंबर 215 मध्ये नेहमीप्रमाणे उगवलेला एक दिवस.

Britney Spears च्या गाण्यांचं वेड आख्ख्या हॉस्टेलला लावणारा समीर दिवसाची सुरुवात मात्र हनूमान चालीसा ऐकूनच करत असे.

घड्याळात 7.30 वाजताच प्रियांशच्या मोबाईल फोनचा अलार्म वाजायला लागतो.

विभोर नुकताच कॉलेज गेटच्या बाहेर newspaper विकायला बसणाऱ्याकडून Times of India घेऊन रूममध्ये आलेला असतो.

'प्रियांश!' समीर आवाज देत प्रियांशला उठवण्याचा प्रयत्न करतो. प्रियांश मात्र अलार्म snooze करत कुस बदलून पुन्हा झोपतो.

पुढची 10 मिनिटे समीर computer वर त्याच्या project ला related असणारे documents वाचत असतो. तर विभोर जाहीरातींनी भरलेल्या Times of India मधील बातम्या शोधून शोधून वाचत असतो.

तिघांचे बेड्स दरवाजासमोर खिडकी असणाऱ्या भिंतीला लागून असतात. दरवाजालगतच्या भिंतीला लागून तिघांचेही टेबलं. त्यापैकी दोन टेबलं प्रियांशच्या computer ने व्यापलेले. कधीतरी कुणाचं laptop रूममध्ये आलं तरंच काय त्या तिसऱ्या टेबलचा वापर होत असे.

भिंती म्हणाल तर स्पायडरमॅन, गोकू आणि प्रिती झिंटा या तिघांच्या छोट्या-मोठ्या पोस्टर्सने सजलेल्या. गणपतीच्या 10 दिवसांत एकही पोस्टर्स दिसायला नको, इतकीच काय ती हॉस्टेलच्या वार्डनकडून मिळालेली ताकीद.

10 मिनिटांनंतर पुन्हा अलार्म वाजतो. समीर उठतो. भिंतीला टेकून असणाऱ्या बेडवर झोपलेल्या प्रियांशला हलवून उठवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. प्रियांश blanket तोंडावर ओढून न उठण्याचा संकेतच देतो जणू. प्रियांशला पुन्हा एकदा हलवून समीर अलार्म बंद करत आंघोळीसाठी जातो.

रूम नंबर 215 ही खरंतर त्या हॉस्टेलमधील नशीबवान रूम. नशीबवान असण्याला कारण म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवात कॉलेजला बसणारा गणपती ह्याच रूम मध्ये अगदी 10 - 15 वर्षांपासून बसत असे. ती गणपतीची 10 दिवसं म्हणजे 215 साठी अगदी वर्षभर वातावरणाला तेजस्वी करून जाणारी, खास अशीच.

त्या वर्षी 215 चं नशीब लाभलं होतं ते, Computer ला असणाऱ्या प्रियांशला, Mechanical ला असणाऱ्या समीरला आणि Civil ला असणाऱ्या विभोरला.

बघायला गेलं तर ती तिघंही टॉपर्सच्या यादीत पहिल्या 30 मध्येही नव्हते. रूम allotment मधून त्यांना मनासारखा रूम भेटणं अशक्यंच. पण यादीत असणारे पहिले दोघं सोबत राहणार होते. मग काय त्या कॉलेजच्या टॉपर्स असणाऱ्या दोघांना या तिघांनी दोघांच्या नावावर दोन वेगवेगळ्या रूम्स घ्यायला सांगितलं. अर्थात, गरजेवेळी कुणासाठी सुद्धा मदतीस धावून येणाऱ्या या तिघांना हॉस्टेल मध्ये नाही म्हणणारं कुणी नव्हतं. मग, दोघं टॉपर्स आणखी एकासोबत 216 मध्ये आणि ही तिघं शेजारील 215 मध्ये.

कपाटात असणारी चार कप्पे तिघांची एकत्र. दोन कप्प्यांत तिघांची कपडे आणि इतर महत्त्वाचे सामान. एका कप्प्यात तिघांनाही व्यवस्थित हाताळता येतील अशी रचलेली पुस्तकं.

चौथ्या कप्प्यात होता तो तिघांच्याही घरून आलेला वेगवेगळ्या पद्धतीचा खाऊ. हा चौथा कप्पा मात्र त्या तिघांपुरताच नव्हता. त्यांच्या रूममध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तो कप्पा आपलासा वाटे आणि म्हणूनच त्या कप्प्याला कधी कुलूपही नसायचं.

हॉस्टेलचं आयुष्य ते काय! घराबाहेर रहायला भेटलेलं एक घर. रक्ताच्या नात्यांची कमी न भासू देणारी काही मैत्रीच्या पल्याडची नाती.

अगदी 2nd year पासून असलेली त्यांची खास मैत्री त्यांना कदाचित आयुष्यभर सोबत ठेवणार होती. एकमेकांचे स्वभाव, सवयी आणि आवडीनिवडी त्यांना माहीतच होत्या. तिघंही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात पोहोचलेले. तिघंही अभ्यास अन अभ्यासाव्यातिरिक्त इतर साऱ्या बाबींमध्ये पटाईत. Percentage म्हणाल तर तिघांचेही चांगलेच, फार चांगले असं नाही पण तरीही चांगल्या ठिकाणी नौकरी मिळवण्याइतके चांगले.

तिघांची कॉलेजमध्ये एक वेगळीच हवा होती. जेथे कुठे स्पर्धा असेल तेथून जिंकूनच परत येणारी.

