सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Saturday, 3 August 2019

भाग अकरावा

भाग अकरावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


Project lab मधील suspension अजूनही असल्याने प्रियांश लायब्ररीत वेगवेगळे reference books हाताळण्यात वेळ घालवत होता. त्या अगणित पुस्तकांमध्ये ज्या पुस्तकात त्याला काही महत्त्वाचं वाचायला भेटत असे तो ते वाचे.

समीर त्यावेळी कॅन्टीनमध्ये त्याच्या girlfriend सोबत बसलेला. 6.45 वाजता प्रियांश आणि समीर गावात जाणार होते बसस्थानकावर, समीरच्या घरून बसने येणारं पार्सल घेण्यासाठी. पैसे आणि खाऊ नावाचं पार्सल!

मात्र, पुस्तकांमध्ये 2 तास सहज निघून गेलेत हे त्याला कळलं जेव्हा त्याने जन्काला लायब्ररीत येताना बघितलं. वेळेची जाणीव करून द्यायला जन्काच समोर यावी याहून वेगळं ते काय!

स्म्रीति हॉस्टेलला परतली असणार हे त्याला ठाऊक होतं. पण प्रज्ञा मात्र जन्कासोबत दिसली नाही. जन्का चांगल्या  मुडमध्ये नाहीये हेच काय त्याला जाणवलं. तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही असं तो ठरवतो आणि हातात असणाऱ्या पुस्तकात पुन्हा लक्ष घालतो.

प्रियांश पुस्तक वाचत उभा असलेल्या सेक्शनमध्ये ती येताक्षणी त्यांचे डोळे मिळतात. जन्काच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यांतून जणू त्याच्याविषयी शिव्यांचा साठा दिसत होता. त्याचा गोंधळ पार ढगात होता खरंतर.

निघावं लायब्ररीतून बाहेर हा विचार येताच तो त्याच्या हातातलं पुस्तक असलेल्या जागेवर ठेवतो.

त्या सेक्शनमधून बाहेर पडताना बघतो तर जन्का सर्वात वरच्या कप्प्यात Artificial Intelligence (AI) चं कुठलंतरी पुस्तक ठेवत होती. पाय उचकवूनही तिचा हात काही नीट पुरेना.

तिला मदत म्हणून मग तो ते पुस्तक त्याच्या हाताने मागे सरकवतो.

तितक्यात, त्याचा फोन vibrate व्हायला लागतो. समीर वाट बघत असेल या विचारात तिच्याकडे न बघता तो लायब्ररीतून बाहेर निघतो.
.

घड्याळात पहाटेचे 5 वाजून 20 मिनिटं झालेले. अलार्म वाजतो. अलार्मच्या आवाजाने त्याचे डोळे उघडतात. Snooze चं बटण दाबून त्याला पुन्हा झोपावंसं वाटतं पण मग डोळे घट्ट मिटत काहीसा विचार करत आळस झटकून तो उठतो.

इतर दोघं त्याच्या बाजूला झोपलेले. तो त्याच्या पलंगावरून उतरत कम्प्यूटरसमोर असणाऱ्या खुर्चीवर जाऊन बसतो.

झोपलेल्या त्या दोघांच्या चेहऱ्यांकडे बघतो. कॉलेज डोक्यावर घेणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर निरागसता दिसते ती फक्त त्यांच्या झोपेतच. कदाचित, म्हणूनच तो जास्त झोपायचा.

सकाळी लवकर उठणं त्याच्यासाठी फार जिकीरीचं व्हायचं. त्याच्याहून अधिक जिकीरीचं व्हायचं त्याला उठवणाऱ्या समीरसाठी. दुसऱ्या वर्षापासून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रियांश त्याला सांगत असे सकाळी लवकर उठव म्हणून पण शेवटच्या वर्षात येईपर्यंत ते शक्य झालं नाही.

तिसऱ्या वर्षातल्या थंडीच्या दिवसांत आणि तेही परीक्षा तोंडावर असताना एकदा तर समीरने थंड पाण्याने भरलेला मग्गा ओतलेला प्रियांशच्या चेहऱ्यावर. खूप सारी चिडचिड करून झाल्यानंतर ओल्या झालेल्या चादरीला अंगावर ओढत तो तरीही परत झोपला होता.

