सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Thursday, 29 August 2019

भाग बारावा

भाग बारावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष


कॉलेजचं त्या दिवसाचं शेवटचं लेक्चर संपलं. 4.30 वाजलेले आणि प्रियांशची पाऊलं वर्गातून project lab कडे वळण्याआधीच HOD सर दोन लेक्चरर्ससोबत वर्गात आलेत.

अर्थात, project lab मधील suspension संपल्यानंतर तो आणि त्याचा project group पहिल्यांदाच lab मध्ये जाण्यासाठी उत्सुक होते. पण HOD सरांचे विचार काहीसे वेगळे होते त्यादिवशी.

'Perhaps, this is the best batch in my entire career. Your academics, curricular activities and interest in learning will help you to get a good job in campus interviews .....'

HOD सरांचं त्यावेळी वर्गात येण्याचं कारण placement संदर्भात होतं.

प्रियांशला जाणीव होती की, त्यांच्या कॉलेजला येणारी प्रत्येक IT company ही 60% पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांसाठीच येणार होती. त्याला संधी भेटणार नव्हती थोडक्यात त्या semester ला येणाऱ्या कंपनींसाठी पण त्यामुळे तो निराश नव्हताच मुळी. त्याचं ध्येय फक्त शेवटच्या वर्षात 67% काढण्यावर असणार होतं. नोकरी मिळवण्याबाबत त्याला स्वतःवर विश्वास होता.

सरांच्या बोलण्याकडे प्रियांशचं अर्धवट लक्ष होतं. पुढची 10 मिनिटे त्यांचं बोलणं काही थांबणार नव्हतं. तो सोडून सगळेच सरांना ऐकण्यात गुंतलेले.

स्म्रीति डाव्या रांगेत त्याच्या पुढच्या बेंचच्या शेजारी बसली होती. तीसुद्धा इतरांप्रमाणे सरांचं बोलणं मन लावून ऐकत होती. तिच्यासाठी मात्र एक सुवर्णसंधी होती, जी तिला गमवायची नव्हती.

प्रियांश तिच्या चेहऱ्यावर दिसणारे हावभाव टिपण्यात गुंतणार तितक्यात त्याला समीरचा SMS येतो.

'In project lab?' समीरला वेगळीच उत्सुकता होती project lab विषयी. प्रियांश आणि त्याच्या group ला नव्याने कुठं बसावं लागणार याचं प्रियांशपेक्षा जास्त tension समीरलाच होतं.

'नाही रे. वर्गातच!' प्रियांशने SMS चा reply केला.

'का?'

'Placement preparation करायचं म्हणत आहेत.'

'ते कसं?'

'आज aptitude test असणार आहे पहिलीवहिली.'

'Best luck.'

'HOD सर बोलण्याचं थांबवतील यासाठी best luck दे. :-D'

'हा हा! Enjoy.'

'Thanks! :D'

प्रियांश पुन्हा स्म्रीतिकडे बघू लागला.

स्पर्श तुझ्या चेहऱ्यास
होता त्या लटेला
तू अलगद सावरताना
मी फक्त बघत रहावं..

शोभून दिसणारी निरागसता
हसून मजकडे बघता तू
प्रेमाच्या नव्या व्याख्येला
स्वतःहून मी मांडत रहावं..

स्म्रीतिचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि ती त्याला सरांकडे लक्ष देण्यास खुणावते. तो मात्र शब्दांच्या जाळ्यात वेळ घालवू इच्छित होता.

'... so, all the best.' त्यांच्या मनगटावर असणाऱ्या घड्याळाकडे बघत ते पुढे म्हटले, 'And, today's project session is scheduled at 5.45 to 7.45. Girls who will be attending are allowed to reach their hostel before 8, instead of 7.'  त्यांचं बोलणं संपवून HOD इतर दोघं लेक्चरर्सना काही instructions देत वर्गाबाहेर पडलेत.

Question paper आणि answer sheet हातात येताच प्रियांशने question paper वर एक नजर फिरवली. एका तासात 100 प्रश्नांची उत्तरं सोडवायची होती.

प्रियांशसाठी कठीण नव्हता एकही प्रश्न. कॉलेजमध्ये होणाऱ्या virtual placement स्पर्धेत तो तिसऱ्या वर्षी finalist होता. फक्त समीरच त्याच्यापेक्षा सरस ठरलेला संपूर्ण कॉलेजमधून. Aptitude test, GD, debate, interview या साऱ्या गोष्टी त्याच्यासाठी मुळीच कठीण नव्हत्या. कमतरता होती ती 60% ची. भीती होतीच, नाही म्हटलं तरी.