तिघंही एकमेकांशिवाय शून्यच, ना एकमेकांशिवाय जेवण, ना एकमेकांशिवाय फिरणं अन नाही एकमेकांशिवाय movies बघणं. तिघांच्या branches वेगळ्या असल्या तरी अभ्यासही सोबतीनेच. Theory Machines ची असो, Structure ची असो वा Computation ची, शिकण्याची पद्धत मात्र एकच.

समीर अन विभोर दोघांनाही girlfriends होत्या पण तरीही त्या तिघांच्या मैत्रीत त्या दोघींनी कधीच बाधा घातली नाही. त्या दोघांनीही प्रेमाला मैत्रीच्या आड येऊ दिलं नाही. प्रियांश प्रेमात वगैरे काही नव्हता जरी त्याच्यामागे फिरणाऱ्या मुलींची संख्या बरीच होती. तो स्वतःच्या स्वभावाला जाणून असल्याने girlfriend ह्या किड्यापासून तो दूरच होता.


घड्याळात सकाळची 8 वाजून 30 मिनिटे झालेली तरी प्रियांश अंथरुणातच पडून होता. समीर आणि विभोर दोघंही तयार होऊन बसले होते. विभोर प्रियांशला हाक मारून उठवण्याचा प्रयत्न करतो पण प्रियांश मात्र ‘झोपू दे ना’ म्हणत पुन्हा कूस बदलतो.

‘समीर, अरे ह्या प्रियांशच्या आळशीपणावर काहीतरी जालीम औषध शोधायला लागणार आहे आपल्याला.’ विभोर समीरला म्हणतो.

‘खरंय. काहीतरी उपाय शोधायलाच हवा, नाहीतर साहेबांची काही खैर नाही. अरे, overall first class साठी कमीत कमी 67 percentage काढावे लागणार आहेत आपण तिघांनाही. प्रियांशच्या नादात आपले पण हाल व्हायचे वाटतं.’

समीर बुटाची लेस बांधता बांधता प्रियांशला हे ऐकून तरी जाग यावी म्हणून मोठ्याने बोलतो.

‘मला तर वाटतं, एखादी मुलगीच शोधू आपण जेणेकरून तीचं ऐकून तरी हा सुधरेल वा कमीतकमी सुधारण्याचा प्रयत्न तरी करेल. त्याच्या class मधील मुलींची माहिती...’

विभोर पुढे काही बोलणार तितक्यात प्रियांश त्याच्या पलंगावरून उठून म्हणतो,
‘आवरतो ना मी. तसंही बराच वेळ आहे, होईल माझं तितक्यात आवरून. Class सापडेलंच आणि DAA चं lecture आहे, 5 मिनिटे इकडेतिकडे झालीत तरी चालेल.’

‘हां, DAA चं lecture आहे ना तुझं मग पहिला बेंच पकडायचा नसतो तुला तर जेणेकरून कविता लिहायला कुठलीही अडचण नको.' समीर प्रियांशला आठवण करून देतो.

'त्या snooze option शोधणाऱ्या माणसाचे पाय पडले पाहिजेत तू. 7.30 चा अलार्म लावून 8.40 ला उठतो.’ समीर हसतहसतच म्हणतो.

’11.00 वाजता भेटू, नाश्त्यासाठी.’ समीर अन विभोर दोघंही असं म्हणत रूममधून बाहेर निघतात.

प्रियांश स्वतःशीच बडबड करत कॉलेजला जाण्यासाठी तयार होत असतो.

'कधीतरी येईल तो दिवस जेव्हा मी सुद्धा लवकर उठेल. काय समजतात ही दोघं. प्रियांश, chill हो. अरे, गेल्या 3 वर्षांत एकदाही तू त्या दोघांआधी उठला नाहीयेस. जे जमणार नाही ते कसं करशील? पण उपाय तर शोधायलाच हवा.'

रूम लॉक केल्यानंतर पुन्हा रूमचं लॉक उघडून, आत जाऊन उशीखाली ठेवलेला मोबाईल फोन उचलतो आणि व्हायब्रेटर मोडवर करून फोन खिशात ठेवतो. पुन्हा रूम लॉक करून घाईघाईने होस्टेलच्या पायऱ्या उतरून ग्राऊंडला एक चक्कर मारून (जो मारावाच लागे) कॉलेजच्या पायऱ्या चढून 234 मध्ये पोहोचतो.

नऊ वाजून सहा मिनिटांनी!

Image Source: Geulgram

Link: भाग पाचवा

Monday, 21 January 2019

भाग तिसरा


Link: भाग दुसरा




भाग तिसरा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


घड्याळात पहाटेचे पाच वाजलेले. इंजिनिअरिंग कॉलेजचं वातावरण अशा वेळेस अगदी सुन्न असतं. रात्री-बेरात्री झोपणारी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पहाटे पाच वाजता साखर झोपेत असतात पण त्याला मात्र काही अपवाद असतातच. त्याच अपवादांपैकी जन्का आणि स्म्रीति या दोघी.

दोघींचेही अलार्म अगदी सोबतच वाजतात, पाच म्हणजे पाच वाजता. अलार्म वाजताच दोघीही उठतात आणि अंघोळ वगैरे सारं काही आटोपून अभ्यासाला बसतात.

दरवाजाला लागून जन्काचा बेड होता. बेडसमोरच असलेल्या टेबलवर Techmax publications च्या University syllabus नुसार असलेल्या books पासून तर खूप जाड अशा reference books पर्यंत सारं काही होतं. पलंगावर घडी न केलेल्या चादरीवर laptop पडलेला. थोडक्यात ती त्या रूमची मेसी होती.

