सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Thursday, 14 February 2019

भाग सहावा

Link: भाग पाचवा




भाग सहावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


Image Source: Guelgram



प्रियांश, विभोर आणि समीर तीघंही सकाळी 11 वाजेच्या recess च्या वेळात नेहमीच्या सवयीप्रमाणे कॉलेज गेटवर भेटतात.

कॉलेज म्हटलं की ते फक्त हॉस्टेल्स, क्लासरूम्स वा लॅब्सपर्यंत मर्यादित नसतं कुणासाठीच. आणखीही काही जागा असतात ज्या प्रत्येकाला आपल्या हक्काच्या वाटतात. कॉलेजची कॅन्टीन वा कॉफी शॉप. अवतीभवती असणाऱ्या छोट्या मोठ्या हॉटेल्स. Football ground. Cricket ground. जिमखाना. TV hall. Basketball court. Reading hall. Library. Movie theatres. सिगारेट ओढणाऱ्यांसाठी असणाऱ्या पानटपऱ्यासुद्धा.

तसंच इतरांप्रमाणे काहीसं या तिघांचंही होतं. अकरा वाजले की कॉलेजच्या बाहेर रस्ता ओलांडून कॉलेज गेट समोर असणाऱ्या हॉटेलमध्ये नाश्ता करायचा हे ठरलेलं.

हॉटेलमध्ये त्यावेळी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेले मुलंच जास्त दिसत होते. काहीशा प्रमाणात डिप्लोमा व फार्मसीचे युनिफॉर्म्ससुद्धा चमकत होतेच.

'छोटू, 3 मिसळ पाव.'

हॉटेलमध्ये काम करणारा छोटू हे तिघं पहिल्या वर्षात जेव्हा आले तेव्हा खरंच छोटू होता. पण तीन वर्षांत मोठा होऊनही तो त्यांच्यासाठी छोटूच राहिला.

छोटू त्याच्या रोजच्या सवयीप्रमाणे मिसळ बनवणाऱ्याला '3 मिसळ और लगाय दो.' असं सांगतो.

'ओर एक टेबल.' विभोर बसायला जागा बघत असतो.

'अरे क्या भैय्या, टेबल को क्या चाय के साथ खाओगे क्या?' छोटू इतरांच्या ऑर्डर घेता घेता विभोर ला चिडवतो.

'खाली टेबल का बंदोबस्त कर तू. उसपे घर बांधनेका या चायमें बुडाके खानेका वो मेरे पे छोड.' विभोरची हिंदी तितकीच मराठमोळी होती जितकी त्याची मराठी.

'बहुत बडा बिल्डर बनोगे भैय्या आप तो.' घर बांधण्याचं उदाहरण देणारा Civil चाच हे छोटूलाही कळायचं.

'तो टेबल खाली हो गया. अब जाके मिसळ लेके आ, फोकटका मिलिमीटर मत बन.' विभोर असं म्हणत छोटूला कटवतो. तिघं idiots त्या गर्दीत रिकामा झालेल्या टेबलवर आपला हक्क दाखवत बसतात.

मघापासून शांततेत उभं राहून ऐकत असलेले प्रियांश आणि समीर दोघंही एकमताने विभोरला सुचवतात की त्याने बिल्डर बनण्यासाठी महाराष्ट्राबाहेर रहावे जेणेकरून तो हिंदीला हिंदीचा दर्जा तरी देऊ शकेल.

विभोर सुद्धा त्यांच्या हसण्यात सामील होत म्हणतो,
'गाढवांनो, आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचंय, मराठी माणसाला पुढे न्यायचंय आणि तुम्ही कुठे युपी बिहारला बंगले बांधायला पाठवत आहात.'

'धन्य तुम्ही मुख्यमंत्री साहेब!' प्रियांश विभोरसमोर हात जोडतो.

मुख्यमंत्री झाल्यानंतर विभोर महाराष्ट्रात काय काय बदल करणार ही त्याची नेहमीची बडबड सुरु होण्याआधीच समीर प्रियांशकडे बघत विचारतो,
'काल काय झालं?'

प्रियांशकडे काल काय झालं या साध्याशा प्रश्नासाठी वेगवेगळी उत्तरं होती. रात्री उशिरापर्यंत त्याच्या project partners असलेल्या तिघांसोबत project विषयी चाललेली चर्चा. कॉलेजमध्ये सकाळी Head of Department (HOD) सोबत computer department च्या ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये होणाऱ्या events बद्दल झालेली नाममात्र चर्चा. किंवा मग project lab मधील जन्का आणि तिच्या project group सोबत सुरू झालेला विनाकारणाचा वाद.