उत्तरं सोडवता सोडवता त्याचं लक्ष अधून मधून स्म्रीतिकडे जात होतं. एक वेगळंच दडपण दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर. कदाचित, प्रत्येक परीक्षेला ती इतक्याच गंभीरतेने घेत असणार. पण का? शांततेत, मन हलकं ठेवूनसुद्धा परीक्षेला सामोरं जाता येतंच ना!

काय काय बदल करावे लागणार या मुलीमध्ये जेणेकरून आयुष्याला आनंदात जगू शकेल?

तो तिला काहीतरी सांगू इच्छित होता त्या संपूर्ण तासाभरात पण तिने एकदाही वळून बघितलं नाही. दोनदा पेनही खाली पाडला त्याने मुद्दाम जेणेकरून ती विचलित होईल पण व्यर्थ. शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत तो A, B, C, D चे गोल भरता भरता तिच्यावर लक्ष ठेवून असतो की अंशतः का असेना एकदा तरी ती मागे वळून त्याच्याकडे बघेल.

वेळ संपते. Lecturer सर्वांच्या answer sheet जमा करून वर्गाबाहेर पडताच प्रियांश ओरडतो.

'Oh shit!'

सगळा वर्ग त्याच्याकडे बघत असतो.

'काय झालं प्रियांश?' शेजारी बसलेल्याने विचारलं.

'मी answer sheet वर नाव नंबर लिहायला विसरलो.'

जन्का त्याच्याकडे रागाने बघत प्रज्ञाला म्हणते, 'हा इतका का नाटक करतो? सगळीकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं विनाकारण. Attention seeker!'

स्म्रीति मात्र मनातल्या मनात त्याला बुद्धू म्हणत त्याच्याकडे बघून हसत इतर तिघी project partners सोबत project lab कडे जाण्यास निघते.

'एवढं ओरडून सांगायची काय गरज होती? गेला असता तो lecturer मागे.' जिन्याच्या पायऱ्या उतरता उतरता जन्का प्रियांशविषयी बोलू लागली.

'आहेच तो तसा, आपण त्याच्याबद्दल का बोलतोय आजकाल इतकं!' प्रज्ञा विषय थांबवण्याच्या प्रयत्नात विषय वाढवत होती.

'आत्ता ते तू स्म्रीतिला विचार, ती सांगेल का म्हणून.' जन्का.

'मी स्वतःहून यानंतर त्याचा विषय कधीच काढणार नाही, शब्द माझा.' तसंही स्म्रीतिने त्याचा विषय स्वतःहून काढलाच नव्हता कधी.

'आणि असं काही वेगळं वागू नको म्हणजे आम्हालासूद्धा त्याच्याबद्दल बोलायची गरज येणार नाही.' स्म्रीति जन्काकडे बघते. तिला जन्कावर राग येत होता, चिडावंसं वाटत होतं. मात्र, काहीही न उत्तरता ती चालू लागते.

Project lab च्या दारातच प्रियांश दिसला. तिने त्यावेळी त्याच्याकडे बघणं टाळलं. डोळ्यांतले भाव त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करू लागली.

प्रियांशच्या project group ला त्यांच्या आधीच्याच जागेवर बसण्यास सांगण्यात आल्यावर चौघंही आश्र्चर्यचकित पण खुश होते.

Project lead असणाऱ्या मानसला मात्र रहावलं नाही.

'जन्का, आम्हाला इथंच बसायचं होतं तर मग आमच्या suspension चा तुला काय फायदा झाला?' मानस असं बोलताच ती पुन्हा धावून जाईल, आरडाओरडा करेल असंच सगळ्यांना वाटलं होतं.

'महिन्याभरातील 11-12 sessions तुमची तोंडं बघायला लागली नाहीत याचं समाधान.' इतकं बोलून थांबेल तर ती जन्का कसली!

'आणि बसण्याचा विषय म्हणशील तर HOD सरांचा आवडता असलेला तुझ्या project group मध्ये आहे म्हणून partiality व्हायचीच होती. Suspension तर फक्त त्यांचा दिखावा होता.' जन्का मात्र शांतपणे तिखट मारा करू इच्छित होती.

'दिखावा कुणी केला हे सगळ्यांनी बघितलंय...' मानस अजून काही बोलणार त्याआधीच प्रियांशने त्याला शांत राहण्यास भाग पाडलं.

