सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Tuesday, 23 April 2019

भाग आठवा

Link: भाग सातवा




भाग आठवा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


15 मिनिटांपासून लायब्ररीचा हा सेक्शन ते तो सेक्शन करत करत Database and Algorithms या सेक्शनमध्ये प्रियांश आणि स्म्रीति एकमेकांसमोर येऊन थांबले. क्षण-दोन क्षण दोघंही एकमेकांच्या डोळ्यांत बघत स्तब्ध उभे राहिले.

{तो: कधीतरी तू बदलशील, मग काय करशील?

ती: आठ दिवसांत इतकं बदलवलंय, अजून किती बदलवू बघतोय?

तो: हो म्हणून अजूनही डोळ्यांचीच भाषा जिंकतेय, तोंडाने मात्र सरदारजीच्या टिफीनमधील छोले भटोरेच आत जातायेत.

ती: विषय नको हं बदलवू, मला भूक लागेल नाहीतर.

तो: मग तर चल, पाणीपुरी खायला जाऊयात.

ती: जाऊयात.

तो: पण आधी सांग तरी काय बदललंय?

ती: सांगून कळलं असतं तर ही डोळ्यांची भाषा का?

तो: ...}


'स्म्रीति!' भानावर येत प्रियांश लायब्ररीत इकडं तिकडं नजर फिरवून पुन्हा तिच्याकडे बघत विचारतो, 'कशीयेस?'

'कुणाला शोधतोय?' स्म्रीति जरा गोंधळलेल्या चेहऱ्याने लायब्ररीत असल्याचं भान ठेवत हळू आवाजात त्याला विचारते.

समीर आणि विभोर दोघंही त्याच्यासोबतच आलेले होते. प्रियांश मात्र ते दोघं जवळपास नसल्याची खात्री करत होता.

'अगं पुस्तकं काढायला आलोय. लायब्ररीत कुणाला शोधणार मी!'

लायब्ररी फक्त लायब्ररीच होती. पुस्तकं शोधायचे, काढायचे, I-card दाखवायचं, नोंद करायची आणि निघायचं. Reading hall वरच्या दोन मजल्यांवर होता, तोही फक्त मुलांसाठी. मुलींचा reading hall मात्र girls' hostel मध्येच होता.

लायब्ररीत तसा एक टेबल होता, अवतीभवती 6 खुर्च्या पण तिथे फक्त magazines वगैरे वाचयला येणारे बसलेले दिसायचेत. म्हणून हळू बोलण्यात काय अर्थ होता हे प्रियांशला कधीच उमगलं नाही.

'तू खरंच reference books मधून अभ्यास करतो?' ती‌ गंभीर होत विचारते. गंभीरतेत सुद्धा ती त्याला चिडवत होती, हे त्याला कळत होतं.

'फक्त रट्टा मारणारेच reference books वापरतात का?' तोसुद्धा तितक्याच गंभीरतेने तिला विचारतो.

'टॉपर्स म्हणायचंय का तुला!' ती त्याला आठवण करून देत होती, ती टॉपर्सपैकी एक असल्याची.

'थॉमस कॉरमनच्या पुस्तकातला शब्द न् शब्द स्वतःच्या अभ्यासात वापरणारे माझ्यासाठी रट्टा मारणारेच.' त्या दोघांसमोर उभं राहिलं आठ दिवसांपुर्वी  घडलेलं ते DAA चं लेक्चर. तो एक तास नेहमी आठवणींत रहावा असाच कारण तेव्हापासून सगळीच समीकरणं बदलत होती.

'असो.' तो तीच्यासमोर एक पुस्तक धरत म्हटला,' सरळ, सोप्या भाषेत algorithms समजण्यासाठी हे वाच.'

'The Algorithm Design Model by Steina?' स्म्रीतिने पुस्तक तिच्या हातात घेत विचारलं. पुस्तकाची पानं चाळत प्रियांशकडे बघत म्हणते, 'पण University ने refer केलेल्या पुस्तकांपैकी हे नाहीये.'

'15 दिवस वाचून बघ. नाहीच चांगलं वाटलं तर कॉरमन लायब्ररीत सहज भेटतंच.'

'थोडक्यात 15 दिवस वाया जाणार तर.' तिला खात्री नसली तरी त्याने लेक्चरवेळी जितक्या सहजतेने algorithm समजावलं होतं, तेव्हापासून तिला तिच्या अभ्यासात त्याची मेथड वापरून बघायची होती.