अर्थात, दोघांना नेमकं काय कळलं असणार हे त्याच्या लगेचच लक्षात आलं.

त्यात सकाळच्या lecture वेळी स्म्रीतिसोबत बसल्याचं सांगितल्यावर त्यांच्या नुसत्या चेहऱ्यांवरचे भावसुद्धा त्याला गिळून खाणार होते.

'काय झालं?' प्रियांशने तरीही अनभिज्ञता आणत विचारलं.

'प्रोजेक्ट लॅबमध्ये आखाड्यात उतरलेला म्हणे तू आणि तुझा प्रोजेक्ट गृप!' विभोर.

'अरे व्वा! म्हणजे मी सांगण्याआधीच प्रेक्षकवर्ग भेटला म्हणायचं तर.' न चुकता दिवस कसा गेला यावर रात्री रोज तास घालवणाऱ्या तिघांना कधीकधी काही मिनिटंसुद्धा नाही भेटायचे बोलायला.

'अर्थात, रात्री उशिराने रूममध्ये आल्यावर तुझ्याकडून दिवसभराच्या कॉमेंट्रीची अपेक्षा कधी ठेवणार आम्ही!' विभोर.

छोटू तिघांसाठी मिसळ घेऊन आला आणि गेला.

'नेमकं काय झालंय?' समीर.

प्रियांश पावाचे तूकडे करताकरता विचारांत गुंग होऊन जातो. समीर आणि विभोरला जाणवतं की विषय गंभीर आहे. शेवटी प्रोजेक्टला मिळणाऱ्या मार्क्सवरच तर त्यांचं distinction निर्भर होतं.

'तुम्हा दोघांना आठवतंय का जन्काबद्दल मी कधी काही चांगलं वा वाईट म्हटल्याचं?'

दोघंही नकारार्थी मान हलवतात.

'म्हणजे दुसऱ्या वर्षापासून तर कालपर्यंत फक्त आणि फक्त तिच्याबद्दल आपण काहीच बोललो नसणार. हो ना?' प्रियांश त्या दोघांपैकी कुणाला काही आठवणींत आहे का हे जाणून घेत होता.

'नाही.' विभोर.

'समीर, first year ती आपल्याच वर्गात होती. तेव्हा तिच्या आठवणींत रहावं असं काही माझ्याकडून घडलं होतं का?' प्रियांश.

समीर पुन्हा नकारार्थी मान हलवतो.

'काही घडलं असतं तर माझ्यापेक्षा जास्त तुझ्या लक्षात राहीलं असतं आणि नंतर कधीतरी तिचा उल्लेख झालाही असता.' समीर.

'तेच तर!' प्रियांश अगदी निराश होऊन बोलत होता. मिसळ खाण्यावरून सुद्धा त्याचं लक्ष उडत होतं .

'ती काल झालेल्या भांडणाला पूर्णतः मला कारणीभूत ठरवत होती. म्हणाली की, प्रत्येक चुकीची गोष्ट माझ्यामुळेच घडते. तिचं काय वाईट केलंय मलाच कळेनासं झालंय.'

'पण भांडलात का?' समीरला जाणून घ्यायची उत्सुकता होती.

'माझा project group आणि जन्काचा project group एकाच computer वर आपला हक्क दाखवत आहेत.' प्रियांश.

'Engineering च्या शेवटच्या वर्षात पोहोचून सुद्धा Junior KG तल्या लहानग्या मुलांसारखं माझं खेळणं, माझं खेळणं म्हणणारे फक्त तुम्हीच.' Practicals च्या वेळी मोकळ्या मैदानात किलोमीटरचं अंतर मीटरमध्ये धरून मोजमाप करणाऱ्या civil वाल्यांना असं वाटणं स्वाभाविकच.

'गंमत म्हणजे 6.30 वाजेपर्यंत आम्ही आठही बंद असलेल्या computer ला सुरू करण्याच्या अपेक्षेने त्यासमोर गर्दी करून बसलेलो.' प्रियांश मिश्किलसा हसला.

'तू तरी समझदारी दाखवायची होती.' समीर.