दरवाजासमोर चौघींसाठी असणाऱ्या मोठ्या कपाटाला लागून स्म्रीतीचा बेड. अगदी व्यवस्थित, नीटनेटका. पलंगाच्या आणि कपाटाच्या मध्ये ठेवलेल्या टेबलवर laptop आणि काही notes, इतकंच काय बाहेर. बाकीची पुस्तकं पलंगाच्या काही अंतरावर असणाऱ्या कप्प्यात ठेवलेली. जन्का त्या कप्प्याचा वापर खाण्याचा सामान ठेवण्यासाठी करत असे.

जन्का खुर्चीवर तर स्म्रीती पलंगावर बसून त्यांचा अभ्यास करत असतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, एकमेकींशी एक शब्दही न बोलता. Object Oriented Modelling and Design (OOMD) या विषयात गुंतलेली जन्का आणि Design and Analysis of Algorithms (DAA) मध्ये गुंतलेली स्म्रीति, अगदी साडेसात वाजेपर्यंत गुंतलेल्याच असतात.

पण साडे सात नंतर बदललेलं असतं ते हॉस्टेलचं वातावरण, ती घाई, त्या घाईत होणारा गोंधळ, त्या गोंधळात होणारी आरडाओरड. मग काय, स्म्रीतिची इअरफोन्स तिच्या कानात आणि जन्काचे लक्ष पुस्तकासोबत इतर दोघींवर, ज्या होत असतात कॉलेजला जाण्यासाठी तयार.

स्म्रीति, जन्का, प्रज्ञा या तीघीही Final year Computer च्या तर अक्षरा Final year Electronics and Telecommunications च्या वर्गांत. चौघींचा रिझल्ट अगदी उच्च दर्जाचा, म्हणजे first class with distinction. जन्का क्लासची 3rd टॉपर, स्म्रीति 5th टॉपर आणि प्रज्ञा 8th टॉपर. अक्षरा EnTC ची 2nd टॉपर.

Girls' hostel च्या रूम नंबर 110 मधील ह्या चौघी roommates चा नेहमीच कसल्या न कसल्या कारणावरून वाद सुरू असे.

टॉपर्सच्या या रूममध्ये वाद व्हायला कारण म्हणजे त्या चौघींना टॉपर्सच्या गणतीत आणणारी त्यांची मार्क्स. जेव्हा मार्क्स वाढतात तेव्हा स्वाभिमान वाढतो आणि दुसऱ्याला कमी लेखण्याची सवय सुद्धा.

मात्र, रूम मध्ये होणारे वाद रूमच्या बाहेर कुणाला कधी कळूही न देणाऱ्या त्या चौघी. म्हणूनच फर्स्ट इयर पासून रूममेट्स असलेल्या फायनल इयर पर्यंत सोबतच होत्या. कदाचित इतरांसोबत राहणं त्यांना जमलंच नसतं.

स्म्रीतिला अभ्यास करताना इतर गोंधळांपेक्षा गाणी ऐकायला जास्त आवडायचं, त्यामुळे इअरफोन्स कानाला लावून आपण आता या जगात नाही असं समोरच्यांना दाखवायला तिला जमून जायचं. जन्काचं असं काही नव्हतं. अभ्यास करत असतांना तिला आजूबाजूला गोंधळ असला तरी चालायचं. अक्षरा आणि प्रज्ञा नेहमी गर्ल्स होस्टेलच्या रीडिंग हॉल चा सहारा घेत असत, जेणेकरून अभ्यास एके अभ्यासच.

अक्षरा आणि प्रज्ञा या दोघींची बेड्स दरवाज्यासमोर खिडकी असणाऱ्या भिंतीला लागून होते. दोघींचे टेबल स्म्रीतीच्या पलंगासमोरील भिंतीला लागून ठेवलेले. सगळी पुस्तकं वगैरे व्यवस्थित रचलेले. फक्त टेबलवर make up चं सामान तेच काय जास्त होतं. एका टेबलच्या वर भिंतीला आरसा लटकलेला जो की त्या दोघींनाही जीव की प्राण होता.

प्रज्ञा आणि जन्का स्वभावाने सारख्याच. रूममध्ये होणारे वाद  त्या दोघींमुळे आणि त्या दोघींमध्येच जास्त व्हायचे. त्यात प्रज्ञाचा boyfriend जन्काला स्वभावाने चांगला असूनही आवडायचा नाही.

जन्का तीघींपेक्षा बोलायला तेज, दिसायला मात्र साधी. गव्हाळ रंग, उंची 5'3" इतकी आणि राहणीमान अगदी बेजबाबदार. त्या दाट पण कोरड्या पडलेल्या केसांना चमकवण्याची गरज होती. कदाचित त्या चेहऱ्यावरील चारही तिळांना, perfect बांधा्यातला शरीराला फक्त एका टचची गरज होती पण तिला नाही आवडायचं नटायला.

प्रज्ञा मात्र दिसायला कातिल होती. 5'4" च्या उंच शरीराला साजेसा तिचा गोल चेहरा तिच्याबद्दल बरंच काही सांगून जायचा. ती काळीभोर डोळे तर कुणालाही घायाळ करून सोडत.ती पाठीवरून खाली गेलेली तिची मुलायम केस तिच्या प्रत्येक पाऊलावर चाल बदलायचे. खऱ्या अर्थाने देखणी!

अक्षरा नेहमी प्रज्ञाच्या boyfriend ला लकी म्हणायची कारण त्याच्यासारख्या भोंदूला त्याच्या आख्ख्या आयुष्यात इतकी हॉट मुलगी कधीच पटली नसती.

