भाग सतरावा : कॉलेजचं शेवटचं वर्ष
पहाटेच्या संततधार पावसात जाणवलं
स्वतःच्या भीतीमागचं कारण..
वाटलं पाऊस थांबू द्यावा
थोडं ऊनही पडू द्यावं
पण..
उशीर झाला तर?
डोक्यात कल्लोळ सुरू झाला
स्वतःला सावरण्याचा प्रयत्नही केला..
खिडकीत उभं राहून शोधू लागले
पावसाच्या प्रत्येक थेंबात आपलं अस्तित्व..
खरं सांगू?
दिसणारं दृश्य इतकं मोहक होतं की
मी विसरलेच त्या कल्लोळाला
प्रत्येक कठीण प्रश्नाचं उत्तरही
तितकंच सोप्पंसं वाटू लागलं..
तुझ्या, माझ्या.. अंहं..
आपल्या अस्तित्वाला दिसू लागली
एक नवीन ओळख..
पडतो एकसंध, भिजवतो मनसोक्त
मनास रिझवत राहतो स्वच्छंद
पाऊस तसा खरंच शहाणा आहे..
तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसू लागली. त्याच प्रसन्नतेत ती भिंतीवरच्या घड्याळात वेळ बघते. तो उठलाच नसेल असं तिला वाटत होतं. मोबाईल फोन हातात घेत ती त्याचा नंबर डायल करते.
'रात्री 10 वाजता घरी पोहोचलीस तोही 8 तासांचा प्रवास करून आणि तरी इतक्या लवकर उठलीस आज तू! कसं जमतं गं तुला?' प्रियांशने दुसऱ्याच रिंग मध्ये फोन उचलून तिला विचारलं.
'सवयीचा भाग आहे रे तो आणि चांगल्या सवयींमध्ये खंड नसतो पडू द्यायचा.'
'मानलं! मानलं!'
'पण तू माझा फोन येण्याआधी कसा उठला आज?'
'तुला मी बोललो नाही का कधी की सगळ्या बॉईज हॉस्टेल्सचा गणपती गेल्या बऱ्याच वर्षांपासून A5 हॉस्टेलच्या 215 या रूममध्ये बसविला जातो, जो की आमचा रूम आहे. यावर्षीही ती परंपरा कायम राहणार आहे.'
'खरंच?'
'हो आणि त्याचीच तयारी सुरू आहे. आत्ता रूममधील अस्ताव्यस्त पसारा आवरायचं काम सुरु आहे. मग आरास, इतर सजावट आणि भरपूर काही.'
'क्या बात!'
'दहा दिवसं मी मानसच्या रूममध्ये झोपायला जाणार आहे कारण रूम अगदी मोकळा ठेवायचं ठरवलंय. हीच एक खंत असेन पण तेवढं प्रोजेक्टच्या कामाचा वेग वाढेल.'
'आणि बाप्पाजवळ कुणी नाही थांबणार का?'
'समीर म्हणतोय थांबायचं. त्याला बाप्पाशिवाय करमणार नाही आणि म्हणून तो बाप्पाला एकटं सोडणार नाही.'
'काय बोलतोस? बाप्पाचा परमभक्त वाटतोय तो.'
'बाप्पाचे परमभक्त आम्ही तिघंही आहोत पण मग बाप्पाची सगळ्यात जास्त नाव ज्याला माहिती तो बाप्पाजवळ रात्रीसुद्धा थांबणार असं आमचं ठरतं आणि नेहमीसारखं या स्पर्धेत सुद्धा तो एका नावाने जिंकला.'
'क्या बात, खरंच जगावेगळे आहात तुम्ही, धन्य झाले मी ऐकून.'
'आहोतच जगावेगळे म्हणून सोबत असतो.'
'अरे पण मग तुझ्या अभ्यासाचं काय?'
'5 वाजता उठायचं, आवरायचं आणि बाप्पासमोर जाऊन पुस्तक उघडायचं.'
'म्हणजे खंड पडणार नाही तर. मी आल्यावर सुद्धा सगळं आधीसारखंच असायला हवं.'
'4 दिवसांसाठी घरी गेलीयेस तू. मनसोक्त आनंद घेण्याऐवजी वर्षभर घरी गेल्यासारखं बोलतीयेस!'
