भाग सोळावा: आजचा दिवस
'काय काय गमावलं या यादीत
तुझं नाव पहिलं आहे
आयुष्याची गोष्ट पुढे सरकत गेली... पण
तुझं नाव तिथेच राहिलं आहे...
सगळ्यात वावरायचं
पण तुझ्या आठवणींत रहायचं नाही
म्हणजे श्वास घेत रहायचा
पण जगायचं नाही...'
माझ्या डोळ्यांसमोरून एका मागं एक आठवण slide show पद्धतीने सरकत होती. सगळं काही 10 सेकंदांत बघितलं आणि खूप रडावंसं वाटलं. पण नाही, हिंमत धरली आणि चेहऱ्यावर खोट्या प्रश्नार्थक नजरेने आकाशकडे बघत विचारलं,
'माझ्या कधीही फिकीर नसलेल्या पक्ष्याला कुणी बरं चोच मारली, तीही इतकी घायाळ करणारी?'
आकाश माझ्या डोळ्यांत बघत म्हणाला, 'कसं जमतं गं स्म्री तुला?'
मी त्याच्या नजरेतून सावरत समुद्रकिनाऱ्याकडे बघू लागली, काहीही न उत्तरता.
'जेव्हा मला जाणवायला लागलं की मी तुझ्या प्रेमात पडतोय त्याच दिवसांत नेमकं uni च्या library तल्या एका पुस्तकात सापडलेल्या कुठल्यातरी कोऱ्या कागदावर या आठ ओळी उतरवलेल्या दिसल्या. अक्षर ओळखीचं वाटलं आणि मन सून्न झालं.'
माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला कळण्याआधीच मी त्या अश्रूंना गालावरून पुसत, त्यांना थांबवलं.
'गेली दीड तास मी तुझ्यासोबत या समुद्रकिनारी बसून आहे, एक शब्दही न बोलता. का? कारण तुला शांतता हवी होती नेहमीसारखी.'
पुन्हा एकदा शांतता. पण माहीत होतं आकाशला शांतता सहन होणार नाही. मुळातच तो माझ्यासारखा नव्हता आणि तरीही जगावेगळं राहू पाहणाऱ्या माझ्यावर त्याचं प्रेम जडल्याची कबुली त्याने आज पहिल्यांदाच दिली. नेहमी प्रवाहासोबत वाहणारा आज जणू रूप बदलून प्रवाह कोलमडू बघत होता.
'किती दिवस जखमा लपवत जगशील?'
'आकाश! नको ना आपण त्या विषयावर बोलायला.'
'तेच म्हणतोय मी! तू आणि तुझे विचार त्याच विषयावर बोलत असतात एकमेकांसोबत.'
काही वेळ शांत राहून मी त्याला म्हटलं, 'जखमा खूप खोल आहेत.'
'त्यांच्याशिवाय जगू शकतेस ना? अर्थात नाहीच! त्या जखमा लपवत लपवत तर भारतातून इथे या परक्या देशात आलीयेस ना? जिथे तू, तुझे विचार आणि त्या खोल जखमा निवांत राहू शकणार.'
'असं नाहीये काही!'
'असंच आहे म्हणूनच तर हा समुद्र हवा असतो तुला आणि बॉडीगार्ड म्हणून मी.'
खरंच हा समुद्र त्या जखमांवर उपचार होता का? त्या लाटा माझ्या मनातले विचार ऐकून माझ्यापर्यंत पोहोचायचे का? समुद्र माझ्यासाठी अगदी लहानपणापासून जवळचा असल्यानं तो मला आपलासा वाटायचा.
'मी सांगतो ते ऐक! एकदा मन मोकळं करून टाक, खरंच पुढे जायला मदत होईल तुला.'
'मनातलं कुणाला तरी रडतारडता सांगून मन हलकं होण्याऐवजी त्या खोलवर असणाऱ्या जखमा नव्याने वर येतील आणि स्वतःला इथपर्यंत आणण्याचे सगळे कष्ट वाया जातील.'
'तर मग असंच जगायचं ठरवलंय आयुष्यभर?'