'गप बस रे. अजून त्रास नकोय विनाकारण.' मानसला थांबवून तो तिच्याकडे बघत म्हटला, 'Sorry.'

'You should be.' हे बोलताना तिच्या डोळ्यांतला राग त्याला घाबरवून गेला.

स्म्रीति मात्र computer screen समोर बघत काही घडत नसल्यासारखं दाखवत होती. तिला वाद नको होता किंवा जन्कासमोर तो.

महिना संपला पण वर्ष कधी संपणार, हाच विचार येत होता त्याच्या मनात.
.

दुसऱ्या दिवशी दुपारी 2.30 वाजता lecturer वर्गात test च्या answer sheets वाटत असतात.

'नाव लिहायला कोण विसरून गेलंय?' Lecturer असं विचारताच सगळ्यांच्या नजरा प्रियांशकडे वळतात.

'सर, मी विसरलो होतो.' प्रियांशला वाटलं की फार काही फरक पडणार नव्हता कारण तसंही practice tests असल्याने गंभीरता फार नसणारच होती.

'प्रियांश? अजून कुठे कुठे आणि कशा कशा चुका करणार आहेस तू?' Lecturer मात्र त्यांची नाराजगी लपवू शकले नाहीत. Project lab मधील Suspension आणि आत्ता हे असं बेजबाबदार वागणं, प्रियांशचं गणित बिघडल्यासारखं वाटू लागलं होतं सगळ्यांनाच.

'Sorry Sir!'

'Sorry? तुला एकही मार्क दिला नाहीये मी.' प्रियांशच नव्हे तर सगळेच थोडं गोंधळले होते.

'डोक्यातून गैरसमज काढून टाका सगळ्यांनीच की practice tests तर आहेत काय फरक पडणार. फरक पडेल, हे लक्षात असू द्या. तुम्हाला placement interviews साठी तयार करावं म्हणून ही उठाठेव आहे. If you are not taking these tests seriously then you won't be allowed for the college placements.'

वर्गात भयानक शांतता पसरलेली.

'आणि तुमच्या या performances तेव्हाही ध्यानात ठेवल्या जातील, for the preferences.' प्रियांश काहीही न उत्तरता त्याच्या जागेवर बसतो.

'स्म्रीति, congratulations! You have scored 94 marks. Keep it up.'

स्म्रीति पहिली आली होती. तिच्यात आणि दुसऱ्या आलेल्या student मध्ये तब्बल 12 marks चा फरक होता.

पण खरंतर, ती तिला मिळालेल्या marks ने अचंबित होती.

कॉलेज सुटल्यावर रूममध्ये जन्का स्म्रीतिवर चिडचिड करत होती.

'तू तर 75 questions attempt केलेले ना? मग 94 marks कसे मिळालेत?'

स्म्रीतिलाच कळत नव्हतं तर ती जन्काला काय उत्तर देणार होती.

'थोडक्यात, तो प्रियांश तुला competition च्या नावाखाली आमच्याशी खोटं बोलायला सुद्धा शिकवतोय तर.' जन्काचा राग दिवसेंदिवस वाढत होता. स्म्रीतिला मात्र काय करावं, कसं वागावं हेच कळेनासं झालं होतं. त्यात प्रियांशची तिला फार काळजी वाटत होती, ती वेगळी.

कसंतरी दोन पोळ्या खाऊन स्म्रीति रात्री 9 वाजता हॉस्टेलमागील बाकावर येऊन बसली होती.

'असं कसं विसरू शकतो तू?' प्रियांशला तिने फोन केल्यावर लगेचंच विचारलं.

'कधी नव्हे असं घडलंय. मी काहीच सांगू शकत नाही का झालं असं.'

'तू ठीक आहेस ना?'

'अगदी! तसंही 60% आहेत कुठे माझे जे कुठल्या चांगल्या कंपनीसाठी applicable होऊ देतील.'

'या semester मध्येच cover करशील तू 60% म्हणून असा धीर नको सोडू.'

'तू कशातून तयारी करतेस?'

'R. S. Agarwal.'

'नको.'

'तेच तर पुस्तक कामी येणार आहे आपल्याला आणि तू नको म्हणतोय?'

'तुला IT कंपनीत नोकरी हवीये की बॅंकेत?'

'म्हणजे?'