'तुला काय वाटतं शेवटच्या वर्षात येऊन मला का कळलं असेल जन्काचं माझ्यावर असणारं द्वेशरूपी प्रेम?' प्रियांश मिसळ सोडून नुसताच पाव खाऊ लागला. त्याच्याकडे बघत विभोर छोटूला आवाज देत तीन पाव मागवतो.

'तुमचं प्रोजेक्टचं काम तर मागचं सेमिस्टर संपल्यासंपल्या सुरू झालेलं ना?' प्रियांश आणि त्याचा project group परीक्षा झाल्यानंतर चार दिवस थांबलेले.

'हो. त्यामुळेच तर माझा project lead मानस नाही म्हणतोय computer सोडायला.' प्रियांश.

'आणि मानसला माघार घ्यायला सांगणं म्हणजे त्याच्या गिटारच्या strings मागण्यासारखंच!' विभोर.

मानस एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व. Computer department चा 4th topper. Computer programming मध्ये त्याचा हात पकडणारे साऱ्या कॉलेजमध्ये अगदी दोघं तिघंच. संगीत वेडा असलेल्या त्याच्या आवाजात जादु होती आणि तितकीच चांगली गिटारही तो वाजवत असे. कानाला हेडफोन्स लावून हिंडणाऱ्या जातीतला तो एक नमुना.

शेवटचं वर्ष अभ्यासापेक्षा मानस गाण्यात जास्त घालवणार हे प्रियांश जाणून होता. त्यामुळेच प्रियांशला वाद वाढवायचा नव्हता कारण जबाबदारी त्याच्यावर जास्त होती इतरांपेक्षा.

'सगळे डोक्यावरचे आपल्यालाच येऊन का भेटतात?' प्रियांश इतकं बोलून दोन क्षणं विचार करत म्हणतो,
'आमच्या HOD सरांऐवजी दुसरा कुठलाही professor जर project guide म्हणून असता तर मीही माघार घेतली नसती.'

HOD सरांनीच project चा topic सुचवलेला त्या चौघांना सेमिस्टर सरतेवेळी.

प्रियांश HOD सरांचा आवडता! त्यात त्याने लिहीलेल्या कवितांवर तर त्यांचं विलक्षण प्रेम.

'पण याक्षणी मानस किंवा जन्का या दोघंही हेकेखोरांना माघार घ्यायला सांगणं अशक्यंच वाटतंय माझ्यासाठी.' प्रियांशच्या चेहऱ्यावर एक वेगळीच निराशा दिसत होती, जी फार कमीवेळा बघायला मिळायची.

'जुगाडी डोकं आहे आपलं, होईल शक्य!' समीरच्या डोक्यात आलेली कल्पना प्रियांशला कळली.

'अरे प्रियांश!' शेजारच्या टेबलवर नुकताच येऊन बसलेल्या मानसने हाक मारली.

'फक्त पापी लोकंच शंभरपेक्षा जास्त वर्षं जगतात.' नुकतंच आठवण काढलेल्या मानसला बघून विभोर असं प्रियांश आणि समीरला ऐकू जाईल इतक्या आवाजात हसतच म्हणतो.

'काय काय अभ्यास केला मग?' मानस जोरजोरात हसत प्रियांशला चिडवायच्या हेतूने विचारतो.

समीर आणि विभोर दोघांच्या गोंधळलेल्या चेहऱ्यांकडे बघत मानस म्हणतो, 'अरे, प्रियांश आज स्म्रीतिजवळ बसला होता DAA च्या lecture ला.'

'स्म्रीति हां!' समीर डोळे मिचकावतो प्रियांशकडे बघत.

'Project विषयी काही बोलला का तिच्यासोबत?' मानस.

'नाही.' प्रियांश.

'मग काय कविता ऐकवत बसला होता का तू लिहीलेल्या! तिच्या त्या project partner झूनका भाकरीचं काहीतरी करावं लागेल ना मित्रा.' झूनका भाकरी हे मानसने जन्काच्या तिखट स्वभावाला शोभेल असं तिचं ठेवलेलं नाव.

'माघार घेऊयात. बसू देऊ त्या चौघींना तिथे.' प्रियांश असं म्हणत मानसला जमणार नाही असं काहीतरी करायला सांगतो.

'वेडं लागलंय का? सगळे setup परत install करण्यात वेळ नाही घालवायचाय आत्ता.' मानस माघार घेणं मात्र अशक्यच.