'गप रे!'
'गणपती आणला का तुम्ही?'
'आज सायंकाळी जाईन बाबांसोबत.'
'छान सजावट कर बाप्पासाठी आणि स्वतःही सज माझ्यासाठी.'
'सजणं, सवरणं आणि मी? अशक्य!'
'म्हणजे माझ्यासाठी इतकं देखील नाही करणार तू?'
'प्रपोज केलाय तू आणि मी अजून हो म्हटलेली नाहीये.'
'मी मात्र माझे आणि बाप्पाचे फोटोज् मेल करणार बघ. ते बघून तरी तू सजशील आणि फोटोज् पाठवशील ही माझी खात्री. आणि हॅल्लो, हो म्हटली नसलीस तरी नाही सुद्धा म्हटलेली नाहीयेस तू हेही ध्यानी असू दे.'
'प्रियांश!' तिला अचानक आलेलं हसू थांबायचं नाव घेईना.
'पुरे आत्ता. AI चा अभ्यास करणार आहेस तू घरी. थोडं लक्ष दे आणि अडलं तर विचार.'
'हो. Bye!'
'आणि उकडीचे मोदक बनवतील ना तुमच्या मातोश्री तर माझ्यासाठी पण बनवायला सांग.'
'सांगते हां, प्रियांश! सांगते!'
'काय सांगायचं ते तू बघ. आत्ता Bye!'
'Bye!'
'Bye!'
'Bye!'
'Bye!'
'तू फोन ठेव ना.'
'तू ठेव.'
'अं हं! तू ठेव.'
'ठेवला की नाही अजून?'
'प्रियांश! बरं मीच ठेवते. Bye!'
स्म्रीति फोन ठेवून जशी वळते, तशी तिला तिची आई तिच्या पलंगावर शांतपणे भिंतीला टेकून, पाय पसरून खिडकीत उभ्या असलेल्या तिच्याकडे बघत बसलेली दिसते.
'आई! तू केव्हा आलीस इकडे?' ती धास्तावली होती खरंतर.
'फोनवर बोलण्याचा तुझा आवाज ऐकला आणि पाय आपोआप इकडे वळलेत.'
'आई, तो फक्त वर्गमित्रच आहे.'
'आणि त्याने तुला त्याचं तुझ्यावर प्रेम असल्याचंही सांगितलंय?'
स्म्रीतिला काही बोलवेना.
'तू त्याला हो म्हटली नाहीये हे ऐकू आलं पण तू त्याला नाहीसुद्धा म्हटली नाहीयेस. बरोबर ना?'
'आई, तो खूप पुढचा विचार करतोय आणि...'
'थोडक्यात त्याने तुला लग्नासाठीच विचारलंय तर? तेही स्वतःच्या पायावर उभं राहण्याआधी?'
पुन्हा एकदा स्म्रीतिला काही बोलवेना.
'माझ्या लाडक्या बाळा, मला खात्री आहे की तू कुणा चुकीच्या मुलाचा हात धरला नसशीलच पण तू तुझ्या आई-बाबांचं एकुलतं एक मुल आहेस हे लक्षात असू दे. फक्त तुमच्या पिढीच्या स्वतंत्र विचार करण्याच्या विचारपद्धतीत तुम्ही घेत असलेल्या निर्णयात तुमचे आई-बाबा म्हणून का होईना आम्हालाही सामावून घ्या इतकंच म्हणणं आहे. अर्थात, आमच्या संस्कारात वाढणारे मुल चुकीचं पाऊल उचलणार नाही एवढीच आमची विचारपद्धती असते.'
'तुला असं खरंच वाटतं का आई मी काही चुकीचं पाऊल उचलेल कधीही?'
'तुझी सांगण्याची वेळ तू चुकवू नये इतकंच. म्हणूनच, तुला आवडलेला मुलगा आम्हालाही आवडेलंच कारण तू कुणा टवाळखोर मुलाच्या प्रेमात पडणार नाहीस एवढा विश्वास आहे आम्हा दोघांचा तुझ्यावर, अजूनही.'