'अक्षरे, 30 मिनिटांपासून तू आरशासमोर उभी आहेस आणि पुढची अजून दहा मिनिटे तरी तू त्या आरशासमोरून हलणार नाही असं दिसतंय.' जन्का हसतच अक्षराला म्हणते.

अक्षरा मात्र अगदी हटके होती चौघींमध्ये. तिला नटून थटून रहायला आवडायचं. दिसायला तिघींपेक्षा सुंदर. ते मानेपर्यंत येणारे कुरळे  केस, ते छोटेसे आणि तपकीरी रंगाचे डोळे, ते नकटं नाक, तो नाजूक बांधा. 5' 1" च्या उंचीत खरीखुरी बाहूलीच जणू. तितकीच मनमोकळ्या मनाची. शेवटच्या वर्षी तरी प्रेमात पडावं कुणाच्या यासाठी धडपड करणारी.

'साडेआठ तर झालेत. अजून पंधरा मिनिटे गेलीत आरशासमोर तरी फरक थोडी ना पडणार आहे.' अक्षरा ओठांना हलकीशी लिपस्टिक लावता लावता जन्काला हसतच उत्तर देते.

'एकीने कुत्रा पाळलाय आणि दुसरी कुत्रा शोधण्यासाठी निघतेय.' जन्का स्वतःशीच बोलते आणि पुस्तकात डोकं घालते.

'हो गं, कुत्राच हवाय पण थोड्या स्टॅंडर्ड लेव्हलचा', अक्षरा जन्काचे ते तोंडातलं वाक्य ऐकून असं म्हणते. अक्षराचे हे वाक्य स्म्रीतिच्या आयपॉड मधील एक गाणं संपून दुसरं गाणं सुरू होण्याच्या आधी असणाऱ्या शांततेत निघतं. स्म्रीति आयपॉडला पॉज करून अक्षराच्या भावी बॉयफ्रेंड बद्दल असलेले विचार ऐकू लागते.

'म्हणजे कुणीतरी प्रियांश सारखा. हँडसम, क्लेवर, इतकासाही अटीट्युड नसणारा आणि त्याच्यासोबत कॅन्टीनला बसल्यावर चार मुलींनी रूमवर येऊन म्हटलं पाहिजे कि मी किती लकी आहे ते‌.'

'प्रियांश आणि हँडसम?' जन्का!

'प्रियांश आणि क्लेवर?' स्म्रीति!

'प्रियांश आणि अटीट्युड नाही?' प्रज्ञा!

'हो तर! ए तुम्हाला नाही वाटत का तो त्या दिल मिल गये मधल्या सिद सारखा दिसतो असं? तीच हेअर स्टाईल, तसाच चेहरा आणि ते त्याच्या गालांना पकडून गुगली वुगली वूक्ष असं करावसं वाटतं?'

'काहीही काय बोलतीये! एक नंबर चा उनाड आहे तो.' जन्का.

'तुम्ही तिघी त्याच्यावर इतका राग का दाखवतात नेहमी?'

'कारण तू सांगितलेली एकही चांगली कॉलिटी नाहीये त्याच्यात.' प्रज्ञा.

'हे असं तुम्हा तिघींनाच वाटतं पण कॉलेजच्या इतर मुली मात्र मूर्खच, नाही का?' अक्षरा.

'अर्थात, आहेतच त्या तुझ्यासारख्या मूर्ख.' जन्का.

'काय तर project lab मधल्या computer साठी सुद्धा भांडून आल्यात काल तुम्ही. Poor guy.' अक्षरा.

'कसला poor guy? नको तिथे नाक खुपसतो तो. Shameless.' जन्का.

'तो चुकला असेल असं नाही वाटत मला.' अक्षरा जन्काकडे बघून भुवया उडवत म्हणते.

'मग आम्ही चुकलोय असं म्हणायचंय का तुला?' जन्का खरंतर चीडलीच होती.

'कोण चुकलंय हे तुम्हीच ठरवलंय तर मग मी आणखी काय बोलणार.' अक्षरा.

नेहमीप्रमाणे प्रियांशचा विषय रूममध्ये शांतता पसरवून जातो.

जन्का आणि स्म्रीति दोघींचंही पुस्तकात लक्ष लागत नाही. जन्का आत्ता अभ्यास होणार नाही असा विचार करत रूम मधून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर निघते. प्रज्ञा आणि अक्षरा नेहमीप्रमाणे सोबतच बाहेर पडतात. स्म्रीति मात्र हातात असलेल्या पुस्तकात काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करते. नेहमी ती आणि जन्का सोबतच नऊ वाजता वर्गात पोहोचत पण त्यादिवशी जन्का रागाच्या भरात आधीच निघून जाते.

नऊ वाजता रूम मधून बाहेर पडताना अगदी नेहमीच्या सवयी प्रमाणे मोबाईल फोनला व्हायब्रेटींग मोडवर नव्हे तर सायलेंट मोडवर करत कॉलेजला जाण्यासाठी निघते. माल रोड वरून चालत चालत, कॉलेजच्या पायऱ्या चढून क्लासरूम नंबर 234 ला पोहोचते.

नऊ वाजून पाच मिनिटांनी!



Link: भाग चौथा

Sunday, 13 January 2019

भाग दुसरा



Link: भाग पहिला




भाग दुसरा: आजचा दिवस



'एक महिन्यात आपलं MS पूर्ण होणार ह्यावर माझा विश्वासंच बसत नाहीये.' आकाशचं असं बोलणं स्वाभाविक होतं कारण त्याने जितकी मेहनत घेतली होती तितकाच अमेरिकेत असण्याचा आनंदही त्याने लुटला होता.

