सहज, सरळ असलं तर ते प्रेम कसलं? ओढाताण नाही झाली तर प्रेमाला अर्थ काय. गैरसमज झाले नाहीत तर प्रेम उरणार कसं. तशीच काहीशी ही कथा *तो, ती आणि कॉलेज*!

Friday, 11 September 2020

भाग पंधरावा


 भाग पंधरावा: कॉलेजचं शेवटचं वर्ष



स्म्रीतिचा वाढदिवस 16 तासांवर येऊन उभा होता. काहीतरी वेगळं, आयुष्यभर लक्षात राहील असं करायचं त्याच्या मनात होतं. पण काय?


उद्याचा दिवस खूप खास व्हायला हवा. त्याची सुरूवात कशी करावी आणि त्यात शेवट व्हायचं नाव येईना असं काहीतरी करावं.


सकाळी कॉलेज साठी निघण्याआधी प्रियांशने समीर आणि विभोरला सांगताच दोघंही वेगवेगळ्या युक्त्या सुचवू लागलेत.


'आपले हक्काचे दोन रॉकेट आहेत मुलींच्या हॉस्टेलमध्ये. तू सांगशील तर लगेच लॉन्च करू स्म्रीतिच्या रूमवर.' विभोर सुचवत होता त्याच्या आणि समीरच्या girlfriends द्वारे हवं ते पोहोच करण्याचा.


'तिचा रूम म्हणजे रशियासारखा सुरक्षित आहे, बाहेरचं पाखरूसुद्धा आत तडफडतं. तुमचे रॉकेटसुद्धा टिकाव धरणार नाहीत तिथे.' प्रियांशला मात्र खात्री होती की स्म्रीति त्या दोघींमुळे आणखीच रूसून बसेल त्याच्यावर.


'मग, तुला काय करावंसं वाटतंय?' समीरला काहीतरी सुचलं होतं, पण तो खात्री करत होता प्रियांशला सांगण्याआधी.


'रूममधल्याच कुणातरीची मदत घ्यावी, असं वाटतंय.' प्रियांश.


'थोडक्यात, जन्काचे पाय धरावे लागणार तर.' विभोर.


'लोटांगण घालूनसुद्धा ती हो म्हणेल याची खात्री नाही.' प्रियांशला खात्री होती जन्काच्या नकाराची, पण विचारावं लागणार होतं.


'ती नाही म्हटली तर पुढचा विचार करूयात. सगळे पर्याय संपलेत तर आपणच सुरूंग लावून जाऊ तिथपर्यंत.' समीर मात्र शेवटचा पर्याय समोर मांडून खरंतर मनाची धाकधूक वाढवत होता.


रात्री बाराच्या वेळी काहीतरी वेगळं केलं म्हणजे वाढदिवसाचे पुढचे संपूर्ण 24 तास आनंदात जातील आणि प्रियांशला तिला मनापासून आनंदात बघायचं होतं. जणू त्यावर्षी तिला आनंद देण्याचा हक्क फक्त त्यालाच हवा होता.

'कॉलेज संपलं की गावात जाऊ. पुष्पांजली गिफ्ट शॉपमध्ये काहीतरी शोधावं लागणार खास असं.' प्रियांश.

'जाऊयात, तिथे हवं ते भेटतंच, फक्त तिला अत्यानंद देणारं असं काय असेल एवढं ध्यानी असू दे तुझ्या.' समीर.

तिघांसाठी त्या गिफ्ट शॉपने चांगल्याच आठवणी दिल्या होत्या. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडींना साजेसं काहीतरी नेहमीच भेटायचं तिथे.

.

सकाळी 11.20 च्या सुमारास जन्का HOD सरांच्या कॅबिनमधून बाहेर येताना दिसली. प्रियांशने तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून जाणलं की तिचा मूड काही चांगला नाहीये. कितीही नाही म्हटलं तरीही त्याला तिची मदत हवीच होती. मनात सगळ्याच प्रश्र्नोत्तरांची गोळाबेरीज करत प्रियांशने तिला आवाज दिला.


'जन्का!'


प्रियांशने तिला हाक मारल्याने ती थांबली.


'जन्का...' जन्काचा डोळ्यांत बघताच मांडलेली सगळी गोळाबेरीज चुकली.


'माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, म्हणून काय असेल ते पटकन बोल.'


'जन्का तुझी मदत हवीय थोडी.' प्रियांश.