'म्हणजे इतकं पुस्तक वाचायला वेळ कुठे आहे आपल्याकडे? Google वर शोध ज्या त्या कंपनीचे sample papers.'

'होईल तेवढ्याने?'

'सहज!' प्रियांश तिला विश्र्वास देत होता.

असाच काहीसा अविश्वसनीय result शेवटच्या वर्षाचा लागला तर‌! तिला ठाऊक होतं मात्र असं काही होणार नव्हतं. मेहनत करावीच लागणार होती, तीसुद्धा खूप सारी.

त्यात जन्काला सहन थोडेच ना होणार होतं इतक्या सहज.

'जन्का आज पुन्हा चिडली.'

'का? तुला 94 मिळालेत म्हणून?'

'खरंतर, काल test नंतर जेव्हा रूममध्ये आम्ही discuss करत होतो तेव्हा मी म्हटले होते की मी 75 च प्रश्न सोडवू शकली.'

'तिला वाटतंय की तू खोटं बोललीस म्हणून चिडली ती?' आणि दोष त्याला देत होती हे मात्र स्म्रीति त्याला सांगू शकणार नव्हती.

'हो. मी खरंच 75 प्रश्नं सोडवले होते रे.'

पुढचे 10 सेकंदं दोघंही काहीच नाही बोलले. ती 10 सेकंदांची शांतता 10 तासांची भासत होती.

काय बोलावं तिला कळत नव्हतं. ती जन्कापासून दूर होऊ इच्छित नव्हती. कितीही नाही म्हटलं तरी स्म्रीतिला तिची सवय झाली होती. 3 वर्षांची ती सवय, पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत असणारी. एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय सुटावीशी वाटत नाही आणि सुटली की होणारा त्रास असह्यच. व्यसनच एकप्रकारे!

तो मात्र पुरता अडकला होता. जन्काचं वागणं समजण्यापलीकडे होतं. शेवटचं वर्ष शांततेत पार पडावं असं वाटत असलं तरी त्याला जाणवायला लागलं होतं की जन्कामुळे तरी गाजणारच.

खरंतर 94 मार्क्स त्याला मिळाले होते. स्म्रीति तिचं नाव लिहायला विसरली होती, तो नव्हे. प्रियांशने ठरवलेलं की तिला नाही सांगायचं. ती शांतता मात्र त्याला सहन होईना.

त्याने तिचं नाव टाकलं नसतं तर काय झालं असतं? तिला तसं test सुरू असताना त्याने बराच प्रयत्न करून पाहिला तिचं लक्ष वेधून घेण्याचा पण ती पुर्णतः गुंतलेली प्रश्नांची उत्तरं सोडवण्यात‌.

'94 मार्क्स तुलाच मिळाले आहेत. तुझा काहीतरी गोंधळ झाला असेल. एवढा विचार नको करू.' प्रियांश.

'ठेवते मी फोन, bye.' स्म्रीति मात्र काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला पटतंच नव्हतं. त्यामुळे न उत्तरता ती फोन काटते.

काहीवेळ स्म्रीति तिच्यासमोर काहीही न दिसणाऱ्या अंधाराकडे बघत बसली. तो न दिसणारा अंधार मात्र स्वतःची जाणीव करून देत होता. मनाला न सुटणारी प्रश्नं आणि डोळ्यांना न दिसणारा अंधार, सारखेच.

रूममध्ये पोहोचल्यावर जन्का पुन्हा तेच बरळू लागली. तेच पुन्हा-पुन्हा ऐकून स्म्रीतिची चिडचिड होऊ लागली होती पण तिने काहीही न उत्तरण्याचं ठरवून टाकलेलं. प्रियांशचा विषय तिला रूममध्ये तरी नकोच होता.

'जर तुला वाटतंय स्म्रीति तुझ्यासोबत खोटं बोलतेय तर दोष प्रियांशला का देतेय? त्याला तर एकही मार्क नाही मिळाला ना?' अक्षराने जन्काला विचारलं.

'काय? बोल ना, का त्रास होतो तुला त्याचा?' अ‌क्षराने असं विचारताच जन्काला काही बोलवेना. लपवून ठेवलेला तो क्षण, ती वेळ तिला कुणालाच सांगायची हिंमत नव्हती, त्या तिघींनासुद्धा नाही.

आत होणारी घुसमट आणि बाहेर होणारी चिडचिड सुचवत होत्या जणू की वाईट आठवणी इतिहासजमा होत नसतात कधी.

Image source: Guelgram


No comments:

Post a Comment