आकाश! अगदी नावासारखा. नेहमी उंच ध्येय ठेवून इथपर्यंत गरुडझेप घेत पोहोचलेला.

त्याची उंचीही 6' 2" इतकी, की माझ्यासारख्या 5' 6" उंची असलेल्या मुलीलाही त्याच्याकडे बघताना डोळे वर ताणावेच लागत. University च्या सगळ्या मुलींमध्ये त्याची hotness हा चर्चेचा विषय. भारतीय वा गोऱ्या, सगळींच्या गळ्यातला ताईत.

'सुरूवातीला असह्य होणाऱ्या इथल्या वातावरणाची सवय झालीच आणि इथल्या लोकांचीही.'

दिवस मावळायला लागल्यावर, Uni पासून काही 10 मैलांवर असणाऱ्या समुद्रकिनारी आकाशसोबत आले होते. आम्हा दोघांनाही ही जागा आपलीशी वाटायला लागली होती, अगदी पहिल्यांदा आलो होतो तेव्हापासूनच. किनारी चालताचालता गेल्या 2 वर्षांच्या आठवणी जागू लागल्यात.

आकाश मात्र माझ्या असं बोलण्यानं हसतच म्हटला, 'स्म्री, तू म्हणजे ना अजूनही एक कोडंच आहेस माझ्यासाठी.'

हो. मी आत्ता माझ्यासाठीसुद्धा कोडंच झाली होती. स्वतःहून आपल्याच लोकांपासून दूर पळतीये. का? कारण माझं चुकलंय हे सांगायची हिंमत नाहीये माझ्यात. कदाचित, सगळेच विसरून गेले असणार भुतकाळाला. भुतकाळात घडलेल्या घटनांना. आणि मलासुद्धा!

इथे तरी कोडं बनायचं नव्हतं पण आकाश होता तितकं मला समजायला. त्याला मी काय सांगणार? आणि कशासाठी? त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून, जूनं ते काहीही जवळ भटकू न देण्याचा प्रयत्न केला तो समोर असताना.

'हाहा काहीही. पण काय धमाल केलीस तू मात्र दोन वर्षं, नाही? Uni मधील असो किंवा नंतर तुझ्या office मधील, मला माहिती सुद्धा नसलेल्या सर्व मुलींच्या कलागुणांची माहिती तू मला सांगत रहायचा, rather अजूनही सांगत राहतोस.'

'तूच तर होती ऐकणारी. आत्ता तूच सांग एखादीचं मराठीत होणारं वर्णन इंग्रजीत तितकंसं नाही जमून येत. जसं माल म्हणून वर्णन केलं कुणा मुलीचं तर ते ह्या गोऱ्या लोकांच्या भाषेत होईल luggage. Imagine!'

आम्हा दोघांनाही हसू आलं.

'Thank you though. तुझ्याशिवाय मी इथं टिकलोच नसतो.' मी मात्र टिकले असते.

'काहीही! You are gem. तुझ्याकडे जादू आहे आकाश, तुला माझी गरजच नसती जाणवली. रोज uni च्या एका मुलीसोबत वेळ घालवला असता तरी तुझा इथे वेळ सहज गेला असता. मी नसते तरी कुठलं तरी luggage सोबतीला असलंच असतं तुझ्या.'

पुन्हा एकदा हशा.

आकाशचा मनमोकळा स्वभाव नेहमीच जून्या आठवणींना जागं करून देत असे म्हणून सुरूवातीला मी त्याच्यापासून लांबच रहायची. पण मग इतक्या अनोळखी जगात आकाशच काय तो एकमेव मराठमोळा होता class मध्ये. जुन्या आठवणी नकोशा होत्या पण थांबायचंही नव्हतं आयुष्यात. म्हणूनच आकाशने पुढे केलेल्या मैत्रीच्या हाताला हात देण्याशिवाय पर्याय नव्हता.

वातावरण खूप थंड होतं. पण तरीही त्या समुद्रकिनाऱ्याची ओढ होती मनी. चालता चालता किती अंतर मागे गेलं हे जाणवलंसुद्धा नाही. मग शेवटी थांबून त्या समुद्रकिनारी असणाऱ्या एका बाकावर बसलो आम्ही दोघंही.

'अजून 8 दिवसं! मग uni पासून सुटका एकदाची.' आकाश खरंतर भावूक होतो की काय सरतेशेवटी असं मला नेहमीच वाटत असायचं. कारण तो नेहमीच त्याच्या engineering च्या दिवसांतले काही ना काही किस्से सांगत असायचा. तेही, अगदी भावूक होऊन.

'सुटका? मला वाटलं तू uni आणि uni तल्या हिरवळीला खूप miss करशील.'

'तुझ्याव्यतिरीक्त कुठलीच दुसरी आठवण पुढल्या आयुष्यात सोबत नसणार इथली .'

तो माझ्याकडे बघत म्हटला, 'तुला तर माहितीच आहे की मी इथे एक ध्येय घेऊन आलो होतो आणि ध्येय साध्य होताना दिसतंय तर मग इथली धमाल इथेच सोडायची. आत्ता ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यायचं इतकंच काय ह्या क्षणाला तरी मी म्हणेल.'

'थोडक्यात माझा job गेलाच इथे असताना, तर तू मला तुझ्या कंपनीत काम देशीलच. हो ना?'

'तू सावरलीस तर सुरूवातीपासून ये, तेही थांबू शकशील तितकं ये.'

माझ्यात राहून तोही आत्ता कोडं होत चाललाय की काय? तेही माझ्याचसाठी!

'म्हणजे?'