प्रियांशच्या engineering च्या आयुष्यातील ती पहिलीच पहाट होती जेव्हा तो झोपून उठला होता. म्हणजे, आजपर्यंत मोजता येणार नाहीत इतक्या रात्रं तो जागला असेल. पहाटेची वेळ त्याच्यासाठी नवीन नव्हतीच.

खुर्चीवर बसल्याबसल्या त्याचे डोळे जड होत होते. झोपावंसं त्याला फार वाटत होतं. बंद होणारे त्याचे डोळे त्याला निद्रावस्थेत नेत होते.


'काय जेवलास?' रात्री 9.30 वाजता स्म्रीतिचा फोन येतो.

'आपल्या दोघांचाही डब्बेवाला सरदारजी आहे. काय वेगळं खाल्लं असणार?' त्याला कसं कळलं असेल हा विचार तिच्या डोक्यात आलाच असेल तेवढ्यात तो पुन्हा बोलू लागला, 'फक्त माझ्या डब्ब्यात 5 पोळ्या असतात आणि तुझ्या डब्ब्यात 3.'

'कळलं! यानंतर नाही विचारणार काय जेवलास ते. खुश आत्ता?'

त्याला वाटत होतं ती विचारेल की त्याला कसं कळलं असेल.  मात्र त्याला लगेच जाणवतं ती इतर मुलींपेक्षा वेगळी असल्याचं. त्या कारणानेच तर त्याला ती आवडायला लागली होती.

'प्रियांश, मला कळत नाहीये.' ती तिच्या नेहमीच्या हळू आवाजात, अगदी शांतपणे त्याला तिच्या मनात सुरू असलेल्या संभ्रमाबद्दल सांगत असते.

सकाळी वेळेत उठणं होत नसल्याचं जेव्हा ती सांगते तेव्हा त्याला वाटतं की कदाचित त्याच्यामुळे तिच्या वेळेचं गणित चुकतंय. त्याच्यामुळे तिचं schedule बिघडावं अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती.

'असं कसं चालेल?' तो तिचं बोलणं ऐकून तिला गंभीरतेने विचारतो.

'तू सुचव ना काहीतरी!' तीसुद्धा तितक्याच गंभीरतेने त्याची मदत मागते.

खरंतर, प्रियांशला फोनवर बोलायला फार आवडायचं नाही. समोरची व्यक्ती बोलत असताना डोळ्यांतले भाव अधिक काय ते बोलत. त्याला त्या डोळ्यांच्या भाषेतला संवाद खरा वाटे. मात्र, girls'hostel च्या सातच्या आत घरात या असल्या नियमांमुळे फोनवर बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याकारणाने तरी गेल्या काही दिवसांत त्यांच्या वाढलेल्या संवादामुळे तिचा फोन कॉलेजला silent mode ऐवजी vibrating mode वर राहू लागला होता.

'तू उठते त्यावेळीच उठणारी तुझी रूम मेट?'

'गेल्या काही दिवसांत तिचं बदललेलं वागणं ऐकून तुला वाटतंय का ती मला उठवेल ते? तोडकं-मोडकं, रागात का होईना, चिडत का असेना पण ती बोलतेय हेच पुरेसं माझ्यासाठी.' एवढं बोलून ती थांबली आणि पुन्हा त्याला ऐकवते, 'आणि तू त्यात काही ना काही कारणास्तव आगीत तेल ओतत असतो.'

'असं मी काय केलं?' प्रियांश.

'काल प्रोजेक्ट सेशननंतर लायब्ररीत काय बोललास तिला?

'काहीच नाही. उलट...' स्म्रीति मात्र प्रियांशला बोलू देईल तर.

'किंवा असं काय केलंस की ती रूममध्ये येताच तू कसा वाईट आहेस याचा पाढा ऐकवू लागली.'

'अगं, मी काहीच नाही बोललो. उलट तिला मदत केली मी.'

'मदत? कशी बरं?'

त्याने आदल्या दिवशी लायब्ररीत काय घडलं ते सांगितलं.