'कसली मदत?' डोळे मोठे करत, नेहमीचा राग दाखवत जन्काने विचारलं.


'उद्या स्म्रीतिचा वाढदिवस आहे तर...' तो त्याचं वाक्य पुर्ण करण्याआधीच जन्काने त्याचं बोलणं काटलं.


'तुमच्या प्रेमळ रूसव्या-फुगव्यांत मला नाही पडायचंय.' जन्का.


'पण फक्त...'


'स्वतःच्या आयुष्याचा पालापाचोळा होत असताना, दुसऱ्याच्या आयुष्यातील सुंदर वेलीवरून कोमेजून पडलेल्या काही फुलांना आवरण्यात काय तो अर्थ!' प्रियांशला मध्येच थांबवत ती असं काही बोलून गेली की त्याला क्षणभर तर काही कळेचना. इतक्या मार्मिक शब्दांत मांडण्यासारखं काय झालं असावं तिला.


'HOD सर रागावलेत पुन्हा?' त्या चौघींच्या project मध्ये अडथळे येत असल्याचं त्याला ठाऊक होतंच.


'तीसुद्धा तुझीच कृपा.' स्म्रीति सरांकडे गेलेली त्याच्या suspension वेळी आणि त्याचवेळी सरांनी तिला project topic सुचवलेला, याची लख्ख आठवण करून दिली तिने.


'Please, जन्का! हवं तर मी मदत करतो तुम्हाला तुमच्या project साठी.'


'नको तुझी मदत आणि माझ्याकडून सुद्धा कुठल्या मदतीची अपेक्षा ठेवू नको.' इतकं बोलून ती practical lab कडे जायला निघाली. जाता जाता मात्र जन्का एका वेगळ्या आणि तिच्याही कामी येणाऱ्या अशा gift ची, तिच्याही नकळत कल्पना देऊन गेली.


प्रियांश पुढच्या पर्यायाचा विचार करू लागला. अक्षरा!

.


रात्रीचे 12 वाजलेले. स्म्रीतिच्या वाढदिवसाबद्दल उत्सुक नसल्यानं जन्का झोपी गेली होती. अक्षरा आणि प्रज्ञा रूमच्या बाहेरून केक घेऊन आत येतात. लाईट बंद करून झोपण्याचं नाटक करतात.


स्म्रीतिचा फोन व्हायब्रेट होऊ लागताच ती उठते. प्रियांशचा फोन येतोय बघून ती उचलत नाही, झोपल्याचा बहाणा करावा या हेतूने. पुन्हा फोन वाजू लागताच ती उठते.


'हॅलो!' झोपेतला आवाज खराच होता हे त्याला पटलं असेल का?


'वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा,स्म्रीति!'


'धन्यवाद, प्रियांश!' हे म्हणताच तिला समोर टेबलावर ठेवलेल्या केकसमोर मेणबत्ती पेटवणारी अक्षरा दिसते आणि स्म्रीति ओरडते.


'प्रियांश, ठेवते मी आत्ता. उद्या बोलूयात!'


त्या मेनबत्तीच्या उजेडात तिच्या समोर तिला न आवडणारा फ्रेश क्रीमचा चॉकलेट केक दिसतो. मात्र त्या केकवर एक अभ्यासात मग्न असलेली काचेत मढवलेली छोटीशी मुलगी असते. जरी चॉकलेट फ्लेवर असला तरी तो केक बघून मात्र तिला खूप प्रसन्न वाटलं.


'फ्रेश क्रीमचा केक या छोट्या शहरात कधीच भेटत नाही!'


'प्रियांश तुझ्या प्रेमात पडलाय आणि त्याची जादू काय असते याचा एक प्रत्यय तुला यावा, यासाठी हा खटाटोप.' अक्षरा असं म्हणत हसली आणि लाईट चालू सुरू करण्यास सरसावली. प्रज्ञाने स्म्रीतिच्या हातात चाकू देत फोटो काढायला कॅमेरा हातात धरला. फक्त त्या तिघीच आणि झोपलेली जन्का. नेहमीप्रमाणे रूमच्या बाहेरचं कुणीच नव्हतं.


'वाढदिवसाची सुरूवातच आहे आणि सुरूवातीचे हे दोन ग्रिटींग्ज घे, एक आम्हा तिघींकडून आणि एक प्रियांशकडून.', झोपायला जाण्यापूर्वी अक्षराने दोन ग्रिटींग्ज तिच्या हातात ठेवले.