'म्हणजे. ह्या म्हणजेची ना माझ्याकडे वेगवेगळी उत्तरं आहेत. आज मात्र इतकंच म्हणेल की तुझ्यासाठी माझ्या स्वप्नांतल्या कंपनीमध्ये नेहमीच स्वागत असेल.'

बराच वेळ काहीही न बोलता आम्ही दोघंही त्या समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू लागलो. कितीतरी जास्त बोलत होत्या त्या लाटा. आपल्या मनात येणाऱ्या विचारांना, प्रश्नांना त्या कितीतरी जास्त बोलणाऱ्या लाटाच काय उत्तरं देतात. ऐकत रहावं त्यांना, उत्तरांची अपेक्षाही न ठेवता. खरंतर, त्यांचं बोलणं ऐकण्यासाठीच मी यायचे समुद्रकिनारी.

Image Source: Geulgram


'टिकीट्स business class चे book करायला हवे होते, स्म्री.'

'अरे तुझं परत तेच. Bill gates होणार आहेस तू, अजून झाला नाहीयेस.'

'अगं पण... छे यार!'

'भारतात जातोय आपण, Washington च्या conference ला नाही. तेही पैसे कॉलेजकडून वसूल केले होतेस तू.'

'त्याचं credit पूर्णपणे prof. Sheryl बाईंना जातं.' तो डोळे मिचकावत म्हटला.

'हा हा. धन्य आहेस तू आणि तुझा charm.'

'पण मग भारतात घरी परत जायचे पैसे काय तुझ्या बाबांकडून मागशील का? स्वप्न मोठी बघ पण खर्च जरा वास्तववादी कर रे आकाश.' मी असं म्हणताच आकाश माझ्याकडे नेहमीच्या कोड्यात बघू लागला.

'मी गंमत करत होतो गं फक्त. बाबांसारखं बोलायला लागलीस तू तर लगेच.'

'अरे पण आज तू चौथ्यांदा ऐकवतोय तुझ्या अंगात घुसलेल्या business class च्या भुताबद्दल. मला वाटलं खरंच इच्छा झालीय तुझी.'

'चुकलं माते. आम्हांस माफ करा.'

'ते सोड. काय करणार आहेस दोन महीने घरी जाऊन?' आकाश बोलायचं थांबणार नव्हता. त्या लाटांची बडबड ऐकायची होती, आकाशची नाही. पण ते आत्ता त्याला कसं सांगावं.

'आराम.'

'तो इथेही करतेस तू.'

'काहीही.'

'नाहीतर काय. जेव्हा कुठे फिरायला जाण्याचा विषय काढला की तेव्हा लगेच 'मला आराम करायचाय रे, मी नाही येत.' असं म्हणत तो पूर्ण weekend तू Grey's anatomy बघण्यात घालवायची. कधी कधी असं वाटायचं की Master of Surgery वालं MS करायला तर नाही ना आली होतीस तू. चुकून आम्हा Engineers मधलं competition आणखी वाढवायला आमच्यात यायची की काय?'

'गप रे. आत्ता नाही आवडत फिरायला तर मग काय सांगणार.'

'BITS Pillani ला न जाता सुद्धा MS केलं असतं ना तू तरी चांगलं पॅकेज मिळालं असतं तिकडेच.'

आकाशला कसं सांगणार की, इथे MS करणं ही फक्त माझी पळवाट होती म्हणून. त्याच्यासारखी स्वप्नं वा ध्येयं नव्हती काही.

'परत शांत झालीस बघ.' आकाश माझ्याकडे बघत म्हटला, 'मला असं वाटतं की तुझ्या आई-बाबांना तुझं नाव शांती ठेवायचं होतं पण चुकून स्म्रीती ठेवलं गेलं असणार.'

'श्श! चल जाऊयात uni परत. थंडी वाढत चाललीये.'

'शांतीच चांगलं वाटलं असतं पण काहीही म्हण. Suitable होतं तुला.'

हॉस्टेल येईपर्यंत आकाशची शांती आणि स्म्रीतीतली तुलनात्मक बडबड सुरूच होती.



Link: भाग तिसरा

Sunday, 6 January 2019

भाग पहिला

भाग पहिला: आजचा दिवस



'प्रियांश!'

अनोळखी जागी ओळख लागणारा आवाज ऐकला आणि एलिव्हेटरच्या आत नेणारे पाऊलं जागीच थबकले. उजवीकडे बघतो तर कॉलेजला असताना चार वर्षांत ज्या मुलीला मी मुळीच आवडलो नाही ती मला बघून खुश होत होती. अवतीभवतीची लोकं तिच्या उत्सुकतेतल्या आवाजाला ऐकून आधी तिच्याकडे आणि नंतर माझ्याकडे बघून गोंधळातच एलिव्हेटरच्या आत शिरले.

एलिव्हेटरच्या आत त्या गर्दीत जाणवणारी अस्वस्था आम्हा दोघांनाही बोलू देणार नव्हतीच म्हणून आम्ही एलिव्हेटरच्या आत शिरलो नाही.

'जन्का, कशी आहेस?' 5 वर्षात किती बदल झाले होते तिच्यात. ते मोकळे सोडलेले केस. ती ब्लॅक ट्राऊजर. तो राखाडी आणि आकाशी रंगातील चेक्सचा फॉर्मल शर्ट. कॉलेजचं फक्त शेवटचं वर्ष जर पकडलं तर त्यावर्षी मोजून तीन पंजाबी ड्रेस होते तिच्याकडे. आणि हो, तो FRIENDS या TV showsतल्या pivot असं लिहीलेला टी-शर्ट तर विसरताच येणार नाही आम्हा दोघांनाही.