'लायब्ररीत मोजून 2 कॉपीज आहेत या पुस्तकाच्या. पैकी एक दुसऱ्या वर्षापासून माझ्याकडेच आहे असं समज.' तो थोडं थांबत, तिच्या डोळ्यांत त्याच्याबद्दल दिसू लागलेल्या विश्वासाला बघत म्हटला, 'एकही दिवस वाया जाणार नाही हा माझा शब्द.'

'तुझ्यावर विश्र्वास ठेवलाय म्हणूनच तुझ्यामुळे आणि तुझ्यासाठी जन्कासोबत भांडलीये.' त्या दोघांच्या नजरा अजूनही एकमेकांमध्ये गुंतलेल्या. 'तिघी रूममेट्स सोडल्या तर मी फार एकटी आहे.'

घड्याळ्याच्या सेकंड काट्याप्रमाणे दिवस संपत होता आणि जाणवतसुद्धा नव्हतं. कधीकधी तर असं वाटायचं की engineering ला जणू कालंच admission घेतलं होतं, 3 वर्षं पूर्ण होऊनसुद्धा. शेवटचं वर्ष तर त्याहूनही वेगाने संपू बघत होतं. प्रत्येक दिवस एका क्षणात मावळत होता.

गेली आठ दिवसंसुद्धा तशीच मावळली होती. खरंतर, दोघांच्याही मनाला न पटणाऱ्या घटना आठ दिवसांत घडल्या होत्या.

Project lab मध्ये महिन्याभरासाठी मज्जाव केल्यानंतर प्रियांश त्या रात्री झोपू शकला नव्हता. Project वर परिणाम होईल की नाही यापेक्षा जास्त भीति पुन्हा HOD सरांसमोर कुठल्या तोंडाने सामोरं जावं याची वाटत होती.

तिकडे girls' hostel मध्ये स्म्रीतिने त्या रात्री जन्काला समजावण्याचा प्रयत्न केला. तिला वाटत होतं की शेवटचं वर्ष चौघींच्या project group मुळे प्रियांश आणि त्याच्या project group ला नुकसानीचं ठरू शकणार होतं.

'आपण HOD सरांना सांगू ना त्यांचं suspension मागं घ्यायला.' स्म्रीति असं म्हणताच जन्का हसायला लागली.

'शेवटी इतर मुलींप्रमाणे तू सुद्धा प्रियांशवेडी झालीच तर!'

स्म्रीति जन्काचं एवढं वाक्य ऐकून पुढे एक शब्दही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. जन्कावर राग आला होता पण तरीसुद्धा ती शांत राहिली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेच्या ब्रेकमध्ये स्म्रीति एकटीच HOD सरांच्या cabin मध्ये गेली.

आत येताच उजव्या बाजूच्या भिंतीवर लावलेल्या 2 boards वर तिची नजर गेली. एका बोर्डवर department च्या इतिहासातील शेवटच्या वर्षी पहिलं येणाऱ्यांची नावे लिहिलेले होते आणि दुसऱ्या वर university मध्ये पहिल्या दहांत कुणी आलं असल्यास त्यांचं नाव लिहिलेलं होतं.

त्या toppers च्या boards वर स्वतःचं नाव बघण्याची तिची इच्छा फक्त इच्छाच नव्हती तर ते तिचं स्वप्न होतं. सगळी धडपड त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठीच सुरू होती नाही म्हटलं तरी.

'स्म्रीति! Project चा topic कधीपर्यंत ठरणार आहे तुमचा?' सरांनी तिला आत आलेलं बघत स्वतःच बोलायला सुरूवात केली.

'काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे सर म्हणून अजून तरी काही ठरत नाहीये.'

सरांनी टेबलवर पडलेल्या एका फाईलमधून एक 4-5 पानांचा report तिच्या हातात ठेवत म्हटले,
'यावर research करा आणि एका आठवड्यात यावर काय करता येईल ते येऊन सांगा.'

पुढची 5 मिनिटे सरांनी त्यांच्या group कडून नेमकं काय अपेक्षित आहे हे सांगितलं.

'Thank you so much Sir. आम्ही चौघी यावर आजच काम सुरू करतो.'

'Good.'

'सर...' ती थोडं घाबरत, अडखळत नेमकं ती कशासाठी त्यांना भेटायला आली होती हे सांगू इच्छित होती.

'काय झालंय, स्म्रीति?' तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बघत सरांनी विचारलं.

'सर, प्रियांश आणि त्याच्या group चं  project lab मधील suspension मागं घ्यावं असं मला... म्हणजे... म्हणजे माझ्या project group ला वाटतंय.' स्म्रीति.

'तुझ्या project group ला वाटतंय तर मग इतर तिघी कुठं आहेत?' सर.