'मग एक idea आहे, थोडी risky. संध्याकाळी भेटून बोलूयात चौघं.' प्रियांश कुणाला न दुखवता काय करता येईल याचा विचार करूनच risk घेणार होता.

'चालेल.' मानस इतकं म्हणत कानावर हेडफोन्स चढवत त्याच्या मिसळपाववर ताव मारायला सुरुवात करतो.

'स्म्रीति नावाचा जूगाड नाही म्हणालो मी.' समीर आणि विभोर दोघंही हसू लागतात.

'शेवटचं वर्ष गाजवणार तू. लिहून घे, आत्ताच.' विभोर.

तसंही स्म्रीति आणि प्रियांश दोघंही एकमेकांना शोभून दिसतील हे त्या दोघांनी आणि त्यांच्या दोघींनी प्रियांशला तिसऱ्या वर्षात असतानाच सुचवलेलं. प्रियांश मात्र मुलींपासून दूरचं राहू इच्छित होता तेव्हा.

'गप मिसळ खा.' प्रियांश काही बोलणार नव्हता.

त्याच्या मनात काय चालू होतं हे त्या दोघांपासून तो लपवतोय, हे त्यांनाही जाणवत होतं.

समीर मात्र माघार घेणार नव्हता. त्याला पूर्ण विश्वास होता की प्रियांशला project चा वाद मिटवण्यासाठी स्म्रीतिच्या मदतीची गरजच नव्हती पडणार.

'कविता दे वाचायला आज लिहिलेली.' समीर आणि प्रियांशचं ठरलेलं असायचं lecture ला लिहीलेल्या एकमेकांच्या कविता वाचून का आणि कुणासाठी यावर अर्थ लावत बसण्याचं.

'आज नाही सुचलं काही लिहायला.' प्रियांशने काहीतरी लिहीलं होतं पण ते लिहीलेले शब्द स्म्रीतिसाठीच होते. आपण ज्यांच्यासाठी लिहीतो त्यांनाच आपल्या शब्दांची बोली लावण्याचा हक्क असतो, हे त्याला आयुष्यात पहिल्यांदाच पटत होतं. पण त्या बेंचवरच सोडून आलेल्या कागदावर लिहीलेल्या आठ ओळी तिने वाचल्या असतील का?

'अर्थात, कविताच शेजारी येऊन बसली म्हटल्यावर शब्द काय फुटायचे तुझ्या मनाला.' विभोर असं म्हणताच प्रियांशला पटलं की खरंच हवे तसे शब्द जुळले नव्हते प्रयत्न करूनही.

'तू लिहीलेलं ऐकव.' प्रियांश स्म्रीतिचा विषय बदलावा म्हणून समीरने काय लिहीलं हे ऐकण्यासाठी उत्सुकता दाखवतो.

'दोन कविता लिहील्यात आज पण आत्ता इथं बसल्याबसल्या ज्या चार ओळी सुचल्यात त्या ऐकवतो.' समीर इतकं बोलून सुरू झाला त्याच्या शैलीत कविता ऐकवायला.

'सुरूवातीला हे असंच होतं
सुचत नाही शब्दं, हरवून जातं भान
वेड्या मनाला काय द्यावा दोष
असंच असतं हे प्रेम नावाचं रान...'

'शब्द न शब्दावर लिहीलंय प्रियांश रावांचं नाव. वाह वाह! मानलं.' दोघंही एकमेकांना टाळी देत हसू लागतात.

'काहीही!' प्रियांश मात्र बोलण्याचं टाळतो. त्याच्या बोलक्या स्वभावाला शांत बघूनच त्या दोघांना समजायचं ते समजलं होतं‌‌.

'आणि please, कविता ऐकवताना ते विचित्र पद्धतीने हात हलवणं बंद कर.' प्रियांश परत विषय बदलतो.

'भाई, गालिब रावांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कविता ऐकवतो मी.' समीर.

'सांगतो असंय जसं त्यांच्या शायरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आलाय. अरे YouTube वर बघून ज्यांना तू गालिब समजतोय ते खरंतर नसरूद्दीन शाह आहेत, विसरू नको.' विभोर असं म्हणताच तिघंही मनसोक्त हसतात.

मिसळ खाऊन एकमेकांचा निरोप घेत पुन्हा त्यांच्या त्यांच्या departments च्या वाटेला ते चालू लागतात.

Link: भाग सातवा

No comments:

Post a Comment