गव्हाळ रंगाच्या नाजूकशा चेहऱ्यावर तीन तीळ होते. खरंतर चार तीळ होते पण उजव्या डोळ्याच्या पापणीवर असलेला छोटासा तीळ सगळ्यांच्या ध्यानी कधी यायचाच नाही.

सुंदरतेची प्रतिमा वा तसलं काही नव्हतं तिच्याबाबतीत पण तरीही सारं काही अगदी परफेक्टंच होतं.

आज इतक्या वर्षांनी समोर आली आणि जाणवलं की त्या परफेक्शनला कॉर्पोरेट टच अगदी निखळून काढत होता.

कॉलेजला फक्त अभ्यासात गुंतलेल्या मुलींना असं मनमोकळं बघितलं की मग हायसं वाटतं.

'मी आहे तशीच. तू कसा आहेस?' बोलायला सुद्धा तशी नाही राहिली तर. आयटीमध्ये काम करताना होणारे बदल, आणखी काय.

'ह्या क्षणी थोडा घाईत. इंटरव्यूसाठी आलोय. माहिती नव्हतं मला तू इथे काम करतेस म्हणून.'

'आठ महिने झाले असतील जॉईन होऊन.' थोडं थांबून माझ्या डोळ्यांत बघत म्हटली, 'आता मी इथे काम करते म्हणून जॉब साठीची ऑफर भेटली तर नाकारू नकोस.' थोडक्यात आपल्या चुकीची जाणीव होतीच शेवटी तिला.

मी काही उत्तर दिले नाही तिला. तिच्या त्या जुन्या आणि कदाचित अजूनही न भरून आलेल्या जखमांवर वार करावा असं मुळीच वाटलं नाही.

काय बोलावं हे मलातरी त्या क्षणाला सुचत नव्हतं. सुचणारंही कसं! अचानक, आकस्मित, अनपेक्षित भेटींचं हे काहीसं असंच असतं. खूप काही बोलावंसं, विचारावंसं, जाणून घ्यावंसं, ऐकून घ्यावंसं वाटतं पण नाही सुचत काहीच.

एलिव्हेटर वरचे मजले फिरून पुन्हा खाली आलं आणि आम्ही दोघंही आत गेलो. एलिव्हेटरच्या आत काहीच बोललो नाही. इंटरव्यू नेमका तिच्याच फ्लोअरवर होता.

'तुझा इंटरव्यू झाला की कॉल कर.' इंजिनिअरिंगच्या 4 आणि त्यानंतरच्या पाच वर्षांत तिचा नंबर कधीच सेव्ह नव्हता. थोडक्यात, तशी कधी गरजच नाही जाणवली. आज मात्र या छोट्याश्या भेटीतच आम्ही दोघांनीही एकमेकांचे नंबर सेव्ह केले.

'आणि न भेटता जाऊ नकोस, प्लीज!' असं म्हणत गेली ती. खरंतर भेटल्याशिवाय जाणं मलाच जमणार नव्हतं‌.





.


इंटरव्यू संपताच कंपनीच्या पॅ॑ट्री मध्ये आलो. जन्काला फोन लावला पण तिचा फोन वेटिंग वर आला. वाट बघावी लागणारच होती पण ती किती वेळ हे मात्र माहिती नव्हतं. म्हणून एक कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली.

अर्धा तास गेला. त्या वेळात जन्काला तीनदा फोन लावून झाला. दोनदा तिने उचलला नाही आणि तिसऱ्यांदा आधीसारखाच फोन पुन्हा वेटिंग वर आला.

त्या अर्ध्या तासात दोन कोल्ड कॉफी आणि सोबतीला त्या पॅऺट्रीत हलक्या आवाजात सुरू असलेली नव्या आणि जुन्या गाण्यांची प्लेलिस्ट. तीही मराठी! ज्यांना मराठी समजत नसेल ते पॅऺट्रीमध्ये येत तरी असतील का? ह्या प्रश्नाचे उत्तर आजच भेटणं मुश्कील होतं.

पाच वर्षं एकाच कंपनीत काम केलं. त्या पाच वर्षांत एकाच प्रोजेक्ट वर काम करून कंटाळा आला नाही अशातला भाग मुळीच नाही. खरंतर, कंटाळा आणि सवय यांनी एकमेकांना धरून पाच वर्ष एकाच कंपनीत आणि एकाच प्रोजेक्टवर काम करताना माझ्यासकट त्यांचा रडत पडत चाललेला संसार सांभाळला. पण शेवटी कंटाळ्याने अगदी आळस झटकून सवयीला सोडायचं ठरवलं. तीन इंटर्व्ह्यूज दिल्यानंतर शेवटी एका नवीन ठिकाणी कंटाळ्याचा नवा संसार सुरु होणार होता नव्या सवयी सोबत.

कदाचित, 'नवीन जागा नवीन ओळखी' हे समीकरणच नको होतं. म्हणून पाच वर्षं स्वतःला एकाच ठिकाणी, एकाच जागेवर बांधून ठेवलं. काम चांगलं असल्याने मनही रमून जायचं आणि अप्रेजलही मिळत होतं हवं तसं.

२ कंपनिंच्या ऑफर्स होत्या खरंतर आधीच त्यामुळे रीजाईन करून ठेवलं होतं आणि महिन्याभराने रिलीव्ह होणार होतो पाच वर्षं जिथे काम केलं तिथून.

जुन्या कंपनीतल्या पाच वर्षांतल्या आठवणी डोकावण्याआधीच जन्का धावतपळत येताना दिसली. चेहऱ्यावर दडपण होतं. काम, मी किंवा आणखी कुणी!

तिच्या आयुष्यात आत्तातरी कुणी असेल का?