तिघींच्या ग्रिटींगवर त्यांच्या आठवणींचा एक कोलाज चिटकवलेला होता आणि प्रियांशचं ग्रिटींगवर त्याच्या कॅलिग्राफीच्या कलेतून त्याच्याच कल्पनेतून फुललेली कविता.



'पाच वाजले, फोन आला

मी उठलो, फोन कटला

पुस्तक उघडले, वाचू लागलो

चित्त लागले, जग विसरलो


तुझ्या येण्याने बदल घडले

तू ही बदलली, हसू लागली

खळी दिसताच वेड लागलं

अभ्यासाचं असलं, संभाषण वाढलं


कॉफी प्यायला रोज भेटलो

एकमेकांच्या डोळ्यांत अडकून पडलो


खास दिवस म्हणून लिहावं

चेहऱ्यावरील हास्य द्विगुणित रहावं..'


.


फक्त ते दोघेच तिथे. तो आणि ती.


गेला तासभर इतरांसोबत चाललेल्या गप्पागोष्टींमध्ये दोघांनाही बोलायला जमलंच नव्हतं.


पुढचा काही वेळ एकमेकांच्या डोळ्यांत गेला.


ती शांत होती नेहमीसारखी आणि तो मात्र अस्वस्थ होता कधी नव्हे. ती जर त्याच्याआधी बोलली असती त्या क्षणी तर त्याला आणखी एकदा सॉरी म्हणावं लागणार होतं, नाहीतर वाढदिवशी आणखी एक कविता. त्याच्या त्या चारोळ्या वा कवितांचा त्रास नव्हताच मुळी, तीचं तर त्याच्या शब्दांवर प्रेम जडलं होतं. तिला तर खात्री होती की उत्तराखातर तीही काहीतरी लिहू लागण्याची. पण, समोर मिळालेला तोडका मोडका वेळ पुन्हा त्याच्या कवीपणात जावा हे नको होतं तिला. त्याने बोलावं आणि तिने ऐकावं, हे नेहमीचं सुत्र तिला हवं होतं.


त्याने स्वतःला तिच्या डोळ्यांत इतकं गुंतवून घेतलं की खऱ्या जगाचा त्याला विसरच पडला. त्याच्यातली अस्वस्थता हळूहळू कमी होत होती. त्याला फक्त तिचा तो वाढदिवस अविस्मरणीय करायचा नव्हता‌ तर येणारे सगळेच. आपल्या असणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस आपल्यासोबतच साजरा व्हावा. पण ती आपली असल्याची खात्री कुठे होती? तो त्या विचाराने तरी भानावर आला आणि तिच्याकडे बघत मनमोकळं हसला.


'असं वेड्यागत हसायला काय झालं?' तिनं डोळे मोठे करत, त्यांवरील भुवया उंचावून त्याला विचारलं.


कॉलेज बॅगमधून त्याने तिच्यापासून लपवत काहीतरी काढलं.


तो त्याच्या जागी उभा राहिला आणि आपला उजवा हात पुढे करत तिला उभं राहण्याचं डोळ्यांनीच आमंत्रण दिलं.


तिनेही त्याच्या हातात आपला हात देत उभं राहून त्याला दुजोरा दिला.


त्याने चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून तिच्यासमोर एका गुडघ्यावर बसत तिच्यासमोर लाल गुलाबाचं फुल धरलं.


तो पुढे काय बोलणार हे ठाऊक असूनही ती विचारते, 'हे काय?'


'गुलाबाचं फुल!' तो.


'आणि काय करू मी ते घेऊन?' ती. 


गंमत करायचं ठरवलंच होतं तर तिने.


'आत्ता आणलंच आहे तर घे ना.' तो.


'आणि मग?'


'अगं त्याच्यातला टवटवीतपणा बघ. माझ्यासाठी नको पण त्या गुलाबासाठी तरी.'


'त्याने काय होणार?'


'त्याचा टवटवीतपणा राहील तोपर्यंत डोळ्यांसमोर असेल. मग कुठल्यातरी आवडत्या वहीमध्ये जपून ठेव. मग त्या वहीला जवळ असणाऱ्या कपाटाच्या कुठल्याशा कप्प्यात ठेवून दे.'


ती मात्र त्याचं ऐकून गोंधळली. मध्येच त्याला थांबवत, 'तुला हे सगळं चालेल?'