'आत्तातरी कळलं का चिडली असेल ती तुझ्यावर?' स्म्रीति प्रियांशवर विश्र्वास ठेवून होती जरी जन्का तिला त्याच्याबद्दल वाईट सांगत होती तरी.

'चिडण्यासारखं काय होतं त्यात? मदत करावी तर thank you म्हणण्याऐवजी राग, संताप. तसं तिच्याकडून thank you वगैरे ऐकण्याची अपेक्षा नव्हतीच म्हणून लगेचच निघालो तिथून.'

'प्रियांश, ती पुस्तक ठेवत नव्हती तर काढत होती.' यावर दोन क्षणं तर त्याला काय बोलावं सुचेनाच.

'माझा हेतू फक्त मदत करण्याचा होता. मात्र, हाईट कम, फाईट जादा असंच होतंय तिच्यासोबत.'

'त्यामुळे तू तिचं नाव घ्यायलासुद्धा घाबरायला लागलाय का?' चेहऱ्यावर मिश्कीलसं हास्य आणत तो तिच्या प्रश्नाला टाळतो. 

काही क्षणं दोघंही काहीच बोलत नाहीत. दोघांनाही एकमेकांच्या सभोवतालची खेळती हवा स्पष्ट ऐकू येत होती‌.

Girls' hostel च्या बाहेर मागच्या बाजूला असणाऱ्या बाकावर स्म्रीति येऊन बसली होती. हॉस्टेलच्या खिडक्यांतून सुद्धा न दिसणारी अशी जागा होती. कुठलीच मुलगी तिथं बसलेली नसायची. त्यामुळे जणू त्या बाकावर तिचीच हुकूमत झाली होती.

प्रियांश नेहमीप्रमाणे बास्केटबॉल कोर्टवर येऊन बसला होता. समीर आणि विभोर दोघंही कॉलेज गेट बाहेर जिरा सोडा प्यायला गेले होते.

स्म्रीतिचा अभ्यास होत नसल्याचं ऐकून प्रियांश त्याच्याच झोपेचं गणित व्यवस्थित करण्याचं ठरवतो.

'मग मी उठवू का तुला?' तो असं विचारताच ती हसायला लागली. त्याच्या नजरेसमोर तिचा तो हसरा चेहरा आला आणि त्याला फक्त वेड लावणाऱ्या तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्या दिसत होत्या.

'गेली तीन दिवसं मी तुला सात वाजेपासून उठवण्याचा प्रयत्न करतेय. तू एकदाही उठला नाहीस आणि त्यात माझ्या अभ्यासाचे बारा वाजलेत ते वेगळे.' तो काहीच बोलला नाही कारण तिचे प्रयत्न खरंच कौतुकास्पद होते. ती त्याचा अलार्म झाली होती आणि तरी तिच्यासोबतही तो snooze option वापरतच होता.

'प्रियांश, तुझी 8.30 ला उठण्याची बोंब असते रे.'


खुर्चीत झोपी गेलेला प्रियांश डोळे उघडत, झोप उडवत स्म्रीतिला फोन करतो.

स्म्रीति नुकतीच अंघोळ वगैरे आवरून अभ्यासाला बसली होती. जन्का रीडींग रूमला जाऊन काही वेळंच झाला असेल. 

प्रियांशचा फोन येत असल्याचं बघून तिच्या चेहऱ्यावर एक विजयी समाधान दिसत असतं. फोन उचलण्याआधी तिने थोडा वेळ रींग वाजू दिली.

'हॅलो!' अजुनही झोपेत असल्यासारख्या आवाजात ती फोन उचलते.

'5.30 वाजलेत. उठण्याचे कष्ट घ्यावेत आत्ता‌.'

'हो!' स्म्रीति एक जांभई देत आणि हसू आवरत म्हणते, 'उठते.'

'पण तू एवढ्या लवकर उठण्याचे कष्ट कसे बरं घेतलेस?' ती विचारते.

'तुला उठवण्यासाठी.' त्याचं उत्तर ऐकून तिला खरंच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करावासा वाटतो.

'अहा! आत्ता खरी जाग आली.' स्म्रीति.