'सर, आम्हीसुद्धा चुकलोय. त्यांचं नुकसान व्हावं असं मनापासून वाटत नाही.' स्म्रीति असं म्हणताना जन्काचा विचार न करता म्हटली.

'कुणाचं नुकसान होणार नाही इतकी काळजी मी घेतो. पण जर मी त्यांना punish केलं नसतं तर सगळ्यांनी हेच म्हटलं असतं की प्रियांश माझा आवडता student असल्यामुळे मी काहीच केलं नाही.' सरांनी तिला आश्वस्त केलं.

'तरी...' स्म्रीति आणखी काही बोलणार त्याआधीच सरांनी तिला थांबवलं.

'तुम्ही तुमच्या project वर लक्ष द्या.'

स्म्रीति काहीच न बोलता समोर उभी राहिली.

'अजून काही?' त्यांनी असं विचारताच तिने नकारार्थी मान हलवली.

सरांची परवानगी घेत स्म्रीति बाहेर आली. तिला सरांसोबत बोलून जितकं मोकळं वाटत होतं तितकंच tension त्यांनी दिलेल्या project topic बद्दल जन्कासोबत बोलण्यासाठी येत होतं.

HOD सरानी प्रियांशच्या project group ला presentation द्यायची परवानगी दिली पण project lab मधील suspension तसंच ठेवलं.

मात्र, स्म्रीतिमुळेच प्रियांश presentation देऊ शकणार होता हे कळल्यापासून जन्का तिला सगळ्याच गोष्टींसाठी blame करत होती‌.

'मी तर म्हणते, Global warming ला सुद्धा स्म्रीतिलाच जबाबदार ठरवायला हवं.' अक्षरा मुद्दाम रूममधील वातावरण थंड व्हावं म्हणून असले जोक्स ऐकवत रहायची.

'काळजी नको करू. तू मुळीच एकटी नाहीयेस.' त्याच्या डोळ्यांत गुंतलेल्या स्म्रीतिला प्रियांशने इतकं बोलून भानावर आणलं. त्याचं असं बोलणं ऐकून ती मनातल्या मनात खुश होती.

'मी ऐकलं की तुमचं presentation खूप छान झालं म्हणून?' ती विषय बदलावा याअर्थी त्याला विचारते.

'हो. सगळ्याच professors ना topic आवडलाय.'

'That's great!' स्म्रीति इतकं म्हणत त्याचं अभिनंदन करते.

'प्रियांश, जायचं का?' विभोर लांबूनच प्रियांशला विचारतो. समीर आणि विभोर दोघंही पुस्तकं renew करून त्याची वाट बघत थांबले होते.

'कॉफी?' प्रियांश स्म्रीतिकडे बघत विचारतो.

'तुझ्यासोबत?'

'म्हणजे?'

'म्हणजे, मुळीच नाही.' ती हसतच त्याला उत्तर देते.

'अह्हा!'

'काय?'

'हसत जा गं नेहमी. त्या गालातल्या खळ्या आणखी सुंदर बनवतात तुला.' स्म्रीति मात्र प्रियांशचं असं बोलणं ऐकून अचंबित झाली. तिला कळेना तिने त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी.

'काहीही.' स्वतःला प्रियांशमय झाल्याचं मुळीच जाणवू न देता ती म्हटली, 'Flirt करू नको माझ्यासोबत, मी कॉलेजच्या इतर मुलींसारखी नाहीये.'

'कठीण झालंय आम्हा मुलांचं बघ. खरंखुरं कौतुक करावं तर म्हणे आम्ही flirt करतो.' प्रियांश वर बघत म्हटला, 'कुठे जावं आत्ता तुच सांग रे, देवा.'

ती पुन्हा हसली.

'घायाळसुद्धा करतात बघ.' तो डोळे मिचकावत तिला म्हटला.

'गप रे! जा आत्ता तू.' स्म्रीति त्याला जायला सांगते.

'हसत रहा.' प्रियांश जाताना इतकंच म्हणतो.

तिला त्याक्षणी आतून कधी नव्हे खूप असं फुलल्यासारखं वाटत होतं. ह्रदयात धडधड वाढली होती. नाही म्हणता म्हणता प्रियांश तिला खरंच आवडायला लागला होता. एका आठवड्यात तिने कितीतरी वेळा त्याच्याकडे चोरून बघितलं होतं, लेक्चरवेळी वा प्रॅक्टिकलवेळी. खरंच जादू होती त्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या दिसण्यात.

'Byeee!'

इतर दोघांसोबत लायब्ररीतून नाहीसा होईपर्यंत त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे ती बघत होती, जगाचं भान विसरून!

Image Source: Geulgram