'आजच्या दिवसाची आठवण करून द्यायला ती वही पुढे आपल्याच घरातल्या कपाटात राहणार म्हटल्यावर चालेलंच काय पळेलसुद्धा.'


ती हे ऐकून लाजली. थंड हवेची झुळूक जणू तिला सुखावून गेली. ह्या दिवसाची ती आतुरतेने वाट बघत होती. त्याने तिला प्रपोज करावं आणि तेसुद्धा तिच्या कायमस्वरूपी आठवणींत राहील असं.


मनातल्या सगळ्या भावना लपवत, समोर एका गुडघ्यावर बसलेल्या प्रियांशकडे बघत ती पुढच्याच क्षणी जोरजोरात हसू लागली.


'प्रियांश, रोज ५ वाजता भेटायला येशील तेव्हा न चुकता मोगऱ्याची फुलं आणत जा.'


'का?'


'गुलाबाचा गजरा माळूनही त्यात

मोगऱ्याचा सुगंध दरवळणार नाही!'


प्रियांश फक्त बघत राहिला. तिच्या चेहऱ्यावर असलेलं ते हो म्हणणारं हास्य होतं पण डोळ्यांत नाही म्हणण्याचा ठामपणा सुद्धा दिसत होता. सगळं कसं क्षणभंगूर होतं तिच्यासाठी, आठवणी सांभाळून ठेवण्यापेक्षा त्या जगायच्या होत्या तिला. प्रेमातही पडायचं पण उद्याचं काय या भ्रमात नाही जगायचं, इतकंच गणित होतं तिचं, समजूनही न समजणारं.


'तू म्हणशील तर पहाटे ५ वाजता सुद्वा आणून देईन.' प्रियांश असं म्हणताच दोघंही हसू लागलेत. आणि पुन्हा त्या खुर्चींवर जाऊन बसलेत. पुन्हा एकदा बोलू लागल्यात त्यांच्या डोळ्यांच्या भाषा.


'कविता ऐकवू एक?' त्याने असं विचारताच तिने चेहऱ्यावर प्रसन्नता दाखवत होकारार्थी मान हलवली.


तिचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी काय नाही केलं त्याने. म्हणजे तिला आवडणारा फ्रेश क्रीमचा व्हॅनिला केक न आणता चॉकलेट केकची आवड निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो ही कुठून तरी रात्री 12 वाजता तिच्या हॉस्टेल गेटवर आणून अक्षराकडे देत. त्या केकवर अभ्यासात मग्न असलेली काचेत मढवलेली छोटीशी मुलगी ठेवून अगदी तिच्या स्वप्नालाही जागतं ठेवलं. त्या केक सोबत ग्रिटींग ज्यावर त्याच्या कॅलिग्राफीच्या कलेतून त्याच्याच कल्पनेतून लिहीलेली पहिली कविता. दिवस सुरू झाल्यानंतर त्याच्या एका रूममेटच्या गर्लफ्रेण्ड्स पासून तर गर्ल्स हॉस्टेलचा वॉचमन, त्याच्या दुसऱ्या रूममेटची गर्लफ्रेण्ड या सगळ्यांच्या हस्ते मिळालेली एक एक ग्रीटिंग कार्ड. आणि प्रत्येक कार्डमधून तिचं आणि फक्त तिचंच कौतुक.



शब्द हल्ली

निवांत असतात

मनात आले तर

कवितेत बसतात...


नाहीतर असंच

मनात रेंगाळतात...


म्हणूनच जरा मोकळ सोडलं

तर तुझ्याकडे जाऊन थांबतात...


कधी तुझ्या गालावरच्या

खळीत अडकतात,

कधी त्या जीवघेण्या लटेकडे

फक्त बघत राहतात...


माझ्याही नकळत माझे शब्द

माझ्यासारखेच वागू लागतात...



मनात हो असतानाही ती त्याला काहीच उत्तर देत नव्हती, त्याचं इतकं प्रेम होतं तिच्यावर तरीसुद्धा. ती हो म्हणत नसल्याचा तिला पश्र्चाताप होणार होता का नंतर? तिला कळत नव्हतं.


अक्षरा म्हणालीच होती रात्री, 'प्रियांश तुझ्या प्रेमात पडलाय, स्म्रीते. फ्रेश क्रीमका केक क्या चीज हैं जानेमन, वो तो चांद तारे भी तोड़ के ला दे तुझे. बस मांगने की देर हैं!'