'प्रियांश मला अभ्यासात मदत करतोय आणि खरंच इतकं सोप्पं करून ठेवलंय माझ्यासाठी सगळं काही. माझं स्वप्न पुर्ण करायला तो मला मदत करतोय आणि नेहमी अगदी स्वतःच्या विचारांमध्ये मग्न असणारी मी त्याच्यासोबत माझं तिथल्या वातावरणातलं मन मोकळं करू लागलीये, जसं मी तुम्हा दोघांसमोर करते.'
यावेळी तिची आई काही बोलली नाही.
'कुणाच्या प्रेमात वगैरे पडणं माझ्यासाठी खूप नवीन आहे, मी इतक्यात निर्णय नाही घेणार. तू काळजी करू नकोस, आई. फक्त तुझ्या कोमेजलेल्या पाखराला कुणीतरी नव्याने उडायला शिकवतंय इतकंच आजच्या दिवसांपर्यंतचं गणित हे वर्ष सुरू झाल्यापासून.' स्वतःच्या मुलीचं कौतुक करावंसं वाटलं ते बोलणं ऐकून.
'दिसायला कसा आहे?' विषय अजून वाढवायचा नाही असा विचार करत आईने विचारलं. त्यात मुलगा बघायचा मोह तिला आवरला नाही.
'फोटो दाखवते मग तुच सांग.' मोबाईल काढत स्म्रीतिने प्रियांशचा कॉलेज युनिफॉर्म मधला एक फोटो दाखवला, त्या जुनाट झालेल्या शर्टमध्ये सुद्धा तो चमकत होता.
'तू याला नाही म्हणणारेस?' त्याच्या डोळ्यांत दिसत होतं त्याचं खरं मन, त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं ते दुसऱ्यांनाही प्रसन्न करणारं त्याचं स्मितहास्य. तो फोटो काही गॅदरींग वगैरेच्या दिवसांतला नव्हता, वर्गात कधीतरी कंटाळलेल्या लेक्चरनंतर काढलेला वाटत होता.
'तो खूप पुढचा विचार करतोय असं नाही का वाटत तुला?'
'अर्थात, पण प्रेमभंग वगैरे झाल्यावर दुसरा कुणीही आवडणार नाही आणि फोटो बघूनच सांगते की याच्यासारखा मुलगा तर शोधून सापडणार नाही. म्हणून कुठलाही निर्णय घेण्याआधी मला सांग. मी बाबांना सध्या काहीच सांगणार नाही. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. तुला जर खरंच पुढे जायचं असेल भविष्यात- म्हणजे ती वेळ 5 वर्षांनंतरच यायला हवी असं आम्हा दोघांनाही वाटतं- तर माझी परवानगी आहे.'
'You the best, mumma!'
'माझी गोड मुलगी!' आई स्म्रीतिचा मुका घेते.
'आणि आई, उकडीचे मोदक जरा जास्त बनवशील!' ती चेहऱ्यावर लाजरं हास्य आणत म्हटली.
'नक्की!' आईने मात्र चेहऱ्यावर कुठलेही भाव न दाखवता उत्तर दिलं.
तिने तिच्या वाढदिवसाच्या सगळ्या गिफ्ट्सचे, केकचे, त्याने दिलेल्या गुलाबाचे असे सगळे फोटोज् दाखवत बारिक-सारिक असं सगळं काही वर्णन केलं. तिच्या आईला तिचं जितकं कौतुक वाटत होतं त्यापेक्षा अधिक प्रियांशचं वाटत होतं त्यावेळी. वाढदिवस साजरा करायला न आवडणाऱ्या आपल्या मुलीला स्वतःच्या वाढदिवसाचा किती आनंद झालाय हे तिच्या बोलण्यातून कळत होतं.
हा दिवस कधी न कधी आलाच असता आणि तिच्या पसंतीचा मुलगाच तिचा नवरा व्हायला हवा हेसुध्दा गृहीत धरलेलं होतं. परंतू, आई म्हणून जी भीती होती ती तशीच राहणार होती, म्हणून प्रियांशला एकदा फोन करून त्याला जाणून घ्यावं असा मनात निर्धार करून ती स्म्रीतिला आवरून अभ्यासाला बसायला सांगते आणि रूममधून बाहेर पडते.
![]() |
| Image Source: Guelgram |

No comments:
Post a Comment