'मी चहा ऑर्डर करतेय. तू आणखी कॉफी घेशील?' मी हो म्हटलो आणि ती चहा व कॉफी घेऊन आली.

'Sorry. Client नावाचा राक्षस छळतोय.' जन्का.

'चालायचंच.'

'असं कसं?'

'आत्ता तुच सांग कसं ते.'

'अर्थात, तुझाही client छळत असणार तुला.'

'त्यात काही वादच नाही? अगं मी तिला म्हटलो, तिला म्हणजे जी client associate आपल्याच वयाची मुलगी आहे तिला, की येतो २ ते ३ तासांत परत. तर ती इंग्रजीतच गायला लागली, ऐसे ना जाओ छोड़के के दिल अभी भरा नहीं. त्यात आम्ही नोटीस पिरीयड सर्व्ह करतोय म्हटल्यावर तर ती टाहो फोडत गात होती. आत्ता बोल कुणाचा client जास्त छळतोय.' ती ऐकून हसली आणि तेही इतकी मनमोकळं हसली की पॅऺट्रीतल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं इतक्या.

'सॉरी, खूप दिवसांनी मनमोकळं हसतीये असं.' तिला जाणवलं हाच काय तिच्यात झालेला पहिला बदल जो मला जाणवला.

'Client सोडून आणखी कुणी छळतंय का?' मी हसतच विचारलं.

'काश्श!'

'अगं इतकंही कामात नको गुंतू की आयुष्यात फक्त client च उरेल.'

ती फक्त गालातल्या गालात हसली.

मग चहाचा एक घोट घेऊन विचारांत गुंतली.

'ह्या शनिवारी संध्याकाळी काय करतोय तू?' जन्काने माझ्याकडे बघत अनपेक्षित प्रश्न विचारला.

'अजून तरी काही plans नाहीत.' अर्थात, कुठलीतरी TV series बघून वेळ घालवणार होतो.

'माझा वाढदिवस आहे त्या दिवशी.'

'वाढदिवसाच्या शुभेच्छा आधीच. Client सोडून आणखी कुणीतरी तुमच्या आयुष्यात यावर्षी तरी यावा हे आपल्या शहरातल्या सगळ्या गणपती बाप्पांकडे साकडे.'

'हा हा. Thank you. Thank you.' ती खुश होऊन म्हटली.

'आज बोलायला फार वेळ नाही पण शनिवारी भेटूयात संध्याकाळी. चालेल का तुला?' तिने विचारलं.

मीही खरंतर काहीतरी ऐकण्यासाठीच थांबलो होतो. जे मला गेली पाच वर्षं झोपू देत नव्हतं असं काही.

'कळवतो तुला तसं. निश्र्चित असं आज नाही सांगत.'

'ओके. पण तू यावं असं मनापासून वाटतंय.'

'फोन करेन तुला तसा.'

नेमका तिचा फोन वाजला.

'बोल... हो... हो... आत्ता काय, थांबू उशिरापर्यंत... हो, येते १० मिनिटांत... बाय...'

फोन ठेवताच म्हटली, 'Client च राहणार वाटतं आयुष्यात.' मिश्किलसं हसत म्हटली ती.

'जरी आज वेळ नसला तरी महिन्याभरानंतर असेल मी ३ वा ४ महिने इथे. भेटतच राहू तेव्हा आपण.'

'म्हणजे? म्हणजे तू join होतोय तर? Thank you so much!' मीसुद्धा इतका excited नव्हतो तितकी ती होत होती माझ्या joining साठी.

'आणि ३ वा ४ महीनेच का?' जन्का.

'Join होताच resign करणार म्हणजे ३ महीन्यांत रीलीव करणार तुझ्या कंपनीतले लोकं.' मी तिच्याकडे बघत डोळे मिचकावत म्हटलो.

'तुझ्यातला humor तसाच आहे, अजूनही.' ती हसतच म्हटली.

'आमच्या काळजाला आमची उपहासात्मक वृत्तीच काय ऑक्सिजन पुरवते. Global warming ला उगाच नाव ठेवतं जग.'

'तू पण ना! आत्ता सांग ३ ४ महीने असं का म्हटलास.'

'Join होतोय एका अटीवर की लगेचच onsite पाठवावं. HR साहीबा म्हटली की ३ ४ महीने तरी लागतीलच process व्हायला.'

'ए काय रे, प्रियांश! इतक्या वर्षांनी भेटतोय एकतर आणि असा लगेचच निघून जाशील. किती तरी बोलायचंय मला.'

मला तिच्यापेक्षा जास्त भीती आता माझीच वाटणार होती, तेही तिच्यासोबत राहून.

आठवणींच्या दरवाजाची चावी सुद्धा तिच्याकडेच होती. गेल्या पाच वर्षानंतर पुन्हा एकदा ती त्या चावीने तो दरवाजा उघडणार होती.

मी माझी त्या तासाभरातील तिसरी cold coffee पिता पिता तिला विचारायचा प्रयत्न करत होतो.

जन्का माझ्याकडे बघत फक्त इतकंच उत्तरली,' पाच वर्षं झालीत रे पण आम्हा तिघींनाही तिचा काहीच थांगपत्ता नाही.'

एवढ्या मोठ्या multinational company चं offer letter हातात असून सुद्धा मन खुश नव्हतं. गेल्या पाच वर्षांत इतकं काही मिळवलं होतं, शिवाय तिच्या!

कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यांतले पाणी नव्याने वहावे...

पॅ॑ट्रीवाल्याच्या music system ला सुद्धा ठाऊक होतंच तर!


Link: भाग दुसरा