त्याने आयुष्यभरासाठी सोबत राहण्याबद्दल विचारलं आणि तिने ते मनातली भीती लपवत हसण्यावारी नेलं. हो म्हणावं असं कितीही वाटत असलं तरीही तिच्या शब्दांना वाट मिळेना.


हॉस्टेलला परतल्यावरही प्रत्येक तासाला एक एक सरप्राइज भेटत होतं. आनंद खूप असला तरीही भीती वाटत होती तिला तिचीच. तिच्या स्वभावाची. हो म्हणण्यासाठी ती वेळ घेणार होती, पण किती हे तिलाही कळत नव्हतं.


'वाढदिवस साजरा झालेल्या दरवर्षीच्या कितीतरी वेगवेगळ्या आठवणी...

केक, जो कुणी आणणार तो त्याच्याच आवडीचा फ्लेवर आणणार...

मग चॉकलेट फ्लेवर आवडत नसला तरीही दिसूनच जातो तो अगदी जीभेची चव हृदयात साठवावी इतका ओसंडून वाहणारा चेहऱ्यावरचा आनंद...

मग समोर दिसणारे ग्रीटिंग कार्ड्स.. गिफ्टही दिसतीलंच डोळ्यांना पण स्वतःविषयी दोन कौतुकाचे आपल्याच लोकांनी लिहीलेले ते टिपिकल मेसेजेस मात्र हवेहवेसे... प्रत्येकाची शैली वेगळी.. मनात साठवून ठेवावं असं काहीतरी वाचणं... आणि मग भुतकाळाच्या पटलावर जाऊन विनाकारण त्यात कारण शोधणं... ते सगळेच सुखावणारे क्षण, तरीही भलतीकडेच भरकटणारे मन.. न आवडणाऱ्या आठवणी काही, पण त्यामुळे ते लिहीलेले प्रेमाचे भावूक करणारे आवडू लागलेले शब्द...

मग हातात येतं ते 'खास' ग्रीटिंग कार्ड! पहाटे ५ वाजता 'उठ' म्हणण्यासाठी केलेल्या फोनचं तक्रारपूर्ण कौतुक... ४.३० वाजता कॉलेज सुटल्यावर कॉफी कॉर्नरवर बसून घालवलेले एक-दोन तास!

त्या वेळात असंख्य रीते केलेले ते कॉफीचे मग... त्यात किती कुणाचे याचाही कुठला हिशोब नाही..‌

चहा आवडणाऱ्या व्यक्तीला कॉफी कॉर्नरवर कॉफीच प्यावी वाटते... म्हणून चहा न आवडणारे कॅन्टीनचा आग्रह धरत नाहीत... कॅन्टीनमध्ये चहाच्या कपांऐवजी रीते होतात ते फक्त शब्द... त्या गर्दीत डोळ्यांची भाषाच उरत नाही...

आयुष्य सोबत काढावं या हेतूने पडू लागलेले पाऊल... आवडीनिवडींच्या सबबी... पण या सर्व मनाने बांधलेल्या कल्पनाच, नाही? खूप बोलावंसं वाटतं पण वेळ आहे आपल्याकडे, असं म्हणत वर्तमानकाळात रूतून राहणारी ती पाऊलं...

दलदल वाढण्याआधी ठरवायला हवं भविष्याबद्दलही‌, नाहीतर मग येतो दरवर्षी वाढदिवस, उरतात आवडणारे कौतुकाचे शब्द आणि सोबतीला असतात न आवडणाऱ्या आठवणी...

आपल्याला काय हवंय हे योग्य वेळी आपल्यालाच शोधता यायला हवं!'  त्याचा त्या वाढदिवशी आलेला शेवटचा मेसेज.


'व्हॅनिला केकवरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नसलं तरीसुद्धा चॉकलेट केकच्या चवीत गुंतवल्याबद्दल मनस्वी आभार. वाढदिवस वगैरे साजरे करावे असं वाटलं नाही कधी पण आज खऱ्याअर्थाने आनंद मिळाला.' तुझ्याही प्रेमात पडलीय, असं लिहावंसं खूप वाटलं तिला पण स्वतःला आवरत तिने तितका टाईप केलेला मेसेज त्याला पाठवला.


(Image source: Guelgram)


.

No comments:

Post a Comment