'मग आता उठलाच आहेस तर आवर आणि अभ्यास कर काहीतरी. फक्त मला उठवायचं होतं म्हणून लगेच झोपू नको.' स्म्रीति मात्र त्याला झोपू देणार नव्हती. कारण, तिचं टार्गेट तर त्याला लवकर उठवण्याचं होतं.

'झोप लागली तर?' प्रियांश.

'तर मग उद्यापासून तू मला उठवायचं नाही.'

यावर काहीही उत्तर न देता bye म्हणत तो फोन ठेवतो.

स्म्रीति मनातल्या मनात खुश असते. तिला जे साध्य करायचं होतं ते तिने चारंच दिवसांत करून दाखवलं होतं.

'What a player!' अक्षरा झोपेतच slumdog millionaire मधील अनिल कपूरच्या आवाजाची नकल करत स्म्रीतिचं कौतुक करते.

'अक्षरे वटवाघुळ, झोप.' अर्थात, त्याला लवकर उठवण्याची कल्पना स्म्रीतिला अक्षरामुळेच सुचली होती. तिचं म्हणणं होतं की, मुलांना भीती दाखवली की ते कितीही हसण्यावारी घेतील पण त्यांच्या मनात जो कल्लोळ उठतो तो मात्र खरा असतो.

'स्म्रीत्या, प्रियांश माझ्या स्वप्नात आलेला आज. म्हणतो कसा ऐक, स्म्रीतिवर माझं प्रेम आहे पण विचारण्याची हिंमत होईना . तू...' अक्षरा मात्र स्म्रीतिला चिडवण्याची कुठलीही संधी सोडत नव्हती. झोपेत सुद्धा!

'झोऽप.' स्म्रीति अक्षराची बडबड थांबवत तिला झोपायला सांगून iPod ला play करते. तिच्या बदललेल्या playlist मुळे चेहऱ्यावर सतत हसू असायला लागलं होतं. त्यात अक्षराची बडबड तर तिला लाजायला मजबूर करत होती.

तिकडे, प्रियांश मात्र 5.30 ते 7 या दीड तासांत कितीतरी वेळा झोप उडवत compiler construction (CC) मधील compiler च्या phases समजून घेत असतो.

त्या वेळात काहीतरी आठवून तो स्म्रीतिला मेसेज करतो.

'Bring AI's first assignment. DAA च्या लेक्चरला लिहीतो.'

'नाही लिहीलंय. :(' तिचं आलेलं उत्तर.

'का?'

'मला कळत नाहीये कसं लिहावं ते. 4 विषयांपैकी एक निवडायचा होता elective म्हणून. त्यात आपण सगळ्यांनी AI का घेतला जो फार मार्क्ससुद्धा मिळवून देणार नाही!'

'Artificial Intelligence शिकणं गरजेचं आहे, कारण machines आपली किती कामं सोप्पी करू शकतात हे समजायला हवं ना.'

'अर्थात, म्हणून Artificial Intelligence ऐवजी आपण त्याला Artificial idiocy म्हणायला हवं.' स्म्रीतिच्या या बोलण्यावर त्याला हसू आलं. तिचा राग खरंतर त्या विषयावर यासाठी होता कारण तिला त्यात मार्क्स कमी भेटण्याची भीती होती.

'4.30 ला लेक्चर संपताच लायब्ररी जाऊयात.' एवढं म्हणत तो फोन बाजूला ठेवतो. पुन्हा Compiler Construction मध्ये गुंततो.

समीर आणि विभोर दोघंही उठताच बराच वेळ तर आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याने प्रियांशकडे एकटक बघत असतात.

'झालं असेल डोळे फाडून तर...' त्याला त्याचं वाक्य पूर्ण करू देतील तर ते त्याचे जिवाभावाचे जिवघेणे मित्र कसले.

'मानलं पाहिजे स्म्रीतिला. जे आम्हाला तीन वर्षांत नाही जमलं ते तिने चौथ्या दिवशीच करून दाखवलं.' विभोर हात जोडत म्हणतो.

'आज कळलंय तू इतक्या मुलींना नकार का दिला! She is the one, dude. जशी तुला हवी होती अगदी तशीच.' समीर.
.

Image source: Guelgram


No comments:

Post a Comment