'तू माझ्या प्रेमात पडण्याआधीच तुला क्षणांत सावरता आलं. तुझ्या इतका नशीबवान मनुष्य आणखी कुणी भेटला नाही याआधी मला.'
'तुला सांगते, इथे येण्याआधी Grey's anatomy चा पाचव्या सिझनचा फिनाले एपिसोड बघत होते मी. एपिसोडची शेवटची पाच-सात मिनिटे त्या TV show मधल्या drama पेक्षा स्वतःच्या भुतकाळात नेत होती. आवडतं character पुन्हा कधीच बघायला भेटणार नाही म्हटल्यावर वाईट वाटणारच ना.'
'त्यातली प्रमुख पात्र असणारी मेरिडीथ जेव्हा बोलत असते तिच्या आवाजात त्या दृष्यांसोबत, त्रासदायक होत होतं ऐकायला. Did you say it? 'I love you. I don't ever want to live without you, you changed my life.' Did you say it? Make a plan. Set a goal. Work toward it. But every now and then, look around. Drink it in. Cause, this is it. It might all be gone tomorrow.'
'खरंच, for me, it's all gone today! It's all gone, आकाश!'
आकाशला काही बोलवेना. माझ्याकडे बघताना त्याला वाटत असेल की मी आत्ता तुटेल तेव्हा तुटेल आणि मनमोकळं रडेल पण माझ्या चेहऱ्यावर असणारे भाव कितीही गंभीर असले तरी ते माझ्या मनाला तोडू शकणार नव्हते. मान वळवून तो समुद्राच्या लाटांकडे बघत होता, अगदी शुन्य होऊन. गेल्या दोन वर्षांत न भेटलेली मी त्याला आज भेटली होती आणि नव्याने भेटलेली मी जास्त काही न बोलता खूप काही सांगून गेली.
'तू आधी माझ्यासारखी होतीस का? अगदी मनमोकळी, बडबडी?'
'नाही! मी जी गेल्या दोन वर्षांत तुझ्यासोबत होती तशीच मी आधीही होती. फक्त आधीची मी आणि तू या दोघांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे ध्येय गाठण्याचं.'
'तुझं ध्येय गाठलंस तू?'
'हो आणि नाही.'
'म्हणजे?
'म्हणजे तू तुझं ध्येय तुझ्या बळावर पुर्ण कर इतकंच!'
रात्रीचे 10 वाजलेले. पहाटे 6 वाजता एअरपोर्टवर पोहोचायचंय पण त्या समुद्रकिनाऱ्यावरून उठवेना.
'निघायचं परत?' मीच शेवटी न राहवून त्याला विचारलं.
तिथून निघालो आणि सुदैवाने आकाशची बडबड पुन्हा सुरू झाली.
'भारतात गेल्यावर फोन करत जा. मी येईल तुझ्याकडे तुला भेटायला तुला हरकत नसली तर आणि मग तिथून बंगळूरू जाईल. Destination wedding आहे आत्याच्या मुलीचं केरळमध्ये. महिनाभर फक्त धिंगाणा घालायचं ठरवलंय सर्व भावंडांनी. दोन वर्षांच्या या व्यस्त कारभारातून सुटका मिळत असल्याचा आनंदच साजरा करायचं ठरवलंय मी तर.'
'व्वाह! सुट्यांचंही वेळापत्रक असतं तर तुझं!' दोघंही मनमोकळं हसलो.
'तुझा काय प्लॅन?'
'आराम एकं आराम. आराम दुनं आईच्या हातचं जेवण. आराम त्रिकं बाबांसोबत crossword. आराम चोकं Grey's anatomy. बस्स, याव्यतिरिक्त काहीच नाही होणार!'
'थांब तू! काहीतरी काम लावतोच तुला.'
'मग, आराम पंचे आकाशने लावलेलं काम!'
हसता हसता हॉस्टेल पोहोचलो.
'4 वाजता निघायचंय आपल्याला येथून. लवकर ऊठ!'
'स्म्री, मी झोपणारच नाहीये. एमिली सोबत वेळ घालवायचाय.' आकाश असं म्हणत डोळे मिचकावतो.
'धन्य आहेस तू. भेटू 4 वाजता, bye!'
![]() |
| Image Source: Guelgram |

No comments:
Post a Comment